गेल्या वर्षी महाराष्ट्रातच नाही तर देशभर एक प्रकरण फार गाजलं. ते म्हणजे अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटर ! अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपी अक्षय शिंदे याच्यावर ठपका होता. बदलापूरमधल्या आदर्श विद्यामंदिर शाळेत ही घटना घडली होती. यानंतर बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं तसच रेल रोकोदेखील करण्यात आला होता. यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आणि काहीच दिवसांनी ठाणे-मुंब्रा रोडवर त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. मात्र आता ४ महिन्यांनी हाय कोर्टाने यावर निर्णय दिला असून अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी पोलीसच जबाबदार असल्याचं सांगितलं. ज्यामुळे सर्वांनाच धक्का लागला आहे. पण एका आरोपीचा एन्काऊंटर केला तरीही कोर्टाने पोलिसांना जबाबदार का ठरवलं ? जाणून घेऊ.
बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतल्याच शिपायाने लैंगिक अत्याचार केला आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यावरून बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांची आणि पालकांची एकच गर्दी उसळली. आरोपी अक्षय शिंदेला जागेवर फाशी देण्याची मागणी होऊ लागली. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी येऊन मध्यस्ती करण्याचा आणि लोकांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. परिणामी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला. यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेला कोठडीत ठेवलं. २३ सप्टेंबर रोजी त्याला तळोजा कारागृहात रिमांडसाठी नेताना मुंब्रा बायपासजवळ एक चकमक घडली आणि पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.
आता पोलिसांनी दिलेल्या जबाबातून हे प्रकरण समजून घेऊया. पोलिसांच्या जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. अक्षयने तीन गोळ्या झाडल्याची माहिती देण्यात आली. एक गोळी अक्षयच्या डोक्याला, तर दुसरी छातीवर लागली. यानंतर फॉरेन्सिक टीमच्या तपासात पोलिसांनाही बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या शेल्स आढळून आल्या. त्यामुळे अक्षय शिंदेनेच पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता, हे उघड झालं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी पोलिसांची प्रशंसा केली होती.
मात्र आता चार महीन्यानंतर मुंबई हाय कोर्टाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे, ज्यावर सगळेच अवाक झाले आहेत. कोर्टाने या प्रकरणी पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. एन्काऊंटरनंतर याची पूर्णपणे चौकशी करण्यात आली आणि या चौकशी अहवालात हे स्पष्ट झाल की, त्या बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स सापडलेच नाहीत. त्यामुळे कोर्टाने थेट पोलिसांनाच जबाबदार धरलं आहे. यामुळे हा एन्काऊंटर कथित होता की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कोर्टाने त्या ५ पोलिसांवर थेट कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गृह मंत्रालय याबाबत काय निर्णय घेणार हेसुद्धा महत्त्वाचं आहे.
==============
हे देखील वाचा : Mahakumbhmela महाकुंभमेळ्यासाठी जाताय मग ‘हे’ अॅप डाऊनलोड कराच
==============
यावर अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनीही म्हटलं की, अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर झाला असून हा मर्डरच आहे. अमित पुढे सांगतात की, गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी आम्ही केली होती. त्यानंतर सरकारने स्टँड घेतला की, जोपर्यंत कस्टोडियल डेटची एन्क्वायरी करणार न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील स्टेप घेणार नाही, असा स्टँडच सरकारचा होता. आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो फायनल रिपोर्ट दिला, त्यात फेक एन्काऊंटर झालं असून हा मर्डरच आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केलंय की यात एफआयआर झालं पाहिजे. त्यामुळे आता हे संपूर्ण एन्काऊंटर पोलिसांवरच उलटलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर आता काय स्टँड घेतील, त्या पोलिसांची चौकशी होईल का ? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.