बदलत्या युगात गावांमध्येही शहरी सुविधा दिसू लागल्या आहेत. गावामधील घरं पक्की झाली आहेत. दुमजली, तीनमजली घरं गावातही आहेत. शिवाय गॅससारख्या सुविधा आल्या आहेत. मात्र राजस्थानमध्ये एक असे गाव अद्याप आहे, जिथे एकही घर सिमेंट किंवा अन्य साधनांपासून बनवलेलं नाही. तर या गावातील प्रत्येक घर हे मातीपासून तयार झाले आहे. शिवाय या घरांवर गवताचे छप्पर आहे. विशेष म्हणजे, या गावातील मातींच्या घरांना दरवाजे नाहीत. तरीही या गावात दरोडा काय साधी चोरीही झालेली नाही. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील देवमाळी गाव हे जगावेगळे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या देवमाळी गावात आजही पूर्वजांचे इशारे आणि सूचनांचे पालन केले जाते. या गावातील प्रत्येक घरात करोडपती आहेत. पण त्यांची घरं ही साधी आहेत. शाकाहारी असलेलं हे गाव चुलीवर जेवण तयार करतं. या गावाची ख्याती ही देशात आणि परदेशातही आहे. त्यामुळेच राजस्थानच्या संस्कृतीचा आरसा म्हणून या गावाकडे बघितले जाते, आणि जगभरातील अनेक पर्यंटक या गावात पर्यटनासाठी गर्दी करत आहेत. या गावाला आता 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीत भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून गौरविण्यात येणार आहे. (Rajasthan)
राजस्थानमध्ये किल्ले आणि वाळवंट बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मात्र आता एक गावंही परदेशी पर्यटकांचे आवडीचे स्थान झाले आहे. या देवमाळी या गावाला भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गावाची अनोखी जीवनशैली आणि संस्कृती अनोखी असून त्याची भूरळ परदेशी पर्यटकांनाही पडली आहे. या गावाबद्दल अनेक अनोख्या अशा गोष्टी आहेत. या गावातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर एक इंचही जमीन नाही. हे देवमाळी गाव 3000 एकर जमिनीवर बसलेले आहे. मात्र या जमिनीचा मालक कोणीही नाही. गावातील गावक-यांच्या मते गावातील सर्व जमीन त्यांचे आराध्य दैवत भगवान देवनारायण यांच्या मालकीची आहे. भगवान देवनारायण हेच या जमिनीचे मालक असून त्यावर ताबा मिळवल्यास देवाचा कोप होईल, अशी भावना या लोकांची आहे. गावातील लोक वर्षानुवर्षे या गावात राहत आहेत. मात्र त्यांच्याकडे जमिनीच्या मालकीसंबंधीची कोणतीही कागदपत्रे नाहीत. गावातील नवीन पिढी या नियमांचे कठोरपणे पालन करते. (Social News)
एवढेच नाही तर या गावात एकही पक्कं घर नाही. गावातील सर्व घरे मातीची आहेत आणि या घरांवर गवताचे छत आहे. जशी गावातील घरे वेगळी तशीच या गावातील जनतेची जीवनशैलीही अनोखी आहे. या गावातील रहिवासी कधीही मांस, मासे खात नाहीत. संपूर्ण शाकाहरी असलेले या गावातील नागरिक कधीही दारुला स्पर्श करीत नाहीत. याशिवाय आणखी एक वैशिष्ट म्हणजे, येथे चुलींवर जेवण करण्यात येते. आणि चूल पेटवण्यासाठी रॉकेलचा आणि कडुलिंबाच्या लाकडचा वापर करण्यात येत नाही. कडुंलिंबाच्या झाडाची या भागात पुजा केली जाते. त्यामुळे कडुलिंबाच्या लाकडाचा वापर स्वयंपाकघरात करण्यात येत नाही. या गावातील घरांना दरवाजेही नाहीत. तरीही येथे चोरीची घटना झालेली नाही. गावाची काळजी ही टेकडीवरील भगवान देवनारायण घेतात अशी भावना लोकांची आहे. (Rajasthan)
======
हे देखील वाचा : चक्क कावळा आणि कुत्र्याची पुजा केली जाते !
====
या मंदिरामागेही एक आख्यायिका आहे. स्थानिक पौराणिक कथांनुसार, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा भगवान देवनारायण गावात आले तेव्हा त्यांनी स्वतःसाठी वेगळी जागा मागितली. त्यावेळी गावातील लोकांनी देवांना घर बांधून दिले. पण तेव्हाच देवांना इतर कोणालाही असे घर बांधून देणार नसाल तर इथे थांबतो, असे सांगितले. ग्रामस्थांनी देवाची मागणी मान्य केली, तेव्हापासून गावात फक्त देवाचे मंदिर पक्के बांधलेले आहे. बाकीची सर्व घरे ही मातीची आहेत. अगदी घराच्या बांधकामात काँक्रीट किंवा धातूच्या रॉडचाही वापर होत नाही. सुमारे 1500 लोकसंख्या असलेल्या देवमाळी गावात फक्त गुर्जर जातीचे लोक राहतात. यामध्येही लवडा गोत्राचे लोक येथे राहतात त्यांच्या आराध्या दैवतावर, भगवान देवनारायणांवर त्यांची मोठी श्रद्धा आहे. गावातील लोक पहाटे अनवाणी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालतात. देवमाळी गावच्या या डोंगरावरील सर्व दगड वाकलेले दिसतात. या टेकडीवरून कोणीही एक दगडही उचलत नाही. पशुपालन हा येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय आहे. अलिकडे या गावात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही राहण्याची सुविधा देण्यात येते. अर्थात त्यांनाही मातीच्या घरात राहता येते. स्थानिक भोजनाचा आस्वाद घेता येतो. गावातील अनोख्या पद्धतीमुळे हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. (Social News)
सई बने