Home » कोण आहेत जाम साहेब…

कोण आहेत जाम साहेब…

by Team Gajawaja
0 comment
Jamnagar
Share

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जामनगर मध्ये घेतलेली एक भेट चर्चेत ठरली. पंतप्रधान मोदी यांनी जाम साहेब शत्रुशल्य सिंह यांची भेट घेतली. जाम साहेब यांना नमस्कार करतांनाचे पंतप्रधान मोदी यांचे फोटो सोशल मिडियावर आले आणि हे जाम साहेब नेमके कोण अशी चर्चा सुरु झाली. जामनगरमध्ये राजघराण्याचे वंशज असलेल्या जाम साहेब शत्रुशल्य सिंह यांचे कार्य मोठे आहे. जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंह यांचे ते पुत्र आहेत. जाम साहेब शत्रुशल्य सिंग यांना नवानगरचे महाराज म्हणूनच संबोधन करण्यात येते. ते स्वतः फर्स्ट क्लास क्रिकेटर म्हणूनही परिचीत आहेत.  (Jamnagar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जामनगरमध्ये राजघराण्याच्या वंशजांची भेट घेतली. यावेळी जाम साहेब शत्रुशल्य सिंह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत पंतप्रधान मोदी आणि जाम साहेब यांनी जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंह यांच्या आठवणींना उजाळा दिला.  जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंह यांना पोलंड या देशामध्ये देवाचा दर्जा आहे. आश्चर्य वाटेल पण जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंह यांचे नाव अनेक रस्ते, संस्था यांना देण्यात आली आहेत.  त्यामागे कारणही खास आहे. जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंह यांनी ब्रिटीश काळात पोलंडमधील नागरिकांची अशी मदत केली आहे, की हे पोलंडवासी अद्यापही जामनगरच्या या महाराजाचे ऋण व्यक्त करतात.  (Jamnagar)

जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंह यांनी दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या नागरिकांना जामनगरमध्ये आश्रय दिला होता.  त्यामुळे पोलंडच्या संसदेचे अधिवेशन सुरू झाले की सर्वात आधी महाराजा दिग्विजय सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.   पोलंडमध्ये महाराजांची देवासारखी पूजा केली जाते. त्याच्या दयाळूपणाची कथा सांगितली जाते.  दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जामनगरच्या महाराजांनी शेकडो पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. महाराजांनी ६०० हून अधिक पोलिश मुले आणि महिलांना केवळ आश्रय दिला नाही तर आदराची वागणूक दिली.  या पोलीश मुलांना शाळेत दाखल केले. ही मुले आणि महिला अतिशय बिकट परिस्थितीत भारतात आली होती. (Jamnagar)

हिटलरने पोलंडवर आक्रमण केले तेव्हा पोलंडच्या सैनिकांनी ५०० स्त्रिया आणि सुमारे २००  मुलांना एका जहाजात पाठवले. आश्रय मिळेल अशा कोणत्याही देशात जा आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परत जा, असे सैनिकांनी त्यावेळी सांगितले होते.  पण पोलंडच्या नागरिकांना कोणत्याही देशात आश्रय मिळाला नाही.  हे जहाज भारतात मुंबईच्या किना-यावर पोहचले.  तेव्हा ब्रिटीशांची तिथे सत्ता होती.  त्यांनी या पोलीश नागरिकांना सहारा देण्यास नकार दिला.  ही गोष्ट महाराज जाम साहेब दिग्विजय सिंह यांच्या कानावर पडली.  महिला आणि मुलांचे होणारे हाल पाहून त्यांनी ब्रिटीश सरकारवर दबाब आणून या जहाजाला जामनगरच्या किना-यावर आणले.  या पोलीश नागरिकांसाठी त्यांनी आपल्या राज्यात रोझी बंदरावर एक मिनी-पोलंड बांधण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला महाराजांनी या मुलांना आणि महिलांना रहाण्यासाठी महाराजांनी तंबूची व्यवस्था केली.  त्याचवेळी महाराजांनी स्वत:च्या राजवाड्यापासून २५ किमी अंतरावर एक दुसरा राजवाडा बांधायला सुरुवात केली.  महाराजांनी  या राजवाड्यात पोलीश महिला आणि मुलांना रहाण्याची व्यवस्था केली.  त्यांच्या शिक्षणाचीही तरतूद केली.  महाराज या सर्वांना आपले कुटुंब मानत असत.  तब्बल ९ वर्ष ही मंडळी भारतात, जामनगरमध्ये राहीली.  महाराज या सर्वांची एवढी काळजी घेत असत की त्यांना प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थही माहित होते, असे सांगतात. (Jamnagar)

या सर्वांना भारतीय पदार्थ खाण्याची सवय नव्हती म्हणून महाराजांनी खास गोव्याहून त्यांच्यासाठी शेफ बोलावले होते. ९ वर्षानंतर जेव्हा युद्ध थांबले तेव्हा या पोलीश महिलांना परत त्यांच्या देशात बोलवण्यात आले.  तेव्हा महारांजांनी या सर्वांना भरपूर भेटवस्तू देऊन रवानगी केली.  तेव्हा या सर्व महिला आणि मुले महाराजांना बिलगून रडली होती.  पोलंडमधील प्रत्येकानेच महाराजा दिग्विजय सिंहांच्या दयाळूपणाचे आभार व्यक्त केले होते.  त्यामुळेच आजही पोलंडमध्ये आलेल्या योजनांना महाराजा दिग्विजय सिंह यांचे नाव देण्यात येते.  त्याच महाराजा दिग्विजय सिंह यांचे वंशज जाम साहेब शत्रुशल्य सिंह आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.