पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित देशातील प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे कोट्यवधींचे पेंटिंग मुंबईमधून चोरीला गेले आहे. याप्रकरणी मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस. एच. रझा यांनी 1992 साली कॅनव्हासवर ॲक्रेलिकवर बनवलेले ‘नेचर’ नावाचे हे पेंटिंग आहे. या ‘नेचर’ पेंटिंगची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे. मात्र गोडाऊनमध्ये ठेवलेले हे पेंटिग नेमके कधी चोरीला गेले याची कल्पना नाही. त्यामुळे त्याच्या शोधण्याचे आव्हान मुंबई पोलीसांपुढे उभे राहिले आहे. प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे प्रसिद्ध नेचर पेंटिंग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चित्रकार सय्यद हैदर रझा यांनी भारतीय चित्रकलेचा व्यापक प्रचार जगभर केला आहे. त्यांनी 1992 साली कॅनव्हासवर ॲक्रेलिकवर बनवलेले ‘नेचर’ नावाचे पेंटिंग हे खूप प्रसिद्ध आहे. ‘नेचर’ पेंटिंगची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे. (Syed Haider Raza)
हे पेंटिंग बॅलार्ड पिअर येथील गुरू ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने हे पेंटिंग याच गोदामातून चोरले आहे. याप्रकरणी मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद हैदर रझा यांची त्यांच्या पिढीतील अव्वल चित्रकारांमध्ये गणना होते. ते चित्रकलेच्या जगात हिंदू आणि बौद्ध धर्माच्या तांत्रिक पैलूंवर आपली छाप सोडण्यासाठी ओळखले जातात. सय्यद हैदर रझा यांचा जन्म मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा चित्रकलेबरोबर परिचय झाला. नागपूरच्या नागपूर आर्ट स्कूलमधील शिक्षणानंतर त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये पुढचे शिक्षण घेतले. 1950-1953 दरम्यान त्यांना फ्रेंच सरकारकडून शिष्यवृत्ती मिळाली. (Syed Haider Raza)
त्यामुळे सय्यद यांनी पॅरिसच्या मानांकीत विद्यापीठातून चित्रकलेचे शिक्षण घेतले. 1956 मध्ये, त्यांना पॅरिसमध्ये प्रिक्स दे ला क्रिटिक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारे सय्यद हे पहिले गैर-फ्रेंच चित्रकार आहेत. सय्यद हैदर रझा ऊर्फ एस.एच. रझा 1950 पासून फ्रान्समध्ये रहात असले तरी त्यांचे भारताबरोबर घट्ट नाते होते. त्यांची चित्रे मुख्यतः तैल किंवा ऍक्रेलिकमध्ये बनवलेली लँडस्केप आहेत. या सर्वच चित्रांमध्ये रंगाची वैविध्यता दिसून येते. त्यांच्या या चित्रकलेतील योगदानामुळे 1981 मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2013 मध्ये त्यांचा सय्यद यांना भारत सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 10 जून 2010 रोजी, 88 वर्षीय रझा यांचे ‘सौराष्ट्र’ नावाचे क्रिएटिव्ह पेंटिंग क्रिस्टीजच्या लिलावात 16.42 कोटी रुपयांना विकले गेले. भारतातील एखाद्या चित्राला मिळणारी ही सर्वोत्तम किंमत होती. निसर्गचित्र ही सय्यद यांची खासियत होती. त्यामुळेच निसर्गाच्या सानिध्यात रहायला त्यांना आवडायचे. फ्रान्समध्ये ते रहात असले तरी भारतातील चित्रकलेचा पगडा त्यांच्यावर होता. त्याचाच प्रचार त्यांनी केला. सय्यद ही गोष्ट जाहीरपणे मान्यही करायचे. (Syed Haider Raza)
====================
हे देखील वाचा : महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा कसा हिरावला गेला?
====================
मी फ्रान्सला गेलो कारण या देशाने मला चित्रकलेचे तंत्र आणि शास्त्र शिकवले. पण माझा फ्रेंच अनुभव असूनही, माझ्या चित्रांचा आत्मा थेट भारतातून आला असल्याचे ते अभिमानानं सांगत असत. भारतीय तरुणांना चित्रकलेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारतात रझा फाऊंडेशनची स्थापना केली. यातून तरुण कलाकारांना वार्षिक रझा फाउंडेशन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सय्यद यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. त्यात बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबईचे रौप्य आणि सुवर्णपदक, मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान यांचा समावेश आहे. 23 जुलै 2016 रोजी नवी दिल्ली येथे सय्यद हैदर रझा यांचे निधन झाले. आजही त्यांनी काढलेल्या चित्रांची किंमत ही काही करोडोमध्ये आहे. त्यातही निळ्या रंगाचा वापर केलेली चित्रे मोठ्या किंमतीला विकली जातात. त्यामुळे या सर्व बहूमुल्य पेंटिंगना मोठी सुरक्षाही असते. याच सुरक्षेला भेदून मुंबईतून सय्यद यांचे करोडो रुपये किंमत असलेले पेंटिंग चोरीला गेले आहे. हे चित्र नेमके कधी चोरीला गेले याची माहिती नसल्यामुळे ते शोधण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलीसांपुढे आहे. (Syed Haider Raza)
सई बने