Home » साॅइल सोऽल साहित्यिक १३

साॅइल सोऽल साहित्यिक १३

by Correspondent
0 comment
Share

‘… ती इतकी रक्तरंजित घटना होती की तसे पूर्वी काही आपण बघितले नव्हते. त्यातून घडलेले बदल लक्षात घ्यायला हवेत. हे काम न्यायाधीशांचे नाही तर मानसशास्त्रज्ञांचे आहे. तेच या घडामोडीचा शोध घेऊ शकतात आणि त्यावर उपाय काढू शकतात.

मी सांगतो आहे तसा प्रत्येक दिवस हिंसाचार घेऊन येतो आहे आणि आपले सरकार त्याविषयी काहीही करत नाही हे क्लेशकारक आहे. मला पोलिसाबद्दल काही म्हणायचे नाही. हे थांबवण्यासाठी त्यांची गरज आहेच; पण प्रमुख काम मानसशास्त्रज्ञांनी करणे गरजेचे आहे. हे मुळात घडतेच का? आपण जर मानसशास्त्रीय परीक्षण केले नाही तर मला भीती आहे की, परिस्थिती आणखीनच चिघळेल. पाकिस्तानात रानटीपणाचे युग सुरू होईल. सुरू होईल? मी दुरुस्ती करतो– सुरू झाले आहे.ʼ

मंटो लिहितो, ‘एका हत्याकांडाची बातमी’. या लघुलेखात मंटोचे विचार हे ब-याच प्रमाणात आध्यात्मिक पातळीवर गेलेले दिसतात. मानसशास्त्रीय पद्धतींनी माणसाचं मन दुरुस्त करणं हे जितकं सध्याच्या काळात आवश्यक तितकाच त्याच्या जोडीला मनोनिग्रह असणं
आवश्यक आहे, असं तो नमूद करतो. तत्कालीन पाकिस्तानाविषयी तसंच भविष्यातील पाकिस्तानातील अंदाधुंदीविषयी तो सडेतोड भाष्य करतो. इथे रानटीपणाचे युग सुरू झालं असल्याचं परखडपणे जाहीर करतो.

फाळणीनंतरचा हिंदुस्थान कसा होता, कसा घडत गेला हे आपल्याला येथील दस्तऐवजांमधून उलगडलं, अजूनही उलगडत आहे. अशी कितीतरी राजकीय गुपितं आहेत, जी सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेक वर्षं पोहोचली नव्हती. पोहोचली नाहीत. त्या गुपितांचे साक्षीदारही काळाच्या पडद्याआड गेले. आता ही गुपितं कधी सिनेमाच्या तर कधी पुस्तकांच्या, वृत्तपत्रांच्या, प्रसारमाध्यमांच्यामार्फत समोर येत आहेत. अर्थात ती सत्याच्या कसोटीवर कितपत विश्वासार्ह, हा वादाचा मुद्दा आहेच.

मंटोनं ह्या लेखात आत्मचिंतनाचा, मनोनिग्रहाचा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, जो भारतीय तत्त्वज्ञानाचा, अध्यात्मचिंतनाचा पाया आहे. ज्याचं आज मार्केटिंगही केलं जात आहे. आत्म्याचा शोध घेणं आणि त्याला योग्य बोध करणं हे मंटोला महत्त्वाचं वाटतं. वैज्ञानिक शोधांच्या मार्गाने आपण जर अणूची रचना उलगडू शकतो, तर मग स्वतःचं परीक्षणही करूच
शकतो, असं त्याला ठामपणे वाटतं. नमाज़, रोज़ा, आरती, कीर्तन ह्या भक्तिमार्गांनी जीवन जगणारे, एक प्रकारे स्वतःच्या आत्म्यालाच भिडतात असं तो म्हणतो.

मृत्युदंड किंवा तुरुंगवास ह्या शिक्षा देण्याच्या विरुद्ध असलेला मंटो मारेक-याच्या आत्म्याला सुधारण्याकरता प्रशिक्षित करावं असं म्हणतो, तेव्हा थोडं आश्चर्यही वाटतं. आश्चर्य ह्याकरता की, हे त्याचे सुधारणावादी विचार त्याच्या आक्रमक व्यक्तित्वाला, विचारांना छेद देणारे आहेत.

‘पाकिस्तानात देव कृपावंत आहे’ ह्या शीर्षकाचा मंटोचा लेख म्हणजे, पाकिस्तानच्या बाबतीत भविष्यवाणी वर्तवणारे लेखन आहे, असं अनुवादक श्री. आकार पटेल नमूद करतात. अतिशय
उपहासाने भरलेलं असं हे लेखन. साठ-पासष्ट वर्षांपूर्वींचा पाकिस्तान वाचकाच्या डोळ्यांसमोर उभा राहतोच परंतु आजही ते भयावह चित्र अधिक दाट झाल्याचं आपल्या लक्षात येतं. द्रष्ट्या लेखकाच्या लेखणीचं हे थोरपण म्हणावं की, वर्तमानकालीन परिस्थितीचं दुर्दैव?

या संपूर्ण लेखाची रचनाच मुळी उपहासाच्या पायावर उभी आहे. विडंबनाचे वेगळ्या अर्थाने सुंदर रूप. साहित्यातील, कलेतील बनचुकेपणा कुत्सितपणे मांडणारी टोकदार वाक्यं जी सच्चा
लेखणीबहाद्दराची लेखणीबद्दलची निर्मळ निष्ठा व्यक्त करतात.

साहित्य, संगीत, चित्र अशा अनेक कलांमधील खरी, नैसर्गिक सर्जनशीलता संपून बेगडी कृत्रिमता कशी येत चालली आहे, ह्याबद्दल तीव्र उपहासाने तो लिहितो.

