“प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीअसते”, हे आजपर्यंत आपण ऐकलं आहे. मग ती महिला पुरुषाची आई, बहीण, मुलगी, किंवा मग बायको असू शकते. उदाहरणच घ्यायचं झालं तर, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले किंवा मग “में मेरी झांशी नहीं दूंगी” असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारी झाशीची राणी (Rani of Jhansi).
भारताला खूप मोठा इतिहास लाभला आहे. आजपर्यंत अनेक महिलांनी आपलं कतृत्व सिद्ध केलं आहे. तरीही सर्वात आधी आपण याच महिलांची नावे का घेतो? याचा विचार आपण कधी केला आहे का? या महान महिलांचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहीत आहे का? नाही ना? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वीरांगना झाशीच्या राणीच्या (Rani of Jhansi) आयुष्यातील कोणालाच माहीत नसलेल्या काही अपरिचित गोष्टी सांगणार आहोत.
१. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे झाशीची राणी म्हणून सर्वाना परिचित असणाऱ्या या राणीचे लग्नाअगोदरचे खरे नाव मणिकर्णिका तांबे असे होते. सर्वजण त्यांना लाडाने मनू म्हणतअसत, तर त्यांचे वडील त्यांना लाडाने छबीली म्हणत असत.
२. माणिकर्णिका यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील भदैनी येथे मोरोपंत व भागीरथीबाईं यांच्या पोटी दि. १९ नोव्हेंबर १८२८ ला झाला होता.
३. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. पण माणिकर्णिकाचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांकडे कामाला असल्याने आणि वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी लहानग्या मनूच्या डोक्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले. त्यामुळे लहान माणिकर्णिकाचे बालपण बाजीराव पेशव्यांच्या मुलांसोबत गेले.
४. राणी माणिकर्णिका धनुर्विद्या, आत्मरक्षणाचे धडे, तलवार चालवणे, भालाफेक, बंदुकीने निशाणा लावणे अशा सर्व गोष्टी शिकल्या होत्या. तसेच त्यांना कुस्ती, मल्लखांब या सारखे व्यायामही करायला आवडत असत. त्या शस्त्रविद्येत पारंगत तर होत्याच, शिवाय त्या एक उत्तम घोडेस्वार देखील होत्या.
५. अशा या राणीचा विवाह वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई नेवाळकर असे ठेवण्यात आले. पुढे १८५१ ला त्यांना पहिले पुत्ररत्न झाले. पण ते मुल अवघ्या ४ महिन्यातच मृत्यू पावले. त्यामुळे पुढे त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले व त्याचे नाव आनंदराव असे ठेवले. नंतर हे नाव बदलून गंगाधरराव असे ठेवण्यात आले.
६. पुढे जाऊन काही काळातच महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये, म्हणून राणीने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले. त्यानंतर अवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या. (Rani of Jhansi)
७. राणी लक्ष्मीबाई या सैन्य कार्यात कायम उत्साही होत्या. या कार्यात त्या निपुणदेखील होत्या. लक्ष्मीबाईंना घोड्यांची चांगली पारख होती. मोठ-मोठे राजे देखील त्यांच्या घोडेस्वारीचं कौतुक करत असत. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड राणी लक्ष्मीबाईंना माहीत होते. त्या काळी पूर्ण भारतामध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता.
८. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील राणी लक्ष्मीबाई अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
९. ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख ‘हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ असा केला. तसेच राणी लक्ष्मीबाईंनी लढलेल्या युद्धात ह्युज रोज हा वरिष्ठ ब्रिटीश आर्मी ऑफीसर होता. त्याने राणीचे वर्णन चाणाक्ष, सुंदर आणि देखण्या असे केले होते.
१०. अशा या धाडसी वीरांगनेला १८ जून १८५८ रोजी कोटा येथील सराई नजीक ग्वालियर मधल्या फुलबाग येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांची शेवटची इच्छा होती, “कोणताही इंग्रज मला माझ्या देहाला स्पर्श करणार नाही” आणि झालंही तसच.
११. झाशीच्या राणीचा राजवाडा राणीचा महाल म्हणूनही ओळखला जातो. आता त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे.
तर असा होता झाशीची राणी लक्ष्मीबाईचा संघर्षमय धाडसी जीवनप्रवास!
– निवास उद्धव गायकवाड