जवळ जवळ चौदाशे वर्ष जगातील बुद्धांच्या सर्वात मोठ्या मूर्ती अफगाणिस्तानच्या बामियानमध्ये शांततेचं प्रतीक म्हणून उभ्या होत्या. इतकी वर्ष टिकलेला हा एक जागतिक ऐतिहासिक वारसा होता. पण मग वर्ष आलं २००१. अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आली, आणि तालिबानच्या डोळ्यात या डोंगरात कोरलेल्या बुद्धांच्या सुरेख मूर्ती खुपू लागल्या, इतक्या की, त्यांनी बुद्धांच्या मूर्तींमध्ये डायनामाइट भरून त्या उद्ध्वस्त करून टाकल्या. गौतम बुध्दांनंतर त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी फक्त भारतातच नाही, तर मध्य आशियापर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्यांनी निर्माण केलेले स्तूप आणि शिलालेख, शिल्प बौद्ध धर्माचे संदेशवाहक बनले. (Taliban)
तेव्हा सिल्करूट हा भारत, दक्षिण पूर्व आशिया, मध्य आशिया आणि चीनला जोडणारा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता. सिल्क रूट किंवा सिल्क रोड हा रेशीम व्यापारासाठी वापरला जाणारा एक मार्ग होता, जो चीनपासून सुरू होऊन मध्य आशिया, इराण, अरब आणि अखेरीस रोमपर्यंत जात होता. सिल्क रोडवर केवळ रेशीमचा व्यापार होत नव्हता, तर मसाले, चहा, चीनी मातीची भांडी, कागद यांसारख्या उत्पादनांचाही व्यापार होत होता. पण याच व्यापारी मार्गाचा वापर बौद्ध अनुयायांनी धर्माचा आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी केला. तेव्हा पाकिस्तानच्या उत्तर पश्चिमी आणि अफगाणिस्तानच्या काही भागात पहिल्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत गांधार कला विकसित झाली, जिच्यावर ग्रीको-रोमन संस्कृतीचा प्रभाव होता. (International News)
याच गांधार कलेचं सर्वात मोठं उदाहरण होतं, बामियानमधील बुद्ध मूर्ती. कुशाण साम्राज्याच्या काळात, बायमियानच्या डोंगरात या भव्य मूर्ती कोरण्यात आल्या होत्या, एक १८० फूट उंच मूर्ती ‘साल्सल’, तर दुसरी १२५ फूट उंच ‘शाह माम’. डोंगरात कोरलेल्या या भव्य मूर्ती नंतर नंतर जरी फक्त दगडी मूर्ती राहिल्या असतील, पण त्यांच्या सुवर्ण काळात त्या खूप सुंदर होत्या. ज्याचा उल्लेख चीनी बौद्ध भिक्षू जुआन झांगने आपल्या “द ग्रेट टैंग डायनेस्टी रिकॉर्ड ऑफ द वेस्टर्न रीजन्स” या पुस्तकात केला आहे. त्यानुसार, शहराच्या उत्तर-पूर्व भागात एका डोंगराच्या कड्यावर उंच बुद्धाची उभी मूर्ती आहे, जी चमकदार सोनेरी रंगाची असून ती अत्यंत सुंदर रत्नांनी सजवलेली आहे. (Taliban)
पण नंतर काळ बदलला, बौद्ध धर्म, जो एक काळी मध्य आशियामध्ये प्रचंड प्रभावी होता, त्याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. शांत आणि ध्यानस्थ बुद्ध प्रतिमांच्या समोर एक नवीन विचारधारा उभी राहिली, आणि ती होती इस्लामची. उमय्याद वंशाच्या काळात मुस्लिम सैन्यांनी मध्य आशियामध्ये प्रवेश केला. त्यांनी जिथे त्यांचं साम्राज्य उभारलं, तिथे इतर धर्मांच्या लोकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याची मुभा त्यांनी दिली, म्हणून या काळातही बौद्ध समुदाय इथे आनंदाने नांदत होता. पण १०व्या आणि ११व्या शतकात काराख़ानी ख़ानत साम्राज्याने बौद्ध धर्माच्या केंद्रांचं मस्जिदमध्ये रूपांतर केलं आणि अफगाणिस्तानमधील बौद्ध संस्कृती हळूहळू नाहीशी झाली. (International News)
