‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत आपल्या आवाजाने अजरामर करणारे शाहीर साबळे (Shaheer Sable) त्यांच्या कलेसाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच त्यांच्या स्वाभिमानी बाण्यासाठी ओळखले जायचे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी खास बोलावून दिलेल्या प्रस्तावाला तेवढ्याच विनम्र पण ठामपणे नकार देणे असो की, मराठी माणसांसाठी शिवसेनेसोबत भूमिका घेणे असो. शाहीर (Shaheer Sable) आपल्या विचारांच्या बाबतीत सदैव ठाम राहिले.
आपली कला महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतांना आपल्या स्वाभिमानी वागण्याचे दाखले त्यांनी पावलोपावली दिले. त्यांचे नातू, प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आयुष्याची पाने उलगडणारा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पडद्यावर साकारला. शाहिरांच्या आठवणींना उजाळा देतांना त्यांनी शाहिरांचा स्वाभिमानी स्वभाव अधोरेखित एक प्रसंग सांगितला.
गोष्ट आहे लातूरमधील. तिथे कॉंग्रेसच्या सभेचे आयोजन केले गेले होते. त्यासाठी दोन व्यासपीठांची मांडणी केली गेली होती. एका व्यासपीठावर कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणांचा कार्यक्रम होणार होता. तर दुसऱ्या व्यासपीठावर शाहीर साबळे (Shaheer Sable) यांच्या गाण्यांचा कार्यक्रम नियोजित होता. दुपारची वेळ असून देखील मैदान खचाखच भरले होते. शाहिरांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात बाजूच्या व्यासपीठावरील सूत्रसंचालकाने शरद पवार येत आहेत म्हणून लाउडस्पीकरवर घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे शाहिरांच्या ऐन भरात आलेल्या गाण्यात अडथळा निर्माण झाला. त्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्यांनी त्या सूत्रसंचालकाला व्यत्यय न आणण्याची सूचना केली. सूत्रसंचालकाने त्यांची माफी मागत पुन्हा असे करणार नाही म्हटल्यावर शाहिरांनी पुन्हा गाणे सुरु केले.
एक दोन गाणी झाल्यानंतर परत मोठ्या आवाजात समालोचकाने शरद पवार येत आहेत म्हणून घोषणा केली. यावेळी मात्र शाहिरांना राग आला. त्यांनी आपलं गाण बंद केलं आणि सगळ्यांना पसारा आवरायला सांगितला. शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा दूरवरून येत होता. शाहीर आपलं सगळं आवरून जायला निघाले, तोपर्यंत शरद पवार व्यासपीठाजवळ येऊन पोहोचले होते. शाहीर (Shaheer Sable) व्यासपीठावरून उतरायला आणि पवार चढायला एकच नेम झाला. पवार व्यासपीठावर आले आणि त्यांचा सत्कार वगैरे करून झाल्यानंतर आता शाहीर महाराष्ट्र गीत गातील म्हणून घोषणा करण्यात आली. पण तोपर्यंत शाहीरच व्यासपीठावर नव्हते. शाहिरांना आलेल्या रागाची बातमी पवारांच्या कानी आली होती. त्यांनी त्यांच्या माणसांना शाहिरांची मनधरणी करायला पाठवले.
शाहीर काही यायला तयार नव्हते. कृपया तुम्ही फक्त महाराष्ट्र गीत गाऊन जा, शरद पवारांची खूप इच्छा आहे म्हणून त्यांना खूप आग्रह करण्यात आला. शाहिरांनी गाण्यादरम्यान आलेल्या अडथळ्यावर तीव्र संताप व्यक्त केला. पवारांना शाहीर (Shaheer Sable) खूप मानत असत, त्यांच्या इच्छेखातर ते गायला तयार झाले. मात्र महाराष्ट्र गीत गाऊन मी लगेच निघून जाईल, गीतानंतर एक क्षणदेखील थांबणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. ते व्यासपीठावर आले, त्यांनी गाण गायलं आणि थेट कुणालाही न भेटता तिथून बाहेर पडले.
========
हे देखील वाचा : क्रिसन परेराची ही सत्यघटना तुम्हाला माहिती आहे का?
========
त्यांनतर अर्थातच या सगळ्या घटनाक्रमाची, शाहिरांच्या नाराजीची बातमी शरद पवारांच्या कानावर गेली. त्यांनी संबंधित व्यक्तीला खडे बोल सुनावले आणि या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी तो सूत्रसंचालक माफीचे पत्र घेऊन शाहिरांना भेटायला आला. मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप आहे, कृपया मला माफ करा म्हणून तो विनवणी करत शाहिरांच्या घरी आला होता.