Home » साॅइल सोऽल साहित्यिक ११

साॅइल सोऽल साहित्यिक ११

by Correspondent
0 comment
Share

‘मी जीवन बघायला गेलो होतो — त्याऐवजी मी काय बघितले तर मृत्यू.’
(ज़िंदगी — इसी नाम के फिल्म पर एक रिव्ह्यू’ / सैगलच्या ‘ज़िंदगी’चे परीक्षण)

‘सो जा राजकुमारी सो जा’… के. एल. सैगलंच हे अजरामर गीत असलेल्या, न्यू थिएटर्सच्या ‘ज़िंदगी’ ह्या १९४० साली आलेल्या आणि आजच्या भाषेत बोलायचं तर ब्लाॅकबस्टर ठरलेल्या सिनेमाबद्दल मंटोने केलेलं हे परीक्षण. आजच्या काळातील चित्रपट-परीक्षकांनी, आस्वादात्मक लेखन करणा-यांनीही वाचण्यासारखं. मंटोने हे एकमेव चित्रपट परीक्षण लिहिलं आहे.

१९४० मध्ये या चित्रपटाने तिकीटबारीवर सर्वात जास्त धंदा करणारा चित्रपट म्हणून कीर्ती मिळवली. सर्वात जास्त धंदा म्हणजे ५५ लाखांचा. गूगलवर दिलेल्या हिशोबानुसार, १९४० सालचे 55 लाख म्हणजे २००९ सालचे अंदाजे ३८ कोटी. असो.

ह्या ‘जिंदगी’मध्ये नायक-नायिकेची शोकांतिका दाखवली आहे. ह्याची ढोबळ वन लाईन स्टोरी सांगायची तर ती अशी की, एक कुणी उनाडटप्पू पण सुरेल गाता गाळा असलेला नायक, श्रीमंत घरात नव-यांकडून अन्याय सहन करणारी, दुःखी विवाहित नायिका जी नव-याला सोडून घराबाहेर पडली आहे, नायकाशी भेट, दोघांनी एकत्र रिलेशनशिपमध्ये राहणं, मिळून समाजसेवेकरता एक बोगस संस्था काढणं, लोकांना लुटणं मग नायिकेच्या वडलांनी मरतेसमयी तिला सगळी प्राॅपर्टी देणं, तिचं मतपरिवर्तन, आपण समाजाला लुबाडलं म्हणून पश्चात्ताप, प्रायश्चित्त म्हणून नायकाचं प्रेम अव्हेरणं, नैराश्य येऊन त्यानं तिच्या आयुष्यातून निघून जाणं, मग तिचा मृत्यू.

तर असं कथानक असलेल्या आणि ब्लाॅकबस्टर ठरलेल्या ‘ज़िंदगी’वर मंटोने आपल्या लेखणीतून चौफेर हल्ले केले. त्याच्या टीकेला अभ्यासाची बैठक होती. कदाचित म्हणूनच त्याला भविष्यात चित्रपट परीक्षणाची कामं मिळाली नसावीत.

आपल्या लेखाच्या सुरुवातीला तो तत्कालीन कवितालेखनाची उदाहरणं देतो. त्याविषयी टिप्पणी करतो. ती वाचल्यावर एकूणच काव्याबद्दलचं मंटोचं मत स्पष्ट होतं. त्याच्या जाणिवा, वाचन आणि अभ्यास किती सखोल होता हे लक्षात येतं.

‘स्वर्गाच्या प्रकाशमान वातावरणात देवदूत विहार करत होते. संथ पाण्याने अवखळ खळाळत्या झ-याला विचारले — का हा अधीरपणा?

या ओळी आजच्या कवितेच्या प्रातिनिधिक ओळी आहेत. त्या मानवी अस्तित्वाचा गाभा थोड्या शब्दांमध्ये दाटीवाटीने बसवतात.कवितेबद्दल अशा अनेक ओळी लिहिता येतील. प्रत्येक ओळीला उघड दिसणा-या शब्दांपलीकडील अर्थ आहे असेही दाखवता येईल.पण सत्य असे आहे की अशासारख्या गोष्टी डोक्यात झिंग चढवतात… कविता वाचायला मजा येत असेल, पण अंतिमतः ती अर्थहीन असते. कारण तिच्यात सखोलता नसते.

