कर्नाटक राज्यामधील अनेक मंदिरे ऐतिहासिक वारसा जोपासत आहेत. या मंदिरांमध्ये आजही पौराणिक परंपरा तेवढ्याच आस्थेनं जोपासल्या जातात. यापैकीच एक पुरातन मंदिर म्हणजे करिंजेश्वर मंदिर (Karinjeshwara Temple). बांटवाला तालुक्यातील हे मंदिर भगवान शंकर आणि देवी पार्वतीचे स्थान म्हणून पुजले जाते. करिंजेश्वर मंदिराच्या स्थापत्य शैलीवर वैष्णव आणि जैन अशा दोन्ही स्थापत्य शैलींचा प्रभाव आहे. स्थानिक राजांनी वेळोवेळी या मंदिराला संरक्षण दिले तसेच मंदिराच्या वैभवातही भर घातली. हे मंदिर फक्त आध्यात्मिक वारसा जोपासणारे नाही, तर नैसर्गिक सौदर्याचे प्रमाणही देणारे आहे. भलामोठा, उंच असा डोंगराचा भाग, त्याच्याबाजुनं वाहणारी नदी आणि त्या डोंगराच्या मधोमधून जाणा-या पाय-या, उंचावर असणारे करिंजेश्वर मंदिर (Karinjeshwara Temple) हे पावसाळ्यानंतर सौदर्यांनं अधिक खुलून जातं. हा संपूर्ण भाग हिरवा गार होतो. अनेक रानफुलांनी सजून जातो. बाराही महिने भक्तांनी गजबजलेले हे मंदिर पावसाळा सुरु झाला की, मात्र भक्तांच्या गर्दीनं फुलून जाते. श्रावण महिना, त्यानंतर पितृपक्षात होणा-या पुजा, दसरा आणि दिवाळी यात या मंदिरात करिंजेश्वराच्या येणा-या भक्तांची गर्दी वाढते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे प्रसादाचा पहिला मान हा वानरांना असतो. वानरांना रोज प्रथम देवाचा प्रसाद दिला जातो. हा सोहळा बघण्यासाठीही अनेक भक्त गर्दी करतात.
कर्नाटक राज्यातील बांटवाला तालुक्यात असलेले श्री करिंजेश्वर मंदिर (Karinjeshwara Temple) हे भारतीय वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. भगवान शंकराचे हे मंदिर करिंजा टेकडीच्या शिखरावर, करिंजेश्वरा येथील कोड्यमाले टेकडीमध्ये असलेले हे मंदिर निसर्गसंपन्न अशा स्थानावर आहे. या मंदिरात जाण्यासाठी 355 पायर्या आहेत. या मंदिराची अनेक वैशिष्टे आहेत. त्यापैकी एक म्हणजे हे मंदिर दोन भागात आहे. एकात भगवान शंकराचे स्थान आहे. तर दुसरा भाग, देवी पार्वती आणि भगवान गणेशाचे स्थान आहे. मंदिर असलेल्या टेकडीच्या उंगुस्त तीर्थ नावाचे तलाव आहे. या तलावातून हंड्यातून पाणी नेऊन मंदिराचे पुजारी भगवान शंकराचा अभिषेक करतात. हा सर्व परिसर वृक्षराजीनं संपन्न आहे. या करिंजा टेकडीवर माकडे मोठ्या प्रमाणात आहेत. या माकडांना पुजारी रोज दुपारी नैवेद्य देतात. याला वानर अन्न सेवा असे म्हटले जाते. भगवान शंकराच्या मंदिरासमोरील एका मोठ्या आयताकृती दगडी चबुतऱ्यावर हा नैवेद्य ठेवला जातो. त्यानंतर माकडे मोठ्या प्रमाणात येऊन त्याचे सेवन करतात. हा सोहळा बघण्यासाठी भक्तांची गर्दी होते.
