उत्तर प्रदेशमध्ये सध्या थंडीचा कडाका असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) थेट भाजपाच्या मंडपात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
अपर्णा यादव ही मुलायम सिंह यांची सून उच्चशिक्षित असून उत्तम गायिकाही आहे. अपर्णाचे पती प्रतीक यादव हे राजकारणापासून दूर असले तरी अपर्णा मात्र राजकारणात येण्यासाठी इच्छूक आहे. गेल्या विधानसभेत अपर्णाला पराभूत व्हावे लागले तरीही ती चर्चेत होती.
बहुमतानं निवडून आलेल्या योगी सरकारचे तिने जाहीर अभिनंदन केलेच. शिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊनही त्यांना शुभेच्छा दिल्या. एका संस्थेमार्फत महिलांसाठी कार्य करणारी ही मुलायम सिंह यांची धाकटी सून सध्या उत्तरप्रदेशच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

अपर्णा यादव यांना जाणून घेण्यासाठी प्रथम यादव कुटुंबातील नातेसंबंधाला जाणून घ्यावे लागेल. मुलायम सिंह आणि मालती देवी यांचे पुत्र अखिलेश यादव. अखिलेश हे मुलायम सिंह यांच्या पक्षाचे आणि राजकीय कारकर्दीचे वारस मानले जातात. यामध्ये एक मोठं वादळ आलं ते साधना गुप्ता या नावाने.
साधना या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. साधना यांना प्रतीक नावाचा मुलगा होता. प्रतीक दोन वर्षाचा असताना मुलायम सिंह यांनी साधना गुप्ताबरोबर विवाह केल्याचे सांगण्यात येते. मात्र मुलायम सिंह यांची उत्तरप्रदेशमधील राजकारणातील वरचष्मा पाहता हे नातं खूप वर्ष गुप्त ठेवण्यात आलं होतं. दरम्यान प्रतीकच्या नावापुढे वडीलांचं नाव फक्त एम. असं लावण्यात येत होतं. शाळेतही त्याचा पत्ता समाजवादी पक्षाच्या कार्यालयाचा होता.
जेव्हा मुलायम सिंह यांच्या पत्नी मालती देवी यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी आपल्या दुसऱ्या लग्नाचा खुलासा केला. प्रतीकच्या रुपाने आपल्याला अन्य राजकीय प्रतीस्पर्धी आल्याची जाणीव तेव्हा अखिलेश सिंह यांना झाली. त्यादरम्यान अखिलेश यांचाही समाजवादी पक्षावर वरचष्मा वाढत होता.

कुटुंबात या दुसऱ्या लग्नामुळे दरी पडू नये म्हणून मुलायम सिंह यांनी प्रतीक यांना राजकारणापासून दूर ठेवत अखिलेश यांच्याकडे समाजवादी पक्षाची धुरा दिली. प्रतीक यांनीही राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले. रिअल इस्टेटमध्ये त्यांनी आपले काम सुरु केले. प्रतीक स्वतः व्यायामाचा आणि स्पोटर्स गाड्यांचा शौकीन आहेत. लॅम्बोर्गिनीसारखी गाडी त्यांच्या ताफ्यात आहे. यातच प्रतीक व्यस्त राहीले. मात्र या सर्वांत एक वादाची ठिणगी पडली ती अपर्णा यादव यांच्या एंन्ट्रीमुळे.
प्रतीक यांच्या पत्नी असलेल्या अपर्णा या पहिल्यापासून राजकाराबाबत उत्सुक होत्या. मात्र अखिलेश यांनी कधीही अपर्णा यांना पक्षात सामावून घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. उलट त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांना लोकसभेची उमेदवारी देत पक्षामध्ये महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट केले.
अपर्णाचे वडील अरविंद सिंह बिस्ट यांनी मान्यवर पत्रकार आहेत तसंच त्यांनी मुलायम सिंह सरकारमध्ये सूचना आयुक्त म्हणून काम केले आहे. अंबा बिस्ट या त्यांच्या आई असून त्या लखौनो नगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर होत्या.
अपर्णा आणि प्रतीक एकाच शाळेमध्ये होते. दोघेही शालेय जीवनापासून चांगले मित्र! पुढे या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. तोपर्यंत अपर्णा यांना प्रतीकच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची कल्पना नव्हती. दरम्यान त्यांनी मॅचेस्टर युनिर्व्हसिटी ब्रिटन येथून ‘इंटरनॅशनल रिलेशन अँड पॉलिटीक्स’ या विषयात मास्टर डिग्री घेतली. त्या स्वतः उत्तम गायीका आहेत. भातखंडे संगीत विश्वविद्यालयात त्यांनी सलग नऊ वर्ष प्रशिक्षण आणि संगिताच्या परीक्षा दिल्या आहेत.

