Home » प्रयागराजमध्ये हजारो दिव्यांची रोषणाई !

प्रयागराजमध्ये हजारो दिव्यांची रोषणाई !

by Team Gajawaja
0 comment
Maha Kumbh Mela
Share

हिंदू धर्मातील सर्वात पवित्र यात्रा म्हणजे, महाकुंभमेळा. दर बारावर्षांनी येणारा महाकुंभ मेळा पुढच्यावर्षी प्रयागराज येथे संपन्न होणार आहे. यासाठी उत्तरप्रदेश सरकार मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे. जानेवारी 2025 च्या मकरसंक्रातीपासून हा महाकुंभ सुरु होणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ चालणार असून यात तब्बल 40 कोटी भाविक येतील असा अंदाज लावण्यात आला आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात येणा-या भाविकांच्या व्यवस्थेची तयारी सुरु करण्यात आली आहे. महाकुंभमध्ये पवित्र नदीमधील स्नानाला महत्त्व असते, हे लक्षात घेऊन प्रयागराजमध्ये रात्रभर 40 हजार रिचार्जेबल दिवे लावण्यात येणार आहेत. हे दिवे आपोआप चार्ज होणार आहेत. दिवसा हे दिवे चार्ज होतील, आणि रात्रभर ते प्रकाशमान होतील. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार असून सोबत रात्रभर प्रयागराजमधील घाट प्रकाशमानही राहणार आहेत. त्यामुळे प्रयागराजमध्ये येणा-या भाविकांना रात्रीही घाटावर जाणे शक्य होणार आहे.
प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु झाली आहे. (Maha Kumbh Mela)

ही तयारी करतांना भाविकांच्या सोयीचा प्रथम विचार करण्यात येत आहे. यातूनच यावेळी प्रयागराजमध्ये अनेक प्रकारे 40 हजारांहून अधिक रिचार्जेबल दिवे बसवण्याचे काम जोरात सुरु आहे. महाकुंभमेळ्यात येणा-या भाविकांना सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीही माता यमुनेचे दर्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच घाट 24 तास प्रकाशमान राहणार आहेत. हे बल्ब स्वतः रिचार्ज होतात आणि वीज खंडित होत असतानाही प्रकाश पुरवत राहतात. त्यामुळे काही बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला तर या दिव्यांपासून होणारा उजेड यात्रेकरुना पुरेसा पडणार आहे. महाकुंभ परिसरात आणि उत्तर प्रदेशमधील प्रमुख धार्मिक स्थळांमध्येही अशाच प्रकारच्या दिव्यांचा वापर करण्याची योजना आता उत्तरप्रदेश सरकार आखत आहे. रिचार्ज करण्यायोग्य बल्बमध्ये इनबिल्ट बॅटरी असते, जी पॉवर फेल झाल्यास चार्ज होत राहते, ही बॅटरी बल्बला प्रकाशमान ठेवते. त्यामुळे महाकुंभसाठी उभारण्यात येत असलेल्या मोठ्या मोठ्या तंबूंमध्ये अंधाराची परिस्थिती येणार नाही. (Social News)

महाकुंभमेळा परिसरात सुरू असलेल्या विद्युत विभागाच्या प्रकल्पातून या बल्बसाठी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. या रिचार्जेबल बल्बची किंमत 600 ते 700 रुपयांदरम्यान असते. अशा स्थितीत ४५ हजार बल्ब बसवण्यासाठी सुमारे 2.7 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र या बल्बची गुणवत्ता बघून अन्य तिर्थस्थळांवरही या बल्बचा वापर करण्यात येणार आहे. रिचार्जेबल बल्बचा वापर प्रथमच महाकुंभ मेळ्यात होत आहे. या मेळ्याला देशभरातून नाही तर जगभरातून तिर्थयात्री येतात. लाखो पर्यटक फक्त महाकुंभ म्हणजे काय, हे बघायला येतात. या सर्वांची सोय चांगल्याप्रकारे व्हावी यासाठी उत्तरप्रदेश सरकार अनेक सुविधा देत आहे. त्यातील हे रिचार्जेबल दिवे प्रमुख आहेत. या रिचार्जेबल दिव्यांसोबत 67 हजार सामान्य दिव्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या संपूर्ण महाकुंभसाठी एकूण 25 सेक्टर जमिनीवर तंबू टाकण्याचे काम चालू आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सात प्रकारचे स्तर तयार करण्यात आले आहेत. तसेच महाकुंभसाठी 37 हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. हा मेळा 10 झोन, 25 सेक्टर, 56 पोलिस स्टेशन आणि 155 पोलिस चौक्यांमध्ये विभागला जाणार आहे. (Maha Kumbh Mela)

=====

हे देखील वाचा :  वाराणसीला वेध देवदिवाळीचे

========

महाकुंभमध्ये येणारे भाविक विविध धार्मिक कार्य करतात. यामध्ये पवित्र संगमाच्या वाळूवर नामजप, तपश्चर्या आणि प्रवचन-यज्ञ प्रमुख आहेत. यासाठी कुंभनगरी स्थापन होत आहे. संगम क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भाविक जातात, त्यासाठी संगम क्षेत्राजवळ मोठ्या सुविधा करण्यात येत आहेत. यात नागवासुकी मंदिराजवळचे रस्ते मोठे करण्यात येत आहेत. महाकुंभ तयारीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले असून त्यामध्ये सेक्टर मॅजिस्ट्रेट, सेक्टर मॅनेजर, असिस्टंट सेक्टर मॅनेजर यांचा समावेश आहे. सेक्टर मॅजिस्ट्रेट पदावर एसडीएम दर्जाचे अधिकारी आणि तहसीलदार आणि नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी व्यवस्थापक पदावर तैनात केले जात आहेत. या महाकुंभमध्ये येणारे भाविक उत्तरप्रदेशमधील अन्य तिर्थस्थळांनाही भेट देणार आहेत, हे लक्षात घेऊन अयोध्या, वाराणसी, वृंदावन, मथुरा येथील मंदिरांमध्येही नुतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.