Home » हत्तींसोबत राहण्याचा संघर्ष…

हत्तींसोबत राहण्याचा संघर्ष…

by Team Gajawaja
0 comment
Elephants
Share

बोत्सवाना,  हा आफ्रिकन खंडाच्या दक्षिणेस असलेला देश. झिम्बाब्वे, अंगोला, झांबिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा हा शेजारी देश अचानक जगाच्या केंद्रस्थानी आला आहे. फक्त २० लाख लोकसंख्या असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था शिकारीवर निर्भर आहे, हे सांगितल्यास आश्चर्य वाटेल आणि ती शिकार सुद्धा छोट्या मोठ्या प्राण्याची नाही, तर चक्क हत्तींची शिकार. (Elephants)

ब्रिटीश राजवटीखाली असलेल्या बोत्सवाना देशानं स्वतंत्र झाल्यावर अन्य आफ्रिकी देशाप्रमाणे आपली आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या देशाला दोन संकंटांना तोंड द्यावे लागले ते म्हणजे, घसरणारे दरडोई उत्पादन आणि हत्तींची वाढती संख्या.  या देशात हत्ती मोठ्या प्रमाणात आहेत. मग बोत्सवानानं या हत्तींच्याच शिकारीसाठी पाश्चात्य राष्ट्रातील शिका-यांना बोलवायला सुरुवात केली.  त्यांच्याकडून बक्कळ शुल्क घेत, हत्तींची शिकार करायला परवानगी दिली. (Elephants)

यामुळे त्यांची अर्थव्यवस्था सुधारलीच शिवाय वाढत्या हत्तींच्या संख्येलाही पायबंद घालण्यात या देशाला काही प्रमाणात यश मिळाले.  मात्र बोत्सवानामध्ये होणारी हत्तींची शिकार ही घृणास्पद घटना असल्याची टीका जगभरातून होऊ लागली. त्यात ब्रिटन आणि जर्मनी यांनी बोत्सवानावर जाहीर टीका केली. तसेच जर्मनीनं ही शिकार तात्काळ थांबवण्याची मागणीच बोत्सवानानं केली. या जर्मनीच्या टिकेला बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनी आरसा दाखवला आहे. 

कारण जर्मनीमधून सर्वाधिक शिकारी बोत्सवानामध्ये जात हत्तींची शिकार करत आहेत. शिवाय या छोट्या देशात हत्तींची संख्या एवढी झाली आहे, की इथे दररोज काही माणसे हत्तींच्या पायाखाली येऊन मरण पावत आहेत. अशावेळी जर्मनीला आम्ही २० हजार हत्ती भेट म्हणून देतो, त्यांनी हत्तींसोबत राहून दाखवावे असे जाहीर आवाहन बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी केले आहे. शिवाय बोत्सवानावर राज्य करणा-या ब्रिटनलाही या देशानं असेच खडे बोल सुनावले आहेत. (Elephants)

अवघी २० लाख लोकसंख्या असलेल्या बोत्सवाना या देशाला अचानक जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळू लागली आहे.  त्याचे कारण म्हणजे, बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी थेट जर्मनीला धमकी दिली आहे. आमच्या देशाच्या व्यवहारात लक्ष घालू नका अन्यथा तुमच्या देशात २० हजार हत्ती  पाठवतो. मोक्ग्वेत्सी यांच्या या धमकीच्या मागे जर्मनीनं दिलेला सल्ला आहे. बोत्सवानामध्ये हत्तींची जाहीर शिकार केली जाते.  त्यासाठी मोठे शुल्क आकारुन शिकारी येतात. हा सर्व प्रकार बंद करावा अशी मागणी जर्मनीनं केली. त्यावरुन चिडलेल्या बोत्सवानानं या हत्तींची वाढती संख्या आणि या छोट्या देशाला होणारा त्यांचा त्रास याची माहितीच जगापुढे सादर केली आहे.  