‘पण आता देवाचीच कृपा! आपल्याला ना कवी सापडतो ना संगीतकार. अल्ला मदत करो आपल्याला, त्यांचे संगीत ही सर्वात हिणकस गोष्ट होती. माणसे काय गाण्यासाठी निर्माण झाली आहेत? तानपुरे घेऊन रडण्यासाठी ? आणि गायचे तरी काय? मालकंस, दरबारी कानडा आणि मियाँ की तोडी आणि देवालाच माहीत काय ते!

कोणीतरी विचारायला हवे होते : ‘हे बघा, तुमच्या या रागदारीतून माणसाला कधी काही फायदा झालाय? लोकांना तुमची आठवण राहील असे काहीतरी करा म्हणजे तुम्हाला दुवे मिळतील. त्याने तुम्हांला थडग्याचे भय कमी वाटेल.’

मी कवींचा उल्लेख केला — किती विचित्र लोक होते ते !

जेव्हापासून पाकिस्तानने कवींना संपवून शुद्धिकरण केले आहे ना, तेव्हापासून आपल्या भोवतालची हवा कशी स्वच्छ आणि पवित्र बनली आहे. असेही कवी होते जे त्यांच्या प्रेमाबाबत किंवा स्त्रियांबद्दल लिहिण्याऐवजी, कामगार आणि त्यांच्या कष्टांविषयी लिहायचे. केस आणि कांतीची स्तुती गाण्याऐवजी ते विळ्या-कोयत्याची भक्तिगीते गायचे. देवाचे आभारच मानायला हवेत, ते आणि त्यांचे कामगार आपल्यातून
गेल्याबद्दल. हलकटांना क्रांती हवी होती, माहितीय तुम्हाला? … ते सारखे मागण्या करत होते, मानवी अधिकारांच्या. …त्यांचे ते हास्यास्पद झेंडे हातात घेऊन ते धर्मनिरपेक्ष सरकार आणू पाहत होते. देवाची महती थोर म्हणूनच त्यांच्यातला एकही जण आता आपल्यात नाही. आणि अल्लाचा हजार वेळा जयजयकार असो, कारण पाकिस्तान आता इस्लामी
राष्ट्र आहे.’

मंटोच्या शब्दाशब्दांतून तत्कालीन पाकिस्तानी राजवटीविषयीचा तीव्र संताप ओतप्रोत भरलेला दिसून येतो. तो व्यक्त करताना त्याची लेखणी त्या काळातही कोणतीच भीडभाड न ठेवता लख्खपणे आपले विचार मांडताना दिसते.

साहित्यिकानं लेखनात स्वतःची म्हणून एखादी राजकीय विचारसरणी अनुसरावी का? एखाद्या राजकीय पक्षाला छुपा किंवा उघड पाठिंबा द्यावा का? एक व्यक्ती म्हणून त्याचा तो अधिकार असतो का? आपल्या लेखनकृतीला त्यानं आपल्या वैचारिक भूमिकांचं माध्यम बनवावं का?
की लेखक म्हणून त्यानं तटस्थपणे सर्व घडामोडींचं फक्त अवलोकन करावं? उदारमतवादी राहावं का? उदारमतवाद म्हणजे पुन्हा नेमकं काय? इत्यादी प्रश्नांची स्पष्ट उकल आजपावेतो झालेली नाही. कारण मुळातच हे विषय जटिल. त्याची ठोस सैद्धांतिक मांडणी जगभरात अनेक
विद्वानांनी वेगवेगळ्या प्रकारे केली. जे लेखकांच्या बाबतीत तेच कलाकारांच्याही.मग त्या लेखक-कलाकारावर विशिष्ट विचारसरणीचा शिक्का बसला की, तो एका विशिष्ट कंपूमध्ये अडकतो किंवा अडकवला जातो. हे असे एकात एक गुंतलेले विषय.

विळ्या-कोयत्याचा उल्लेख मंटोच्या विचारसरणीचं सूचन करतो आणि जिथे विळा-कोयता तिथे इतर इझमचे पुरस्कर्ते वळूनही बघणार नाहीत, अशी परिस्थिती हेही सत्यच.अर्थातच त्यामुळे मंटोच्या लेखनाबाबत एकतर दुर्लक्ष, दुमत किंवा ब-याच प्रमाणात दुःस्वासही
दिसून येतो.

मुळात सत्तर वर्षांपूर्वीची ही शाब्दिक थडगी उकरावीतच कशाला इथपासून ते ‘भय इथले संपत नाही’, अशा प्रकारची फाळणीनंतरच्या पाकिस्तानमधली परिस्थिती असताना मंटो भारतात का परतला नाही? तिथेच का राहिला? असे प्रश्न अजूनही उपस्थित केले जातात. तर्कवितर्क होतात.टीका तर अमाप. जी मंटोने प्रत्यक्ष जगताना पावलापावलावर अनुभवली.

परंतु तरीही खरा लेखक, कवी, कलाकार ह्यांच्याबद्दल अपार माया असणारा, आपल्या लेखणीतून त्यांना सलाम करणारा, समाजभान जपणारा मंटो श्रेष्ठ ठरतोच.साहित्य, कला आणि कलाकारांविषयी, पाकिस्तानाविषयी मंटो आणखी काय लिहितो हे पुढील लेखातही पाहूच.

© डाॅ निर्मोही फडके.

(लेखातील मंटोची अवतरणे-संदर्भ- १–‘मी का लिहितो?’
— संपादन श्री. आकार पटेल, अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, २०१६.
२– ‘मंटो जिंदा है/ मंटो- तप्त सूर्याचा संताप,– डाॅ. नरेन्द्र मोहन/
अनुवाद- डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे, विजय प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती, २०१३.)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.