स्थापत्यशास्त्र आणि अध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले श्री करिंजेश्वर मंदिर दूरवरून दिसते. मंदिराचे लोभनीय रुप बघतच भक्त 355 पाय-या चढतात. हजार वर्षापूर्वीच्या या मंदिराचा पाया करिंजे राजघराण्यानं उभारला. मंदिराच्या स्थापनेच्या अनेक कथा सांगितल्या जातात. मुळात मंदिराच्या उभारणीत अनेक राजांनी योगदान दिले आहे. तत्कालीन स्थापत्यशास्त्राची मंदिराला जोड मिळाली आहे. त्यामुळे मंदिरात अलंकृत खांब, विस्तृत भित्तिचित्रे, विविध पौराणिक कथा आदी पहायला मिळतात. मंदिराजवळून नेत्रवती नदी वाहत आहे. त्याचाही प्रभाव मंदिरावर आहे. करिंजेश्वर मंदिर हे हिंदू पौराणिक कथांनुसार चारही युगांचे रक्षण करणारे मंदिर असल्याचे मानले जाते.
कृतयुगात या मंदिराला ‘रौद्र गिरी‘, द्वापर युगात ‘भीम शैल‘, त्रेतायुगात ‘गजेंद्र गिरी‘ आणि कलियुगात ‘करिंजा‘ असे म्हटले गेले आहे. मंदिर ज्या टेकडीवर आहे, त्याच्या खाली असलेला तलाव भीमाच्या गदेच्या वजनानं झाल्याचे सांगितले जाते. भीमानं आपली गदा जमिनीवर टाकली आणि तेथे एक तलाव तयार झाला. त्यामुळे या तलावाला ‘गढ तीर्थ‘ म्हटले जाते. तसेच भीमाच्या अंगठ्यापासून ‘अंगुष्ट तीर्थ‘ तयार झाले. भीमानं जमिनीवर गुडघे टेकले तेव्हा ‘जनुतीर्थ‘ नावाचा दुसरा तलाव तयार झाला. या सर्व तलावांचे वैशिष्ट्य म्हणजे, यात वर्षाचे बाराही महिने पाणी असते आणि यातील पाण्याचाच, भगवान शंकराला अभिषेक केला जातो. या मंदिराच्या परिसरात हंडी केरे नावाचाही तलाव आहे. हा तलाव अर्जूनाच्या बाणामुळे तयार झाल्याचे सांगितले जाते. या सगळ्या तलावांचे पाणी हे अत्यंत पवित्र मानले जाते. भाविक भगवान शंकराचे दर्शन घेण्यापूर्वी आस्थेनं या तलावांमध्ये स्नान करतात. यामुळे त्वचा रोग दूर होतात, असेही मानले जाते. (Karinjeshwara Temple)
==========
हे देखील वाचा : घरात ‘या’ ठिकाणी ठेवा कापूर, होईल धनलाभ
==========
श्री करिंजेश्वर मंदिर (Karinjeshwara Temple) आणि प्रभू रामांचीही कथा सांगितली जाते. प्रभू राम आणि लक्ष्मण यांनीही या मंदिराला भेट दिली होती. त्यांनी भगवान शंकराचा अभिषेक केला. त्यानंतर भोजन करतांना त्यातील काही भाग शिवमंदिरासमोरील खडकावर ठेवला. तेव्हा वानरांनीही या प्रसादाचे सेवन केले. तेव्हापासून मंदिरातील नैवेद्य प्रथम वानरांना देण्यात येतो. गरम गरम भात ठेवल्यावर वानरांना विशिष्ट आवाजात साद घालण्यात येते. त्यानंतर वानरांच्या अनेक टोळ्या तिथे येतात. त्यातील त्यांचा नेता पहिला घास खातो, त्यानं खाल्यावर मग सर्व वानरे प्रसाद ग्रहण करतात. रोज चालणारी ही सेवा बघण्यासाठी अनेक भक्तांची गर्दी होते.
सई बने