प्रतीक आणि अपर्णा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. मात्र दोघंही लग्न करणार या भूमिकेवर ठाम राहिले. शेवटी मुलायमसिंह यांनी पुढाकार घेत प्रतीक आणि अपर्णा यांचे लग्न लावून दिले. या लग्नाचा सोहळा खूप दिवस चर्चेचा विषय होता. अमिताभ बच्चन पासून अनेक बॉलिवूड स्टार या फाईव्ह स्टार विवाह सोहळ्याला उपस्थित होते.
अपर्णा यादव (Aparna Yadav) यांचा स्वभाव रोखठोक. प्रथमपासूनच त्यांनी आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. समाजकार्यात त्या सक्रीय राहिल्या. त्यातूनच विधानसभेसाठी त्यांनी समाजवादी पक्षाकडे तिकीट मागितले. अखिलेश यांचे तेव्हा पक्षावर वर्चस्व होते. त्यांनी अपर्णाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मात्र मुलायम सिंह यांनी अपर्णासाठी आग्रह धरला.
शेवटी २०१७ विधानसभेच्या निवडणुकीत लखनौ कैंट मध्ये समाजवादी पक्षाकडून अपर्णा यादव यांनी तिकीट मिळाले. ही जागा जाहीर झाली तेव्हाच अनेकांनी इथला निकालही सांगितला. कारण कैंट मतदार संघात कधीही समाजवादी पक्षाला यश मिळाले नाही. अखिलेश सिंह यांनी मुद्दाम हा मतदारसंघ अपर्णाला दिल्याचे बोलले गेले. त्यातच अपर्णाच्या प्रचारासाठी मुलायमसिंह यांची प्रचारसभा झाली. पण अखिलेश कधीही या मतदारसंघात फिरकले नाहीत.
हे ही वाचा: आठवणीतले एन.डी.पाटील: दाजी जेव्हा उनाड मुलांनाही शाबासकी देतात….!
वादग्रस्त आयुष्यापलीकडील तत्ववेत्ते ओशो (Osho)
अर्थात अपर्णा यादव (Aparna Yadav), भाजपा उमेदवार रीता बहुगुणा यांच्याकडून पराभूत झाल्या. पराभूत झाल्यावरही अपर्णा आपल्या मतदार संघाला विसरल्या नाहीत. त्यांनी महिलांसाठी संस्था काढली असून त्याद्वारे त्या समाजकार्यात सक्रीय राहिल्या. याशिवाय अपर्णा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना आपला मोठा भाऊ म्हणून संबोधतात. त्यांनी योगी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेचेही कौतुक केले. या सर्वांमुळे कायम वादात राहिलेल्या अपर्णा पुन्हा यावेळेच्या निवडणुकीमध्ये सक्रीय झाल्या. मात्र समाजवादी पक्षाकडून किंबहुना अखिलेश यादव यांच्याकडून पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी भाजपाची वाट पकडली.
हे देखील वाचा: डोकं चक्रावून टाकणारे जगातील ५ विरोधाभास! बघा तुम्हाला काही सुचतंय का?
आक्रमक विचारांच्या आणि तेवढ्याच अभ्यासू असलेल्या अपर्णा यादव (Aparna Yadav) आता भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरतीलही किंवा विधानपरिषदेसाठी भाजपाच्या उमेदवार राहतील. सध्यातरी कुठलेही राजकीय वजन नसले तरी मुलायम सिंह यांची सून म्हणून अपर्णा यादव सध्यातरी उत्तरप्रदेशच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत हे नक्की.
– सई बने