Home » पक्षांच्या चिन्हांमुळे मतदारांचा गोंधळ ?

पक्षांच्या चिन्हांमुळे मतदारांचा गोंधळ ?

by Team Gajawaja
0 comment
Vidhansabha Election 2024
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आता विविध राजकीय पक्षांच्या तोफा धडाडणार आहेत. मात्र, या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एक मागणी केली होती, तिच्यावर आलेला निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. शरद पवार गटाने या निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती, परंतु आयोगाने ती फेटाळली आहे. लोकसभेत समान दिसणाऱ्या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बरीच मतं फिरली होती. त्यामुळे निवडणुकीत पक्षाचं चिन्ह हा पूर्वी पासून महत्त्वाचा फॅक्टर राहिला आहे. नेमका कसा? जाणून घेऊया. (Vidhansabha Election 2024)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे शरद पवार गटाचे अधिकृत नाव आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ चिन्ह असलेले घड्याळ त्यांच्याकडे गेले. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह योग्य नाही. ते मतपत्रिकेवर म्हणजे मतदान यंत्रावर छोटे दिसते. त्यामुळे ते मोठे करावे, अशी विनंती शरद पवार गटाने आयोगाला केली होती. त्याचबरोबर हुबेहूब तुतारीसारखे दिसणारे परंतु वास्तवात पिपाणी असलेले दुसरे चिन्ह हटविण्यात यावे, ही दुसरी विनंतीही या पक्षाने आयोगाकडे केली होती. यातील पहिली मागणी आयोगाने मान्य केली आहे. मतदान यंत्रावर चिन्ह कसं दिसावं, यासाठी पवार गटाने तीन पर्याय दिले होते, त्यापैकी पहिला पर्याय आयोगाने स्वीकारला आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी हे मात्र वेगवेगळे दिसतात. त्यामुळे ते हटवता येणार नाही, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. (Political News)

पवार गटाने ही मागणी करण्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत या दोन चिन्हांमुळे शरद पवार गटाला अनेक ठिकाणी फटका बसल्याचे सांगितले गेले. आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे निवडणूक चिन्ह दिले होते. तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यामध्ये मतदारांचा गोंधळ उडाल्याने अनेक मतदारसंघांमध्ये मतविभागणी झाली. सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर अशा अनेक मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्ह मिळालेल्या उमेदवारांनी 50-50 हजारांपर्यंत मते खेचली होती. दिंडोरी मतदारसंघामध्ये तर बाबू भगरे सर यांना 1 लाख 3 हजार 632 मते पडली होती. दुधाने तोंड पोळल्यानंतर आता पवार गटाला ताकही फुंकून प्यायचे आहे. विधानसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये ही या गटाची स्वाभाविक इच्छा आहे. (Vidhansabha Election 2024)

शरद पवार गटाची ही भीती अनाठायी नाही. असा प्रकार यापूर्वीही झाला आहे. याला एक प्रमुख उदाहरण म्हणजे शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि प्रख्यात अर्थतज्ञ दिवंगत शरद जोशी यांचे. भारतात 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण सुरू झालं. त्याला भाजपसह बहुतांश विरोधी पक्षांचा विरोध होता, कम्युनिस्टांचा तर प्रश्नच नाही. परंतु शेतकरी संघटनेने या आर्थिक उदारीकरणाचं मनापासून स्वागत केलं होतं. डंकेल प्रस्ताव म्हटल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या कराराला शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या मुक्तीचे साधन असं म्हटलं होतं. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे जगाचा बाजार खुला होईल. त्यातून श्रीमंत देशातील शेतकर्‍यांची अनुदाने कमी होतील, त्यामुळे तेथील शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाढून सर्वत्र शेतीमालाच्या किमती वाढतील. त्याचा फायदा भारतासारख्या विकसनशील आणि अविकसित देशांना मिळेल. या देशांमधून निर्यात वाढेल आणि शेतीमालाचे भावही वाढतील, असे त्यांचे म्हणणे होते. (Political News)

शरद जोशी यांनी अनेकदा निवडणूक लढवली होती. मात्र हा करार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा ते नांदेड लोकसभा मतदारसंघात 1996 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी त्यांना मोटरसायकल, म्हणजे ग्रामीण भाषेत बुलेट, हे चिन्ह मिळालं होतं. गंगाधरराव कुंटूरकर हे काँग्रेसकडून तर धनाजीराव देशमुख हे भाजपकडून उमेदवार होते. त्या निवडणुकीत देशमुखांचा पराजय करून कुंटूरकर विजयी झाले, तर शरद जोशी हे चक्क चौथ्या स्थानावर घसरले. आपल्या या पराभवानंतर शरद जोशी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात मोठी मार्मिक टिप्पणी केली होती. (Vidhansabha Election 2024)