अफगाणिस्तानमध्ये बौद्ध भिक्षू जरी राहिले नव्हते, तरी त्यांनी निर्माण केलेला ऐतिहासिक वारसा तसाच होता. पुढे अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आली, आणि या ऐतिहासिक वारशावर त्यांची काळी नजर पडली. २७ फेब्रुवारी २००१ रोजी, मुल्ला मोहम्मद ओमरच्या आदेशानुसार, तालिबानने बामियानमधील बुद्ध मूर्ती नष्ट करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बुद्ध मूर्ती नष्ट करण्यामागील कारण इस्लामिक शरीया कायदा होतं, शरीया कायद्यानुसार मूर्तिपूजा इस्लामविरोधी आहे, त्यामुळे अशा कोणत्याही मूर्तीचं अस्तित्व ठेवणं चुकीचं आहे. असं तालिबानचं मत होतं. (Taliban)
पण या बुद्ध मूर्त्या वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ, दलाई लामा, पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ आणि अनेक देशांतील नेत्यांनी तालिबानला थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अरब देशातील प्रसिद्ध धर्मगुरूंनी कराचीत जाऊन तालिबान प्रमुखांना भेटून या विध्वंसाला थांबवण्याचं आवाहन केलं. जपानने आणि संयुक्त राष्ट्रसंघाने तर तालिबानला हवी असलेली रक्कम देण्याची तयारी दाखवली, पण तालिबानने ते सर्व नाकारलं. (International News)
त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये दुष्काळ आणि उपासमारी सुरू होती. लाखो लोक भुकेने मरत होते, आणि तालिबानला असं वाटलं की आंतरराष्ट्रीय समुदायाला मानवतेपेक्षा मूर्ती अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात मूर्ती नष्ट करण्याचं निश्चितच केलं. आता इथे तालिबानची Hypocrisy बघा, तालिबानी सत्तेत हजारों लोकांना मारूनच आले होते. आणि आता तेच मानवतेच्या गोष्टी करत होते. (Taliban)
दिवस होता २ मार्च २००१, जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या बुद्धांसमोर म्हणजेच त्यांच्या मूर्तींसमोर तालिबानने मशीनगन, रणगाडे आणि तोफा आणल्या आणि बुद्ध मूर्तींवर हल्ला केला. पण या हल्ल्याचा मूर्तींवर काहीच परिणाम झाला नाही. बुद्ध अनुयायांंनी डोंगरात कोरलेली कला अढळ राहिली. त्यामुळे मूर्ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्यांनी त्यामध्ये डायनामाईट लावण्याचा विचार केला. तालिबानने बमियानमधील काही हाजरा नागरिकांना कैद केलं आणि त्यांना जबरदस्तीने या कामाला लावलं. नंतर ट्रकभर डायनामाईट आणि रॉकेट लॉन्चर आणले गेले. तीन दिवसात या कैद्यांनी मूर्तींच्या पायाभोवती डायनामाईटस लावले.आणि पहिला स्फोट झाला. (International News)
===============
हे देखील वाचा : Maratha History : मोघलाई की पेशवाई पहिली आली ? नेमकं सत्य काय ?
Artificial Intelligence : AI सुरू करणार तिसरं महायुद्ध ?
===============
प्रचंड धूर आणि आवाज झाला, शिल्पाचे पाय त्या धूरात हरवले, तरीही डोंगरात बुद्धमूर्ती उभ्याच राहिल्या. तालिबानी अधिकाऱ्यांचा राग आणखी वाढला. त्यांनी कैद्यांना अधिक खड्डे खोदून अधिक डायनामाईट लावायला भाग पाडलं. पुढील २०-२५ दिवस, सतत स्फोट घडवले गेले. अखेर एका महिन्यानंतर, हे जगप्रसिद्ध बुद्धमूर्ती कोसळल्या.आजही बामियानच्या डोंगरामध्ये बुद्ध अनुयायांनी कोरलेल्या लेण्या आणि गुहा अस्तित्वात आहेत. पण त्या दोन भव्य मूर्ती नाहीत. तिथे रिकामी पोकळी जी कधीही भरून निघणार नाही, तालिबानच्या धर्मिक अंहकारामुळे जागतिक वैभव अशाप्रकारे नष्ट झालं. (Taliban)