सुनीता लिन पंड्या विल्यम्स. म्हणजेच अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams). दोनवेळा अंतराळात जाण्याचा विक्रम करणारी सुनीता आता पुन्हा नव्या विक्रमासाठी सज्ज झाली आहे. सुनीता तिच्या तिस-या अंतरराळ स्वारीची तयारी करत आहे. एक महिला अंतराळवीर म्हणून १२७ दिवस अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम सुनीतानं केला आहे. आता ती हा स्वतःचाच विक्रम मोडते का हे लवकरच समजणार आहे.
गुजरातचे प्रसिद्ध डॉ. दीपक एन. पंड्या यांची मुलगी असलेल्या सुनीताचा जन्म अमेरिकेच्या ओहायो राज्यात झाला आहे. युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीमधून भौतिक विज्ञानात तिने बीएससह पदवी प्राप्त केली. त्यानंतर, सुनीतानं फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात एम.एस. ची पदवी मिळवली.
त्यानंतर सुनीताची १९९८ मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था NASA मध्ये निवड झाली. अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेवर जाणारी सुनीता ही दुसरी भारतीय वंशाची महिला ठरली. १९९८ पासून सुनीताने आतापर्यंत ३० वेगवेगळ्या अंतराळ यानात एकूण २७७० उड्डाणे केली आहेत. आता हिच सुनीता पुन्हा एकदा अंतराळ सर करणार आहे. सुनीता यासाठी ६ मे रोजी बोईंगच्या कॅप्सूलमधून अंतराळात जाणार आहे. या मिशनसाठी नासाने दोन वर्षापूर्वीच तयारी सुरु केली होती. मात्र कोरोनाचा अडसर या योजनेला आणि त्यातील आर्थिक तरतुदींना आला. त्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. (Sunita Williams)
या दरम्यान सुनीता आपल्या सराव कार्यक्रमात नियमीतपणे भाग घेत होती. दोन वर्षांनंतर होणा-या या अंतराळ प्रवासासाठी आपण उत्सुक असल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे. सुनीता या तिस-या अंतराळ प्रवासात पृथ्वीच्या ४०० किमी वर उड्डाण करणार आहे. ६ मे रोजी सुनीता ज्या स्पेशशिपमधून जाणार आहे, त्याचे नाव स्टारलाइनर आहे. सध्या सुनीता यासाठी आपल्या सहसोबत्यांसोबत प्रशिक्षण घेत आहे. हे स्टारलाइनर स्पेसशिप रॉकेटच्या मदतीने अंतराळात पाठवण्यात येणार आहे. हे स्पेसशिप पृथ्वीपासून ४०० किमी वर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले जाणार आहे. यात सुनीता विल्यम्ससह ज्येष्ठ शास्त्रज्ञ बुच विल्मोर यांची निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही अंतराळवीर दोन आठवडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहणार आहेत.
नासामध्ये सर्वात प्रशिक्षीत पायलट म्हणून सुनीता विल्यम्सचे नाव घेण्यात येते. तसेच सुनीताने नासाच्या सर्वाधिक मोहीमा केल्या आहेत. भूमध्य समुद्र, लाल समुद्र आणि पर्शियन गल्फमध्ये ‘डेझर्ट शील्ड‘ आणि ‘ऑपरेशन प्रोव्हाइड कम्फर्ट‘ यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सुनीताचा सहभाग होता. १९९२ मध्ये सुनीताला ‘हरिकेन अँड्र्यू‘ या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी नेमण्यात आले होते. ‘हरिकेन अँड्र्यू‘ हे अमेरिकेत आलेले सर्वात विनाशकारी चक्रीवादळ होते. याचा अमेरिकेच्या अनेक राज्यांना फटका बसला. सुनाता विल्यम्सनं या वादळात नासाच्या मोहीमेचे नेतृत्व केले. यानंतर सुनीताची यूएसएस सायपन युद्धनौकेवरही नेमणूक करण्यात आली. या युद्धनौकेवर सुनीतानं एअरक्राफ्ट हँडलर आणि असिस्टंट एअर बॉस म्हणून काम केले. याच दरम्यान तिची अंतराळवीर कार्यक्रमासाठी निवड झाली. दरम्यानच्या काळात सुनीतानं ३० विमाने आणि हेलिकॉप्टरमधून ३००० तासांहून अधिक उड्डाण केले. (Sunita Williams)
============
हे देखील वाचा : एथिलिन ऑक्साइड म्हणजे काय ?
============
अंतराळवीर म्हणून निवड केल्यावर सुनीतानं कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यासाठी स्पेस शटल आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची यंत्रणा समजून घेणे गरजेचे असते. शरीराला अवकाशासाठी तयार करणे हा या प्रशिक्षणादरम्यानचा अवघड प्रकार असतो. यासाठी सुनीताने काही काळ मॉस्कोमध्ये रशियन स्पेस एजन्सीमध्येही प्रशिक्षण घेतले. सुनीताचे NEEMO2 मिशन खूप गाजले. या पहिल्या अंतराळ प्रवासानंतर तिने अंतराळवीर कार्यालयात उपप्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर सुनीताने ‘एक्सपेडिशन 33′ या मिशनमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची कमांडर म्हणून काम केले. या दोन मोहिमांमध्ये सुनीताने एकूण ३२२ दिवस अंतराळात घालवले आहेत. त्यातील ५० तास ४० मिनिटे अंतराळात स्पेसवॉक केला आहे. (Sunita Williams)
सुनीता सध्या एका नव्या मिशनच्या तयारीत आहे. बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसशिपची ही पहिली मानवयुक्त मोहीम असेल. या मोहिमेत ती पायलट असणार आहे. ६ मे रोजी तिच्या या तिस-या मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष असणार आहे.
सई बने