मला माहीत असायला पाहिजे — ती मीच लिहिली आहे आणि तिच्यावर दोन मिनिटे घालवली आहेत. पण हे अशा स्वरूपाचे लेखन आजकाल साहित्यात भलतेच फॅशनेबल झाले आहे.’
(ज़िंदगी — इसी नाम के फिल्म पर एक रिव्ह्यू’ / सैगलच्या ‘ज़िंदगी’चे परीक्षण)

मंटोचा रोख पाश्तात्त्य साहित्याचे अंधानुकरण करण्यावर आहे. हलकेफुलके साहित्य या संकल्पनेमधून युरोपमध्ये लिहिल्या गेलेल्या कवितेची, साहित्याची नक्कल आपण करत असल्याची टीका तो करतो. मग अशाच हलक्याफुलक्या साहित्यावर बेतलेले वरवरची जिंदगी दाखवणारे सिनेमे आपण निर्माण करू लागलो आहोत हा त्याचा रोख आहे.

आपल्या दीर्घ प्रस्तावनेनंतर तो जिंदगीच्या परीक्षणाकडे वळतो. खरं म्हणजे वळतो आणि ‘जिंदगी’ कसा मरणप्राय आहे हे सोदाहरण लिहितो. मंटोचं हे परीक्षण एखाद्या ललित लेखाची वळणं घेत जातं.

‘मी या चित्रपटाचे वर्णन कसे करीन? जरा प्रयत्न करून बघतो. पेशावरहून मुंबईला खूप रेल्वेगाड्या येतात. काही जलद असतात, काही संथ, प्रत्येक स्टेशन घेणा-या. आता तुम्हाला मुंबईहून पेशावरला पॅसेंजरनेच यायचे आहे, मग तिला दहा-पंधरा दिवस लागले तरी चालतील, तर मग तुम्हाला ‘ज़िंदगी ‘ आवडेल. पटकथा अशी लिहिली आहे जणू लेखक स्वतःच आखून घेतलेल्या एका सरळ रेषेवरून सावकाश चालत आहे. आणि मग शेवटी धपकन तो कड्यावरून खाली पडतो.आणि — ज़िंदगीसुद्धा. माझ्या मते आयुष्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे ते मृत्यू. त्याची हरकत मृत्यूलाच असते. पण या चित्रपटात आयुष्य गुडघ्यावर बसून मृत्यूची याचना करताना दिसते. बरुआंच्या खांद्यावरच्या तिरडीवरची आयुष्याची प्रेतयात्रा म्हणजे हा चित्रपट.
हेही नोंदवायला हवे की प्रेतं फार जड असतात.’
(ज़िंदगी — इसी नाम के फिल्म पर एक रिव्ह्यू’ / सैगलच्या ‘ज़िंदगी’चे परीक्षण)




चित्रपट केवळ भिकार आहे, असं वरवरचं मत आणि त्याच्या जोडीला थोडंफार दिग्दर्शन,अभिनय इत्यादीबद्दल ढोबळ विवेचन करून मंटो थांबत नाही. चित्रपटाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मुद्द्यांच्या मुळाशी जाऊन तो विचार करतो आणि उदाहरणासह मतं मांडतो.

मुळात इतकी अप्रतिम गायकी असणारा माणूस बेकार, इकडेतिकडे उनाडटप्पूपणा करत का फिरतो? प्रत्येक फिल्म कंपनीत आज गायकांचा तुटवडा आहे, तो आमच्या न्यू थिएटर्समध्ये आला असता तर त्याला नक्कीच नोकरी मिळाली असती, असा विनोदी चिमटाही तो काढतो.स्त्री-पुरुष रिलेशनशिपबद्दल मंटो काही मतं मांडतो आणि त्यांच्या अनुषंगाने जिंदगीतल्या नायक-नायिकेच्या संबंधावर भाष्य करतो.