जोशी म्हणाले होते, माझ्या निवडणूक चिन्हाचा फटका मला बसला. माझ्या एका प्रतिस्पर्ध्याचे चिन्ह सायकल होते आणि माझे मोटरसायकल. परंतु ही दोन्ही चिन्हे एवढी एकसारखी होती की मतदारांना त्यात फरक करता आला नाही. त्यामुळे माझी अनेक मते त्या दुसऱ्या उमेदवाराला पडली, असे या निवडणुकीचे विश्लेषण करताना मला सांगण्यात आले. त्यानंतरचे जोशी यांचे वाक्य मोठे मार्मिक होते. त्यांनी लिहिले होते, की ज्या मतदारांना सायकल आणि मोटरसायकलमधला फरक कळत नव्हता त्यांना मी नेहरूवादी अर्थव्यवस्था आणि डंकेल प्रस्ताव यावरचे विवेचन समजावून सांगत होतो. भारतातील बहुतांश मतदार अजूनही चिन्हांच्या आधारेच मतदान करतात. म्हणून तर राजकीय पक्षांच्या चिन्हांना एवढं महत्त्व आहे. या चिन्हांचे अनेक अर्थही काढले जातात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेसच्या नेत्या म्हणून ओळखले जाते. परंतु त्या मूळ काँग्रेसच्या नेत्या नाहीत, हे अनेकांना ठाऊक नसते. मूळ काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष असलेल्या एस. निजलिंगप्पा यांनी १९६९ मध्ये इंदिरा गांधी यांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढले होते. (Political News)

थोडक्यात त्यांची हकालपट्टीच केली होती. त्यानंतर इंदिरा गांधींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. मूळ काँग्रेस पक्षाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ऑर्गनायझेशन किंवा संघटना काँग्रेस हे नाव मिळाले. त्या एकसंघ काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी हे होते. सध्या वादात असलेल्या घड्याळ किंवा धनुष्यबाण यासारखेच ते बैलजोडी हे चिन्हही वादात सापडले होते. त्यामुळे ते गोठवून इंदिरा गांधींच्या गटाला ‘गाय-वासरू’ हे चिन्ह देण्यात आले. इंदिरा गांधी गटाने या नवीन चिन्हासह निवडणूक लढविली. तेव्हा काँग्रेसमधील त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाने आणि इतर विरोधी पक्षांनी हिंदूंचे अनुनय करण्यासाठी गायीच्या प्रतिमेचा वापर केला जात असल्याचा आरोप केला होता. त्याच्यावर खटलेबाजीही झाली. गुजरात उच्च न्यायालयाने या संबंधातील एक याचिका 1972 मध्ये फेटाळून लावताना “गाय किंवा वासराचे प्रतिमा वापरणे हे कोणत्याही धर्माचे प्रतीक नाही,” असे स्पष्ट केले. (Vidhansabha Election 2024)

पुढे 1971 मध्ये इंदिरा गांधींनी याच चिन्हाच्या आधारे निवडणूक लढवून प्रचंड विजय मिळविला. त्यावेळी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले होते. तेव्हा एक गमतीशीर घोषणा देण्यात आली होती – हा विजय गाईचा, बाईचा की शाईचा? इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा हाच पक्ष सत्तेत होता. आणीबाणीनंतर यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी जेव्हा इंदिरा गांधी यांची साथ सोडली तेव्हा हाच पक्ष फोडून इंदिरा गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) हा पक्ष स्थापन केला. यालाच आय काँग्रेस असे म्हटले जात असे. (Political News)

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या हातून इंदिरा गांधी यांना पराभव पत्करावा लागला. ते सरकार लगेचच कोसळल्यानंतर इंदिरा गांधींनी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष सुरू केला. आपला पक्ष हीच खरी काँग्रेस असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र तोपर्यंत पक्ष फुटल्यामुळे त्यांचे ‘गाय-वासरू’ हे चिन्ह गोठवण्यात आले होते. इंदिरा गांधी तेव्हा नवीन चिन्हाच्या शोधात होत्या. निवडणूक आयोगाने त्यांना अनेक चिन्हांचा पर्याय दिला होता. त्यापैकी एक पर्याय होता हात, तो त्यांनी निवडला. त्याची एक गमतीशीर कथा सांगितली जाते. केरळमधील कलैकुलंगारा येथील कैपथी मंदिर किंवा हेमाम्बिका देवीच्या मूर्तीवरून हे हाताचे चिन्ह घेतले आहे, असे म्हटले जाते. (Vidhansabha Election 2024)

======

हे देखील वाचा :  आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहायचं वाकून

======

या मंदिरात देवीची प्रतिमा आशीर्वाद देणाऱ्या दोन हातांच्या स्वरूपात आहे. केरळमधील एका महिला नेत्याच्या सूचनेवरून त्यांना ते चिन्ह आवडले. याच चिन्हावर त्यांनी चिकमंगळूर येथून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. तो राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या पुनरागमनाचा आरंभ होता, असे मानले जाते. राजकीय चिन्हांच्या अशा अनेक कथा आणि श्रद्धा असल्यामुळे घड्याळ या चिन्हाबाबत शरद पवार आग्रही असणे फारसे आश्चर्याचे नाही. काही झाले तरी दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी हे चिन्ह मतदारांमध्ये रुजविण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यावर आपलीच मालकी आहे, असे त्यांना वाटले तर त्यात चूक नाही. (Political News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.