भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह ज्या मंदिरात झाला होता, त्या मंदिरात विवाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येत आहे. हे मंदिर म्हणजे त्रियुगी नारायण मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात विवाह करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. भगवान विष्णूने त्रियुगी नारायण मंदिरात भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह करुन दिला. विष्णूला समर्पित असलेले हे मंदिर आता शिव आणि पार्वतीच्या विवाहासाठी अधिक प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, येथे लग्नासाठी मार्च 2024 पर्यंत बुकिंग फुल झाले आहे.
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील स्थानिक भाषेत या मंदिराला त्रिजुगी नारायण मंदिर म्हणतात. या मंदिरात वर्षानुवर्षे अग्निकुंड जळत असल्याने याला अखंड धुनी मंदिर असेही म्हटले जाते. मंदिराच्या प्रांगणात सरस्वती कुंड, रुद्र कुंड, विष्णू कुंड आणि ब्रह्मा कुंड आहेत. त्रियुगी नारायण मंदिराबाबत असे सांगितले जाते की, या दिव्य मंदिरात भगवान विष्णूने मात पार्वतीच्या भावाची भूमिका पार पाडली.
येथेच शिव-पार्वतीचा विवाह झाला. या दिव्य विवाहात भगवान ब्रह्मदेवांनी आचार्यांची भूमिका पार पाडली होती. याच मंदिरात वर्षानुवर्षे अग्निकुंड धगधगत आहे. असे मानले जाते की, ही तीच अग्नी आहे ज्याच्या भोवती शिव आणि पार्वतीने लग्नाच्यावेळी फेरे घेतले होते. आजही त्यांच्या फेऱ्यांची आग धुनीच्या रूपाने तेवत आहे. लग्नासाठी आलेल्या इतर देवी-देवतांनी या मंदिर परिसरातील कुंडात स्नान केले होते. त्यामुळे या मंदिर परिसराला अतिशय पवित्र मानण्यात येते. मंदिरात येणारे भाविक येथे या अग्निकुंडात लाकडे अर्पण करतात आणि या अखंड धुनीची रक्षा आपल्या सोबत घेऊन जातात. यामुळे देव-देवतांचा आशीर्वाद सोबत असल्याचे मानण्यात येते.
मंदिरात 40 हजार रुपयांमध्ये विवाह करण्यात येतो. मात्र यासाठी किमान महिनाभर तरी आधी बुकींग करावे लागते. उत्तराखंड सरकारने 2018 मध्ये त्रियुगीनारायण मंदिर डेस्टिनेशन वेडिंग वेन्यू म्हणून सुरू केले. यामागे दूर-दूरवरून लोकांनी मंदिरात लग्न करण्यासाठी यावे आणि त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळावा, परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी, हा हेतू होता. डेस्टिनेशन वेडिंग पॉईंटच्या घोषणेनंतर, अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या मंदिरात विवाह केला आहे. आता सद्यपरिस्थितीत मार्च 2024 पर्यंत मंदिर परिसरात विवाह करण्यासाठी बुकींग करण्यात आले आहे.
मंदिरात वर्षभर देश-विदेशातून लोक लग्नासाठी येतात. यासाठी प्रथम मंदिरात लग्न करण्यासाठी 1100 रुपयांत नोंदणी करावी लागते. लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्याच्या पालकांची सहमती असणे आवश्यक आहे. यासोबतच वधू-वरांचे आधार कार्ड आणि फोन नंबरही मंदिर समितीकडे नोंदवावे लागतात. मंदिरात लग्नाची निश्चित तारीख ठरवून जोडप्यांना समितीद्वारे कळवली जाते, त्यानंतरच येथे विवाह होतात. शुभ मुहूर्त पाहून मंदिरात लग्नाची वेळ ठरवली जाते. याची सर्व व्यवस्था मंदिरातील पुजा-यांकडून केली जाते.
विजयादशमी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात लग्नासाठी अनेक जोडपी येतात. कोणत्याही जोडप्याला मंदिरात लग्न करायचे असेल तर त्यांना मंदिराजवळील पुजारी सोसायटीच्या कार्यालयात नोंदणी प्रथम करावीच लागते. मंदिरात वर्षभरात सुमारे 200 विवाह होतात. लग्न करण्यासाठी जोडप्यांना एकूण 40,000 रुपये खर्च होतो. मात्र मंदिर परिसरात जास्त नातेवाईक आणण्यास मज्जाव आहे. ज्यांचा विवाह आहे, त्यांना फक्त 30 व्यक्ती सोबत आणण्याची परवानगी मिळते.
==========
हे देखील वाचा : ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ साठी आलियाच्या कास्टला सिद्धार्थ, वरुण धवनने दिला होता नकार
==========
त्रियुगीनारायण मंदिर हे कधीपासून आहे, याबाबत अनेक आख्यायिका आहेत. तीन युगांपासून या मंदिराचे अस्तित्व असल्याचे सांगण्यात येते. त्रियुगीनारायण मंदिरात भगवान नारायण भूदेवी आणि लक्ष्मी देवीसोबत विराजमान आहेत. मंदिर भगवान विष्णूचा पाचवा अवतार वामन अवतार यांना समर्पित आहे. मंदिरासमोरील ब्रह्मशिला हे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दैवी विवाहाचे वास्तविक स्थान मानले जाते. सरस्वती गंगा नावाचा प्रवाह मंदिराच्या प्रांगणात उगम पावतो. येथूनच जवळचे सर्व पवित्र तलाव भरले आहेत. रुद्रकुंड, विष्णुकुंड, ब्रह्मकुंड आणि सरस्वती कुंड अशी तलावांची नावे आहेत. रुद्रकुंडात स्नान, विष्णुकुंडात मार्जन, ब्रह्मकुंडात आचमन आणि सरस्वती कुंडात तर्पण करण्यात येते.
तीन युगांपासून भाविक येथील अग्निकुंडातील अग्नीला लाकूड अर्पण करत आहेत. म्हणूनच या स्थानाला “त्रियुगी नारायण” असे नाव पडले आहे. अशाच पवित्र मंदिरात विवाहबंधनासाठी येणा-या तरुणांची संख्या वाढली आहे.
सई बने