‘मला जेवढा कळला आहे त्याप्रमाणे जिंदगी म्हणजे रतनलाल आणि ती मुलगी यांना समाजाने एकत्र येऊ न दिल्याबद्दलचे रडगाणे आहे. त्यांचे मीलन होत नाही. पलंगावर एकत्र येणे हाच कोणाच्याही जिंदगीचा मुख्य भाग असतो काय? शारीर संबंध म्हणजेच सर्व काही असते काय?

श्रीमती नायिका विवाहित आहे. हिंदूंमध्ये तलाक नसतो, त्यामुळे ती तिच्या बेकार प्रियकराशी लग्न करू शकत नाही. आणि एकंदरीत असे दिसते की तो स्वतःला उभा करू शकत नाही,कारण तो तिच्याबरोबर झोपू शकत नाही. आता आयुष्य म्हणजे एवढेच असते काय?

मला माहीत आहे की प्रेम ही जबरदस्त गोष्ट आहे. जर ते केवळ लैंगिक इच्छेपेक्षा अधिक काही असते, अधिक अर्थपूर्ण, अधिक सखोल
असते, तर रतनलालने त्याचे बूड हलवून काहीतरी केले असते प्रेमासाठी.’
(ज़िंदगी — इसी नाम के फिल्म पर एक रिव्ह्यू’ / सैगलच्या ‘ज़िंदगी’चे परीक्षण)

मंटोची विचारसरणी एकूणच त्या काळाला, समाजाला, मूल्यांना छेद देणारी होती. म्हणूनच त्याच्या काही कथांना समाजविघातक ठरवलं गेलं. मंटोवर कोर्टात खटले दाखल झाले. जिंदगी चित्रपटाची कथा ज्या गृहीतकावर बांधली गेली, त्या गृहीतकाबद्दल त्याने सवाल केले आहेत. समाजामध्ये स्थिर झालेल्या मूल्यांना कालांतराने मोडण्याची आवश्यकता असते हा त्याचा विचार होता. मंटोच्या स्वतःच्या जीवनानुभवातून तो आला होता.

१९४० साली हे परीक्षण लिहिले तेव्हा मंटो स्वतः कौटुंबिक पातळीवर अतिशय दुःखं झेलत होता. जिच्यावर सर्वाधिक प्रेम केलं त्या आईचा नुकताच झालेला मृत्यू, पहिल्याच तान्ह्या मुलाचं जिवघेणं आजारपण, ज्याचा नंतर वर्षंभरातच मृत्यू झाला, मुंबईतल्या फिल्मी दुनियेतील अस्थिर नोकरी, लेखणीला न मिळणारं मोल, पैशाकरता लेखणीला कुणापुढे तुकवावं लागू नये याची धडपड आणि केवळ 28 वर्षाचं तरुण वय.अशा आघाड्यांवर लढणा-या मंटोच्या विचारांना जिंदगीमधील जीवनाबद्दलची वरवरची सरधोपट नकारात्मकता पटली नाही.

समाज म्हणजे तरी काय आणि कोण असा उद्विग्न सवाल तो करतो. समाज गाढव असेल तर रतनलाल हा नायक समाजाच्या अंगावरच्या माश्या मारणारी शेपूट असल्याचं तो नमूद करतो. समाजाच्या बुरसटलेल्या विचारांवर घण घालणारं असं काही मांडलं जावं, ही अपेक्षा सिनेमाकडून तो करतो. बाॅलिवूडमध्ये नंतर अँग्री यंग मॅनचा उदय झाला खरा. पण मंटोला अपेक्षित असणारी सामाजिक परिवर्तनं त्यातून झाली का? हा चर्चेचा विषय.

