दरवर्षी जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी फोर्ब्स मासिकाची यादी (Forbes Billionaires List) जाहीर केली जाते. त्या यादीत टेस्ला कंपनीचे एलॉन मस्क, फेसबुकचे मार्के झुकेरबर्ग किंवा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बिल गेट्स यांचीच नावे श्रीमंतांच्या यादीत आलटून पालटून येत असतात. परंतु, या यादीत दुबईचे शेख किंवा इंग्लंडची रॉयल फॅमिलीचे नाव कसे येत नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जाते.
आपण कधी हा विचार केला आहे की, आपण ज्यांना खरोखर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजत आहोत त्यांच्यापेक्षाही श्रीमंत व्यक्ती जगात असतील का? तर याचे उत्तर अर्थातच ‘हो’ असं आहे. जगात असे अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या संपत्तीबद्दल मीडिया किंवा बाहेरच्या जगातील कोणालाही माहिती नाही. काही लोकांकडे वंशपरंपरेने आलेल्या सत्तेमुळे गडगंज संपत्तीही आलेली असते.
कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि दुबई असे देश आहेत जे श्रीमंतांच्या यादीत खूप वरच्या स्थानावर आहेत. या देशांमध्ये असे अनेक लोक आहेत जे जगातील सर्वात श्रीमंत लोकांपेक्षाही ‘लक्झरिअस आयुष्य’ जगत असतात. पण तरीही श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे नाव नसते तेव्हा मात्र आश्चर्य वाटते.
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या नावाची यादी कशी बनवली जात असेल, या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहिती नाही. फोर्ब्स, बिझनेस इनसायडर, ब्लूमबर्ग याच्याद्वारे दरवर्षी श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यातील फोर्ब्स (Forbes Billionaires List) ही सर्वात विश्वासू आणि जगभरात प्रमाण मानली जाणारी संस्था आहे.
फोर्ब्स मासिक जगभरातील श्रीमंत लोकांची माहिती कशी मिळवते यासंदर्भात ३१ मार्च २०१८ रोजी फोर्ब्समध्ये संपादक राहिलेल्या ‘कॅरी डॉलर’ यांनी याबद्दल खुलासा केला. त्यांनी लिहिले आहे की, गल्फ देशांमधील शेख फॅमिली आणि इंग्लंड देशातील रॉयल फॅमिलीला फोर्ब्स मासिकात स्थान दिले जात नाही.
====
हे देखील वाचा: आज ३०० कोटींचा व्यवसाय असणाऱ्या रघुनंदनला एकेकाळी आपली पावभाजीची गाडी बंद करण्याची वेळ आली होती, पण नंतर…
====
जगभरातील काही श्रीमंत लोकांशी फोर्ब्स संस्था संपर्क करत असते. त्यांच्याकडून संस्थेला माहिती मिळत असते. पण काही अशीही लोक असतात ज्यांच्याकडून संस्थेला माहिती दिली जात नाही. त्यांच्या संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी फोर्ब्स संस्थेकडे जवळपास ५० वार्ताहरांची टीम तयार असते. ते वार्ताहर संबंधित कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी, ग्राहकांच्या मुलाखती घेऊन माहिती मिळवत असतात. त्यांच्याकडून पैशाचे देणे घेणे, संपत्तीची खरेदी विक्री, नवीन खरेदी याबद्दल माहिती मिळत असते.
वार्ताहरांना श्रीमंत व्यक्तींकडून एखाद्या जासूसारखी माहिती मिळवावी लागते. त्यातूनही मिळालेली माहिती सर्व खरी असेलच असं नाही. जर एखादी माहिती चुकीची मिळाली, तर मात्र मासिकाच्या प्रसिद्धीवर नकारात्मक परिणाम होतो. एकदा अशीच एक घटना घडली होती. झाले असे की, २०१७ साली सौदी अरेबिया देशातील ‘अल्बदिर बिन दलाल उर्फ सौर’ यांची फोर्ब्स मासिकाने १८ बिलियन डॉलर्स संपत्ती दाखवली होती. पण त्यांनी नंतर त्यापेक्षा आपली संपत्ती १० पटीने जास्त असल्याचे सांगितले होते.
फोर्ब्स मासिकाच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes Billionaires List) अशाच लोकांचा समावेश केला जातो ज्या लोकांची संपत्ती १ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आता तुम्हाला सर्वाना हा प्रश्न पडला असेल की, मुकेश अंबानी यांचा समावेश यादीत कसा केला जातो? कारण त्यांनी चालवलेला व्यवसाय वडिलोपार्जित आहे. पण या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया –
====
हे देखील वाचा: Writing with Fire: ऑस्करचे नामांकन मिळालेला हा माहितीपट नक्की कशावर आधारित आहे?
====
एक माणूस आहे, ज्याची संपूर्ण संपत्ती २० मिलियन डॉलर आहे. त्या व्यक्तीला पाच मुले असून त्याने आपल्या संपत्तीचे सामान वाटप केले आहे. त्यानंतर प्रत्येक मुलाच्या वाट्याला ५ मिलियन डॉलर इतकी संपत्ती आली. त्या सर्व मुलांमधील कोणी जर मेहनतीने संपत्ती वाढवली, तर त्यांचा समावेश फोर्ब्सच्या यादीत (Forbes Billionaires List) केला जातो. मुकेश अंबानी यांनी त्यांचा उद्योग स्वबळावर कित्येक पटीने वाढवला आहे.
शेख आणि रॉयल कुटुंबांमधून संपत्ती वंशपरंपरेने आल्यामुळे त्यांना फोर्ब्सच्या यादीत सामील केले जात नाही. या कुटुंबाच्या संपत्तीचा तपास लावणे खूप जिकरीचे काम असते. २०१८ साली फोर्ब्स मासिकाची मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रसिद्धी झाली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, रॉयल फॅमिली आणि शेख फॅमिलीला या यादीमध्ये स्थान देण्यात येणार नाही.
त्यामुळे एलॉन मस्क, जेफ बेसोज यांची संपत्ती जरी जगात सर्वात जास्त वाटत असली तरी जगात त्यांच्यापेक्षाही अनेकजण गडगंज श्रीमंत आहेत, ही गोष्ट नाकारता येत नाही.