Home » रायगड किल्ल्यावर ढगफुटीसदृश पाऊस

रायगड किल्ल्यावर ढगफुटीसदृश पाऊस

by Jyotsna Kulkarni
0 comment
Heavy Rain At Raigad Fort
Share

जून महिना संपला तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व लोकं चिंतेत होते. जुलै महिन्यात तरी भरपूर पाऊस पाडवा अशी सर्वांची इच्छा होती. हीच इच्छा आता पूर्ण होत आहे. सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होत असून, त्यामुळे बळीराजा सुखावला आहेत, मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मात्र पाऊस सुरु झाला आणि लोकांच्या उत्साहाला उधाण आले. (Heavy Rain At Raigad Fort )

पावसाळा लागला की, अनेकांना पावसाळी सहलींना, ट्रेकिंगला जायला आवडते. अशातच राज्यातल्या, देशातल्या विविध ठिकाणी लोकं पावसाचा आनंद घेण्यासाठी पोहचतात. विविध धबधबे, गड, किल्ले, घाट अशा ठिकाणी जाण्यासाठी लोकांची पसंती असते. मात्र अनेकदा या सहली आपल्या अंगाशी येत जीवघेण्या ठरतात. अचानक पाऊस येतो, पाण्याची पातळी वाढते, निसरड्या वाटा आदी अनेक कारणांमुळे पर्यटक आपला बहुमूल्य जीव गमावून बसतात. अशीच एक घटना घडली आहे किल्ले रायगडवर.

सध्या कोकणासह, मुंबई, पुणे जिल्ह्यात चांगलाच पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेकांनी रायगडावर गर्दी करत निसर्गाचा आणि पाऊसाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र रायगडावर या आनंदाचा बेरंग झाला आणि एक दुर्दैवी घटना घडली. रायगड किल्ले परिसरात रविवारी सायंकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पाऊसामुळे इतिहासात पहिल्यांदाच रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांवरून रौद्र स्वरुपात पाणी वाहू लागल्याचे चित्र होते. (Heavy Rain At Raigad Fort )

रायगड किल्ल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहे. या पाऊसामुळे किल्ल्यावर आलेले सर्वच पर्यटक अडकले होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाणी पाहून अंगाचा थरकाप उडत आहे. प्रचंड वेगाने हे पाणी पायऱ्यांवरून खाली येत असून, किल्ल्यावरून खाली दरीमध्ये पडणारे पाणी देखील भयावह आहे. या पाण्यातून चालणे देखील अशक्य असून, थोडा जरी तोल गेला तरी माणूस वाहून जाण्यास एक क्षणही लागणार नाही, अशी परिस्थिती रायगडावर निर्माण झाली होती.

दुर्दैवाने या अचानक आलेल्या पाऊसामुळे किल्ल्यावरून जे पाणी वाहत होते त्यात एक जण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. मनोज खोपकर वय ४० असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून, ही व्यक्ती किल्ल्याच्या टकमक टोकावरील धबधब्यावरून वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या पाऊसामुळे किल्ल्यावर अडकलेल्या सर्व पर्यटकांना रायगडावर असलेल्या रोपवे ने खाली उतरवण्यात येत आहे.

=======

हे देखील वाचा : तुमच्या परवानगीशिवाय कोणीही बंद करुच शकत नाही Smartphone, नोट करा ही सेटिंग

=======

दरम्यान या घटनेनंतर आता प्रशासनने खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून अर्थात 8 जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद केला आहे. 31 जुलैपर्यंत रायगड किल्ला हा पर्यटकांसाठी बंद असणार आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाण्याचा मुख्य रस्ता असणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग टाकून बंद करण्यात आला असून, रायगड किल्ले परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. सोबतच गडावर जाण्यासाठी असणारा रोप वे देखील बंद करण्यात आला आहे. (Heavy Rain At Raigad Fort )

दरम्यान ७ जुलै रोजी रविवार असल्याने सगळ्यांना सुट्टी होती. पाऊस आणि सुट्टी हा योग्य साधत रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. दुपारच्या वेळेला जेव्हा हे सर्व पर्यटक खाली उतरत असताना ही घटना घडली. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास किल्ले रायगड भागात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर एवढा वाढला की पाण्याचे लोंढेच्या लोंढे किल्ल्यावरून खाली अतिशय मोठ्या वेगाने कोसळू लागले होते. प्रशासनाकडून देखील नागरिकांना पावसात घराबहर न पाडण्याचे आवाहन केले गेले आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.