भारतीय सैन्यात भरती होण्याचे, लष्कराचा पोशाख घालण्याचे स्वप्न हजारो युवक-युवती बघतात. मात्र प्रत्येकालाच हे भाग्य प्राप्त होत नाही. सैन्यदलात सेवा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या तरुणाईसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने टूर ऑफ ट्युटी (Tour Of Duty) ची घोषणा केली आहे. यालाच अग्निपथ असं नाव दिलं आहे. या योजनेअंतर्गत सैन्यदलात भरती होणारे युवक ‘अग्निवीर’ या नावाने ओळखले जातील. (Agneepath Scheme)
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिल्लीमध्ये या योजनेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी तीनही लष्करी दलाचे प्रमुख उपस्थित होते. देशातील युवक-युवतींसाठी ही खूप मोठी संधी असल्याचे मानण्यात येते.
अग्निपथ योजनेअंतर्गंत चार वर्षांपर्यंत भरती होईल. चार वर्षांनंतर त्या जवानांना 10 लाख रुपये मिळतील. अग्निवीरांना त्यांच्या कार्यकाळानंतर प्रशस्तीपत्रक आणि डिप्लोमा देण्यात येईल. या नव्या व्यवस्थेनुसार भूदल, वायूदल आणि नौदलात प्रत्येक वर्षी 45 ते 50 हजार जणांची अधिकारी पदाच्या खालच्या पदावर नियुक्ती होईल. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोनदा केली जाईल.

यासाठी 17.5 वर्ष ते 21 वर्षांपर्यंतचे उमेदवार या योजनेअतर्गंत अर्ज करु शकतील. भरती झाल्यावर त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. उर्वरीत साडेतीन वर्ष या तरुणांना सैन्यात सेवा करता येईल. चार वर्षांचा सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यापैकी 25 टक्के जवानांना महिनाभरानंतर पुन्हा सैन्यात भरती करुन घेतले जाणार आहे. अर्थात यासाठी संबंधीत जवानाची चार वर्षाच्या सेवेच्या काळातील कामगिरी तपासली जाईल. (Agneepath Scheme)
या जवानांना सुरुवातीला 30 हजार रुपये महिना पगार मिळणार आहे. चौथं वर्ष पूर्ण होईपर्यंत हा पगार 40 हजारांपर्यंत जाणार आहे. या पगाराच्या 30 टक्के रक्कम बचत खात्यात ठेवली जाईल. म्हणजेच ती रक्कम सेवानिधीमध्ये जमा होईल. उर्वरित 70 टक्के पगार त्या जवानाच्या खात्यात जमा होणार आहे. एका सैनिकाला चार वर्षांच्या सेवेनंतर 10 ते 12 लाख रुपये मिळणार असून, ते करमुक्त असतील.
===========
हे देखील वाचा – भारतातील ‘हे’ आहेत सर्वाधिक श्रीमंत भिकारी, दिवसाला भीक मागून कमवतात हजारो रुपये
===========
या नव्या योजनेमुळं लष्कराच्या तिन्ही दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात, भूदल, हवाई दलात, नौदलात भरती झालेली नाही. लष्करात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (JCOs) ची एक लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आहे. या योजनेमुळं देशाच्या सर्व भागातून येणारे तरुण कोणत्याही रेजिमेंटचा भाग बनू शकतात. याशिवाय योजनेअंतर्गत तरुणांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचाही मानस आहे. (Agneepath Scheme)

10 वी किंवा 12 वीचे विद्यार्थी या सेवेअंतर्गत अर्ज करू शकणार आहेत. देशसेवेदरम्यान कोणत्याही अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना व्याजासह सेवा निधीसह 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘अग्नीपथ’ या योजनेअंतर्गत तरुणांबरोबच तरुणींनाही लष्करात सामील व्हायची सारखीच संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना सैन्याच्या कडक शिस्त झेपणार आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. (Agneepath Scheme)
– सई बने