Home » इल्हान उमर आहे तरी कोण?

इल्हान उमर आहे तरी कोण?

by Team Gajawaja
0 comment
Ilhan Omar
Share

इल्हान उमर सोशल मिडियामध्ये आता हे नाव चर्चेत आले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांनी अमेरिकेच्या वादग्रस्त मुस्लिम खासदार इल्हान उमर यांची भेट घेतली आहे. इल्हान यांनी अनेकवेळा पीओके आणि हिंदूफोबिया संदर्भात वादग्रस्त विधाने केली आहेत. अमेरिका भेटीत याच इल्हान यांच्यासोबत राहूल गांधी यांनी भेट घेतल्यानं इल्हान उमर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे या इल्हान उमर या नेमक्या कोण आणि राहूल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली हा प्रश्नही उपस्थित होत आहे. इल्हान उमर या अमेरिकन खासदार भारतविरोधी विधानांसाठी ओळखल्या जातात. भारताच्या पक्क्या विरोधी नेत्या अशीच त्यांची ओळख आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत. इल्हान अनेक वेळा भारतविरोधी घोषणा दिल्या आहेत. (Ilhan Omar)

एवढ्यावरच इल्हान थांबल्या नाहीत तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीरलाही 2022 भेट देऊन पीओकेमध्ये भारताविरोधात वक्तव्ये केली आहेत. अर्थातच भारतविरोधी असलेल्या इल्हान या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही कट्टर विरोधक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन संसदेला संबोधित केलेल्या अधिवेशनावर इल्हान उमर यांनी बहिष्कार टाकला होता. त्याचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी भारत सरकारचे अल्पसंख्याकांबद्दलचे वागणे योग्य नाही. भारत सरकार हिंदू आणि राष्ट्रवादी गटांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेचा अमेरिकेतील भारतीय समुदायांनी विरोध केला होता. 40 वर्षीय इल्हान उमर या भारताविरोधी भूमिका घेण्यामुळे जेवढ्या ओळखल्या जातात, तेवढ्यात भारतातील अंतर्गत बाबींबाबत मत व्यक्त करण्यासाठीही ओळखल्या जातात. (Ilhan Omar)

खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंग नजर यांची हत्या भारत सरकारनं केल्याचा बेझूट आरोप इल्हान यांनी केला होता. तसेच या तपासात अमेरिकेने कॅनडाला मदत करावी असा सल्लाही त्यांनी दिला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात रेबर्न हाऊस ऑफिस बिल्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत इल्हान ओमरसह अनेक अमेरिकन खासदारांची भेट घेतली. मात्र, ओमरचे राहुलचे फोटो समोर आल्यानंतर राहूल गांधीवर विरोधकांकडून टिका करण्यात येत आहे. इल्हान उमर हे अमेरिकेतील मिनेसोटा येथील डेमोक्रॅट पक्षाच्या खासदार आहेत. इल्हान या अमेरिकन काँग्रेसचे सदस्य होणा-या पहिल्या आफ्रिकन निर्वासित आहेत. इल्हानचा जन्म सोमालियात झाला. सोमालियामध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान, त्याच्या कुटुंबाने सोमालिया सोडले आणि केनियातील निर्वासित छावणीत आश्रय घेतला. त्यावेळी इल्हान आठ वर्षांच्या होता. त्यांच्या कुटुंबाने केनियातील निर्वासित छावणीत जवळपास चार वर्षे घालवली. हे कुटुंब 1990 मध्ये अमेरिकेत आले. (Ilhan Omar)

इल्हानने अमेरिकेत आल्यावर राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. यासाठी त्यांच्या आजोबांनी त्यांना प्रेरणा दिल्याचे सांगितले जाते. 2016 मध्ये, इल्हान उमरने निवडणूक जिंकली आणि मिनेसोटा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 2019 मध्ये इल्हान मिनेसोटामधून खासदार म्हणून निवडून आल्या. मिनेसोटाचे प्रतिनिधित्व करणारी इल्हान उमर ही पहिली कृष्णवर्णीय महिला आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये पोहोचणाऱ्या दोन मुस्लिम-अमेरिकन महिलांपैकी इल्हान उमर देखील एक आहे. वैयक्तिक जिवनामुळे त्यांच्यावर अनेक वेळा टिका झाली आहे. कारण इल्हान यांनी त्यांच्या सख्या भावाबरोबर लग्न केल्याची माहिती आहे. अमेरिकन डेमोक्रॅट खासदार म्हणून इल्हान उमर यांची कारकिर्दही वादग्रस्त ठरली आहे. इल्हान यांनी 2022 मध्ये पाकिस्तानला भेट दिली. यादरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्येही त्या गेल्या आणि भारतासंदर्भात वादग्रस्त विधाने केली. (Ilhan Omar)

==============

हे देखील वाचा : रशियावर युक्रेनची आणि व्हॅक्यूम बॉम्बची एन्ट्री

===============

भारताने त्यांच्या या दौऱ्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करत निषेध व्यक्त केला. यानंतर बिडेन प्रशासनाला या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. भारताच्या तीव्र आक्षेपानंतर अमेरिकन सरकारने इल्हानच्या दौऱ्यापासून आपले हात आखडते घेतले. त्यांचा दौरा अमेरिकन सरकारने प्रायोजित केला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. इल्हान उमरचा दौरा पाकिस्तान सरकारने प्रायोजित केला होता, असे नंतरच्या अहवालातून समोर आले. इल्हान उमर यादरम्यान इम्रान खान यांना अनेकवेळा भेटल्याचीही माहिती नंतर समोर आली. भारताप्रमाणेच इल्हान यांचा इस्रायलला विरोध आहे. याच कारणामुळे त्यांना मतदानानंतर परराष्ट्र व्यवहार समितीतून काढून टाकण्यात आले आहे. इस्रायलबद्दलही त्यांनी टोकाच्या विरोधाची विधाने केली आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इल्हानवर आपल्या भावाशी लग्न केल्याचा आरोप केलाच, शिवाय त्यांच्यामुळे अमेरिकेची बदनामी होत असल्याचेही त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितले आहे. अशी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या इल्हान उमर यांची राहूल गांधी यांनी भेट घेतल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. (Ilhan Omar)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.