गोवा हे राज्य एकेकाळी समृद्ध अशा मंदिरानी संपन्न होते. मात्र गोव्यात पोर्तुगीज आणि मुस्लिम आक्रमकांनी आपले वर्चस्व संपादन करण्यासाठी प्रथम मंदिरांवरच हल्ला केला. अनेक प्राचीन मंदिरे तोडण्यात आली. गोव्याच्या प्रत्येक खेड्यात प्राचीन मंदिर मात्र मुस्लिम आणि पोर्तुगीज यांनी ही मंदिरे उद्ध्वस्त केली. पण या आक्रमकांपासून काही मंदिरे सुरक्षित राहिली. अती प्राचीन असलेल्या या मंदिरांची बांधणी आत्ताही मजबूत आहे. शिवाय मंदिरांवरील कलाकुसर ही अनोखी आहे. यापैकीच एक मंदिर म्हणजे, तांबडी सुर्ला महादेव मंदिर. या पुरातन मंदिराच्या भोवतीचा निसर्गही तेवढाच सुंदर आहे. याच निसर्गामुळे हे तांबडी सुर्ला महादेव मंदिर वाचले आहे. गोव्याच्या पणजीमधील सुर्ला या छोट्या गावी असलेल्या मंदिराचे बांधकाम बघण्यासाठीही हजारो अभ्यासक या परिसराला भेट देतात. आणि भारतातील प्राचीन कला पाहून आश्चर्यचकीत होतात. (Tambadi Surla Mahadev Temple)
पोर्तुगीजांच्या आक्रमणापूर्वी गोव्यात शेकडो प्रसिद्ध मंदिरे होती. हिंदूबहुल राज्य असलेल्या गोव्यात मंदिरांची एक मोठी साखळीच होती. मात्र ही सर्व मंदिरे पोर्तुगीज आणि त्यापोठोपाठ मुस्लिम राजांनी तोडून टाकली. मात्र यातून तांबडी सुर्ला महादेव मंदिर आश्चर्यकारकरित्या वाचले आहे. या भागातील भाविक हा सर्व महादेवाचा चमत्कार असल्याचे सांगतात. गोवा राज्यातील सर्वात जुन्या असलेल्या या मंदिराची बांधणी १३ व्या शतकात झाल्याची माहिती आहे. महादेवाचे हे मंदिर पणजीच्या तांबडी सुर्ला गावात असल्यामुळे पुढे ते तांबडी सुर्ला महादेव मंदिर म्हणूनच प्रसिद्ध झाले. तांबडी सुर्ला महादेव मंदिर कदंब शैलीतील शैव मंदिर आहे. (Tambadi Surla Mahadev Temple)
आता या मंदिराला पुरातत्व विभागानं खास मानांकन दिले आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या मंदिरात ध्यानधारणा करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असे असा उल्लेख आहे. त्याकाळी हिंदू धर्मातील अनेक अभ्यासक या मंदिरात केवळ ध्यानधारणा करण्यासाठी येत असत. हा संपूर्ण परिसर शांत अशा निसर्गानं सजलेला आहे. यामुळे हे तांबडी सुर्ला मंदिर ध्यानधारणा केंद्र म्हणून नावारुपाला आले होते. एकेकाळी अतिशय संपन्न असणा-या या मंदिराचे अस्तित्व काही वर्ष लपवण्यात आले होते. त्यामुळे हे पुरातन मंदिर वाचले. आता या मंदिराबाबत अधिक अभ्यास व्हावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत. (Tambadi Surla Mahadev Temple)
मंदिर कदंब वंशाच्या काळात बांधले गेले. या भागात १४ व्या शतकापर्यंत कदंब राजवंशाचे राज्य होते. त्या त्या काळात या मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे या मंदिराच्या बांधणीत अनेक शैलींचा समावेश आहे. कर्नाटकातील आयहोल येथील शिवशंकराच्या मंदिरासारखीच या मंदिराचीही शैली आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या आतील पीठावर भव्य असे शिवलिंग आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मंदिरात एक रहस्यमयी गुहा आहे. यात अंधार असून त्यात सापाची विशाल मुर्ती आहे. याशिवाय मंदिराच्या गर्भगृहात नंदी मंडप आहे. या मंदिरातील खांबांवर कलाकुसरीचे नक्षीकाम केले आहे. कमळाच्या फुलांच्या चित्रांनी सजवलेले चार खांबही लक्ष वेधून घेतात. मंदिरात भगवान विष्णूचीही भव्य मुर्ती आहे. या मंदिराच्या वास्तुकलेचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, उगवत्या सूर्याची पहिली किरणे या मंदिरात येतात. त्यामुळे मंदिराचे गर्भगृह सोनेरी होऊन जाते. या मंदिराचा घुमट मात्र अर्धवट अवस्थेत आहे. हा घुमट आक्रमकांना दिसू नये म्हणून काढून टाकण्यात आल्याचेही सांगण्यात येते. (Tambadi Surla Mahadev Temple)
======
हे देखील वाचा : कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त
======
पणजीपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या तांबडी सुर्ला गावाच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे आहेत. महावीर राष्ट्रीय अभयआरण्यही याच भागात आहे. त्यामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्या अधिक असते. याशिवाय बोंडला वन्यजीव अभयारण्य, मोल्मेल नॅशनल पार्क, दूधसागर धबधबाही याच भागात आहे. हे मंदिर जिथे आहे, त्या भागात घनदाट वृक्षसंपदा आहे. त्यामुळे मंदिर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत खुले ठेवण्यात येते. नंतर या परिसरात गर्द काळोख होतो. म्हणून हे मंदिर लवकर बंद करण्यात येते. आता श्रावण महिन्यात मंदिरात येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे.(Tambadi Surla Mahadev Temple)
सई बने