भारतातील शक्तिदेवतांच्या पीठांपैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहेत. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर (Tuljapur) हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे.
तुळजाभवानी (Tulja Bhavani Temple) देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.
धार्मिक आख्यायिका
कृतयुगाच्या वेळी ‘कर्दम’ ऋषींची पत्नी ‘अनुभूती’ हिच्याबद्दल ‘कुंकुर’ नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती ही धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. भक्ती आणि शक्तीचा अविष्कार असणार्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरीपर्यंत चालतो.
ऐतिहासिक महत्व
स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.
देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असून अगदी जवळ गेल्या खेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण एकवीस दिवस साजरा करतात.
मंदिरचे भौगोलिक स्थान
तुळजापूर गाव उस्मानाबाद जिल्ह्यात बालाघाट डोंगराच्या एका पठारावर आहे. मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवर्या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत.
त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) केले आहे असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही अष्टभुजा असून गंडकी शिळेपासून बनवली आहे. तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप तरीही विलोभनीय आहे.
तुळजाभवानीची मूर्ती चल असून ती वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरून हलवली जाते.
पोहोचणार कसे
सोलापूर येथून ४५ कि. मी. आहे. उस्मानाबाद – तुळजापूर अंतर २२ कि. मी. आहे. रेल्वेने सोलापूर किवा उस्मानाबादला पोहचू शकता. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. श्री देविचे मंदिर तुळजापूर बस स्थानकापासून पश्चिम बाजूस ५०० मीटर च्या अंतरावर आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.
हे देखील वाचा: महालक्ष्मी मंदिर – कोल्हापूर
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.