जगातील हत्तींच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश हत्ती बोत्सवानामध्ये आहेत. येथे हत्तींची संख्या १ लाख ३० हजारांहून अधिक आहे.  या देशाची लोकसंख्या २० लाख आहे. त्यांच्या प्रमाणात हे प्रमाण अधिक आहे. भारतापुरते बोलायचे झाले तर भारतातील हत्तींच्या लोकसंख्येच्या हे प्रमाण पट अधिक आहे.  या हत्तींच्या वाढत्या संख्येमुळेच बोत्सवानामध्ये हत्तींच्या शिकारीला प्रोत्साहन देण्यात येते.  त्यामुळे जर्मनीनं ही शिकार तात्काळ थांबवावी अशी मागणी केली होती. 

त्यावर बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठवण्याची धमकी दिलीच.  शिवाय जर्मनीतील लोकांनीही हत्तींसोबत एकत्र राहण्याचा अनुभव घ्यावा. तसेच आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आमची भेट प्रेमपूर्वक स्विकारा, आम्ही नाही ऐकणार नाही, असा गर्भीत इशाराही दिला आहे.   बोत्सवानामध्ये हत्तींची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे या देशातील शेती धोक्यात आली आहे.  शिवाय येथे दररोज नागरिकांचा मृत्यू हत्तींच्या पायी येऊन होत आहेत.  त्यात लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच बोत्सवानासह आफ्रिकन देशांमध्ये हत्तींची शिकार करण्यासाठी पाश्चात्य देशातील शिका-यांना बोलावले जाते. यासाठी येथील सरकार शिकारीकडून हजारो डॉलर्स फी आकारते.  हा पैसा हत्तींच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सेवांवर वापरला जातो.  (Elephants)

जर्मनीनं जशी बोत्सवानावर टिका केली तशीच टीका ब्रिटननेही २०१९ मध्ये केली होती.  त्यावर बोत्सवानाचे वन्यजीव मंत्री मिथिमखुलू यांनी ब्रिटनला, आम्ही लंडनमधील हायड पार्कमध्ये १० हजार हत्ती पाठवतो, यावरून तेथील लोकांना हत्तींसोबत राहणे काय असते हे देखील कळेल, असे सुचवले होते.  त्यानंतर ब्रिटनमधून ही मागणी हद्दपार करण्यात आली.  सध्या बोत्सवानाची अर्थव्यवस्था या हत्तींच्या शिकारीवर अवलंबून आहे. आता या देशाबरोबर झिम्बाब्वे आणि नामिबिया सारख्या देशांनी देखील हत्तींचे दात विकण्याची परवानगी मागितली आहे.

आता बोत्सवानामध्ये हत्तींच्या शिकारीसाठी दरवर्षी एक कोटा निश्चित केला जातो. काही वर्षापूर्वी बोत्सवानाने देशातील हत्तींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेजारील देश अंगोलाला हजार हत्ती दिले होते. याशिवाय मोझांबिकला शेकडो हत्ती दिले आहेत.  बोत्सवानामध्ये हत्तींची शिकार करण्यासाठी युरोपिय देशातील शिकारी मोठ्याप्रमाणात येतात. हे शिकारी हत्तींची शिकार केल्यानंतर ट्रॉफी म्हणून त्यांच्या शरीराचा काही भाग आपल्या सोबत घेतात. बहुधा हे त्या हत्तीचे दात असतात. त्यालाच ट्रॉफी हंटिंग म्हणतात.

===========

हे देखील वाचा : तुम्हाला कंबरेखाली सातत्याने दुखते? असू शकतात ही कारणे

===========

ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलच्या २०२१ च्या अहवालानुसार  शिकार ट्रॉफी आयात करण्यात जर्मनी संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.  बोत्सवानाने वाढत्या टिकेमुळे २०१४ मध्ये ट्रॉफी हंटिंगवर बंदी घातली होती. परंतू हत्तींची संख्या लाखाच्या पार पोहचल्यामुळे २०१९ मध्ये ही बंदी उठवली आणि हत्तींच्या शिकारीला खुली सुट दिली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.