मंटोच्या व्यक्तिमत्त्वातील आणि विचारसरणीतील बंडखोरपणाचं मूळ त्याच्या अमृतसरमधील बालपणात आणि कुमारवयातील अनेक घटनांमध्ये रुजलंय. त्याविषयी पुढल्या लेखांच्या प्रवाहात हळूहळू समजून घेऊच.

सिनेमात दाखवला गेलेला नायक-नायिकेचा टेलीपथी संवाद, नायिकेला आवाज ऐकू येणं वगैरे मंटोच्या मते बालिश प्रकार. दिग्दर्शक बरुआंनी युरोपमधून काही टिप्स घेतल्याचा थेट आरोपही तो करतो.

गंमत बघा, मंटोने खरमरीत टीका लिहूनही या सिनेमानं तिकीटबारीवर प्रचंड धंदा केला आणि भारतीय सिनेमा इतिहासातील तो एक लोकप्रिय सिनेमा ठरला. अशा विरोधाभासाची उदाहरणं हजारोनी मिळतील. मंटोचं परीक्षण कितपत योग्य-अयोग्य हे आताच्या काळानुसार, सिनेमाप्रवाहानुसार आणि परीक्षण-समीक्षेनुसार ठरवणं कठीण
आणि ते ठरवणंही चुकीचं. पण या परीक्षणाच्या अनुषंगाने मंटोने कविता, कथा, पटकथा, सिनेमा, व्यक्तिरेखा, दिग्दर्शन, अभिनय अशा सिनेमासंदर्भातील अनेक घटकांचा जो सांगोपांग आढावा घेतला आहे तो आपल्याला अंतर्मुख करतो. हा एक वाचनीय आणि चिंतनीय असा रसास्वाद आहे.

समाज, सामाजिक मूल्यं, स्त्री-पुरुष संबंध, परंपरा, जीवन, मृत्यू अशा अनेक तात्त्विक घटकांबद्दल मंटोने केलेलं एकेक भाष्य वाचकाला विचार करायला लावतं. भले त्यातील काही मुद्दे सगळ्यांनाच पटले नाहीत तरीही.

हे सगळं अतिशय विचारपूर्वक मांडताना मंटोच्या लेखणीतला खुसखुशीतपणाही अगदी खुमासदार पद्धतीने आपल्यासमोर येतो. मृत्यूविषयी मंटोने केलेलं हे गंभीर चिंतन आणि शेवटी ‘जिंदगी’च्या दिग्दर्शकांना हाणलेला टोला या नोटवर आजच्या लेखाला विराम. खरंतर अर्धविराम… कारण मंटो अभी ज़िंदा है… म्हणजे मंटोपुराण चालूच आहे.

‘..मृत्यूसुद्धा जीवनाने रसरसलेला नसतो का? मृत्यू नेहमीच मृत नसतो. आयुष्याला मुठीत गच्च पकडून हळूहळू त्याला चिरडत असतो मृत्यू. आयुष्याचे सळसळते रक्त तो थंड करून टाकतो — हा मृत्यू निष्प्राण नाही असू शकत. माझ्या मते मृत्यू जीवनापेक्षा जास्त ताकदवान असतो. जीवनापेक्षाही जगण्याने भरून जाणारा. पण जिंदगीमधला मृत्यू अगदीच मिळमिळीत, निष्प्राण होता.
….
ख्वाजा अब्बास म्हणतात की जे ज़िंदगी बघायला जातील त्यांनी सोबत दोन रुमाल घेऊन जावे. मला अगदी मान्य आहे. एक रुमाल तुमचे डोळे पुसायला आणि दुसरा बरुआंचे डोळे पुसायला.’

(लेखातील मंटोची अवतरणे-संदर्भ- १–‘मी का लिहितो?’
— संपादन श्री. आकार पटेल, – अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, २०१६.
२– ‘मंटो ज़िंदा है/ मंटो- तप्त सूर्याचा संताप’,– डाॅ. नरेन्द्र मोहन/
अनुवाद- डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती,२०१३.)
————- © डाॅ निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.