Home » मानसिक तणावांवर एकच सोपा उपाय तो म्हणजे …

मानसिक तणावांवर एकच सोपा उपाय तो म्हणजे …

by Team Gajawaja
0 comment
Mental stress
Share

किती गोंधळ चालू आहे, शांत बसा. असं म्हणून कान बंद करण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण आपल्या आसपास असतात. मुळात या शांत बसण्यानं काही फायदे होतात का, हे जाणणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे  मौन व्रत केले जाते, त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कारण सध्या वाढलेले आजार, मानसिक ताण (Mental stress) यावर शांतता… हा एकच शब्द फलदायी ठरत आहे. आपल्या आसपास वाढलेली गर्दी, सोशल मिडीया, आवाज, गोंधळ, सामाजिक ताण, नोकरीतील तणाव, घरगुती वाद आदी सर्वांवर काही उपाय हवा असेल तर काही तास शांत बसा. अगदी ते शक्य नसेल तर निसर्गाच्या सहवासात मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. या काही तासांच्या शांततेनंतर आपण आपल्याच समस्यांवर उपाय शोधू शकतो, असे मानसोपचार तज्ञ सांगत आहेत. रोज काही काळ शांत बसल्यावर आपण आपल्या आरोग्याच्या समस्याही दूर करु शकतो हे सुद्धा निष्पन्न झाले आहे.  त्यामुळे चांगले आरोग्य हवे असेल, मनशांती हवी असेल तर शांत बसा हे सांगायची वेळ आली आहे.  

सध्या आवाज ही झपाट्याने वाढणारी समस्या झाली आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये हा वाढता आवाजच एक मोठी समस्या झाली आहे. व्यस्त जीवनात आपल्याला रोज शांततेचे क्षण कधी मिळतात का? याचे भानही राहत नाही. त्यामुळेच मानसिक समस्या (Mental stress) वाढत चालल्या आहेत. आता आवाजाचा आरोग्यावर खोल आणि वाईट परिणाम होत असून हा वाईट परिणाम दूर करण्यासाठी काही काळ शांतता बाळगावी असे आवाहन या विषयावर अभ्यास करणारे संशोधक करीत आहेत. शांत राहणे आरोग्यासाठी चांगले आहे. त्याचे फायदे किती आहेत, हे जाणणे गरजेचे आहे. काही काळ शांत राहिल्यानं संपूर्ण शरीराचे आरोग्य सुदृढ राहते. मुळात मेंदूसाठी ही शांतता फायदेशीर ठरते. सध्या वाढत्या तंत्रज्ञानाने माणसाला विळखा घातला आहे. हातात सतत मोबाईल लागतो आणि त्यावर काही ना काही बघण्याची सवय बहुतेकांना लागली आहे. कुठला तरी आवाज कानावर पडावा असे वाटते,  या सततच्या आवाजानं मेंदूची एकाग्र शक्ती कमी होत चालली आहे. लोकांना तंत्रज्ञानाचे व्यसन लागले आहे. आजूबाजूचा कोलाहल आणि अशांत परिसराने मनःशांती हिरावून घेतली आहे. सतत गोंगाटाच्या वातावरणात राहिल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. त्यावर योग्य वेळी तोडगा न निघाल्यास समस्या अधिक गंभीर होतात. या समस्या दूर करण्यासाठी ही शांतताच उपयोगी पडते. अर्थात गप्प राहण्याचा अर्थ असा नाही की काही अडचण आली तर बोलू नका, काही असेल तर उत्तर देऊ नका. त्यापेक्षा कोणत्याही प्रकारचे प्रदूषण टाळून, आवाजापासून दूर राहून स्वतःला शांत ठेवा. याशिवाय अनावश्यक संभाषण टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे. (Mental stress) 

शांत  राहण्याचा परिणाम शरीरावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. साधारणपणे, अधिक आवाज किंवा ध्वनी प्रदूषण असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाब वाढताना दिसतो. मात्र जी मंडळी शांत ठिकाणी, निसर्गाच्या जवळ रहातात, त्यांच्यात रक्तदाब आणि संबंधित समस्या कमी असल्याचे आढळून आले आहे. सतत आवाजात राहिल्यानं मेंदूवर ताण येतो. मनाची एकाग्रता कमी होते. शांत राहण्याचा एक फायदा असा आहे की जे अस्वस्थ ठिकाणी राहतात त्यांच्यापेक्षा शांत राहणाऱ्यांमध्ये मेंदूची वाढ चांगली होते. गोंगाटाच्या ठिकाणी राहिल्याने हार्मोनच्या पातळीतही वाढ होत असल्याचे आढळून आले आहे.  तसेच सतत छातीमध्ये धडधड होत असल्याचीही तक्रार काही करतात.  यामागे आवाज हे एकच कारण ठरते.  त्यामुळे शरीरातील  कोर्टिसोल हार्मोनच्या वाढीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा धोका वाढत चालला आहे. या हार्मोनवर नियंत्रण ठेवायचे असेल तर दिवसातील काही तास तरी शांत रहायची गरज आहे. (Mental stress)  

=======

हे देखील वाचा : खुप वेळ झोपून राहिल्याने मधुमेहासारखा गंभीर आजार होतो?

=======

आवाजाच्या ठिकाणी राहण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे झोप न येणे आणि चांगली झोप आली नाही तर अनेक आजार शरीराभोवती वेढा घालतात. शांत राहण्याचा एक फायदा असा आहे की जेव्हा मेंदू योग्यरित्या सक्रिय राहतो, तेव्हा त्याला चांगली झोप लागते. त्यामुळे चांगली झोप येणा-यांमध्ये रक्तदाब किंवा मधुमेहासारखे आजार कमी असल्याचे आढळून आले आहे. अनेक तज्ञ सांगतात की जगातील वाढत्या कोलाहलाच्यामुळे आजारांना आमंत्रण मिळत आहे. मंद, आरामदायी संगीतापेक्षा शांततेचे क्षणही हृदयाच्या समस्या कमी करतात,  असेही एका संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळेच मंडळी चांगले आरोग्य हवे असेल तर दिवसातील थोडा वेळ का होईना पण शांत बसा.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.