विट्याच्या बळवंत कॉलेजमधली ही घटना. प्रा. एन.डी.पाटील सर (दाजी) प्राचार्यांच्या केबीनमध्ये बसले होते. समोर शिक्षकांनी उनाड आणि दंगेखोर विद्यार्थ्यांच्या कृत्याचा पाढा वाचण्यास सुरवात केली. इतक्यात केबिनमधून शिपाई बाहेर आला. त्याने एका मुलाला दाजींनी बोलावले आहे, असे सांगून केबिनमध्ये नेले. केबीन बाहेर मुलांची एकच गर्दी. आता हा तर रस्टीकेट होणारच, पण आपलीही वाट लागणार, अशी भीती मुलांना वाटू लागली.
पंधरा मिनिटं एकदम कडक शांतता पसरली आणि अचानक केबीनमधून एकच हास्यकल्लोळ सुरू झाला. टेन्शनचे वातावरण विनोदात बदलून गेले आणि एन.डी. पाटील म्हणजेच दाजींचे एक वेगळे रूप पहावयास मिळाले.
सन २००६ ची ही गोष्ट. प्रा.एन.डी.पाटील एका कार्यक्रमासाठी विट्याच्या बळवंत कॉलेजमध्ये गेले होते. एन.डी. हे तसे कडक शिस्तीचे असल्याने त्यांचा चांगलाच दरारा होता. कार्यक्रम संपला आणि प्राचार्य व काही शिक्षकांनी दाजींना केबीनमध्ये नेले. तिथे मुलांच्या वर्तणुकीचा विषय निघाला आणि भारत पवार नावाचा विद्यार्थी चक्क प्राचार्यांसह काही शिक्षकांच्याच नकला करतो, अशी तक्रार करण्यात आली.
भारत पवार हा कला शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत होता. दररोज कॉलेजला येऊन शिक्षकांचे आवाज काढत मनोरंज करणे, हा या विद्यार्थांचा नित्याचाच एक उपक्रमच होता. ही बाब दाजींच्या कानावर गेली. दाजींनी भारत पवारला बोलावून घेतले. त्याला विचारले, “बाळ, तू गुरूंच्याच नकला करतोस, हे खरं आहे का?” पवारने, ‘होय’ असे उत्तर दिले.
पवार हा मुळचा विजापूरचा. लमाण समाजातील मुलगा. पण कलेला जात पात सीमारेषा आणि बंधनं नसतात. त्याची माहिती घेतल्यावर दाजींनाही त्याचे अप्रूप वाटले.
दाजींनी मग फर्मान सोडलं, “ज्या ज्या नकला करतोस त्या सर्व माझ्यासमोर करून दाखव.” मग काय दाजींसमोर चक्क प्राचार्यांच्या केबीनमध्ये एक मनोरंजनाचा तासच भरला जणू. भारत पवारने अत्यंत हुबेहूब नकला केल्या. आवाज काढून दाखवला आणि दाजींनीही मोकळया मनाने त्याला दाद दिली. पण नंतर मात्र, “यापुढे शिक्षकांचा अनादर होईल, असं कुठेही वागू नकोस”, असा एक प्रेमाचा दमही दिला.
भारत मग दाजींच्या पाया पडला आणि त्यांनी त्याच्या पाठीवर शाबासकी देत, “हा घे तुला धपाटा”, असे उद्गार काढले. येवढीच काय ती शिक्षा त्याला मिळाली.
हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या आयशा मलिक (Ayesha Malik) नक्की आहेत तरी कोण?
भारत पवार बाहेर आला. केबीनच्या बाहेर उभे असणार्या मित्रांना त्याने दाजींनी शाबासकी दिल्याचे सांगितले. कलेचे रूपांतर करीअरमध्ये करण्याचा सल्लाही त्यांनी भारताला दिला होता. पुढे हाच भारत पवार काही शॉर्टफिल्म, चित्रपट आणि स्टेज शो मध्ये सर्वांना दिसला. पण या निमित्ताने कर्तव्य कठोर आणि शिस्तप्रिय एन.डी. साहेबांचे एक वेगळे रूप मुलांना पाहायला मिळाले.
– बी संतोष
=====
हे ही वाचा: हळदीची लढाई लढणाऱ्या विज्ञानजगतातील महाराणाची कहाणी
=====