Home » साॅइल सोऽल साहित्यिक 3

साॅइल सोऽल साहित्यिक 3

by Correspondent
0 comment
Share

‘इंग्लिश संस्कृतीने आपल्याला बरेच पुरोगामी बनवले आहे. …भारत आता इतका पुरोगामी बनला आहे की, आपण नग्नपंथीयांचे क्लब्ज सुरू करण्याच्या गोष्टी करतो आहोत. ज्या ब्रिटिशांनी आपल्याला हे सगळे दिले त्यांनी यूरोपमध्ये निघून जावे असे जे कोणी म्हणतात ते किती मूर्खपणा करतात !’ — मंटो. ( ‘तरक्क़ी याफ्ता कबरस्तान’ – 1942 )

‘पुरोगामी’ हा शब्द आज प्रसारमाध्यमांवर इतका सरधोपटपणे वापरला जातो, तरीही त्याचा खरा अर्थ किंवा ती संकल्पना आपल्या सगळ्यांनाच कितपत कळली असावी याबद्दल शंकाच आहे. ‘पुरोगामी भारत आणि पुरोगामी महाराष्ट्र’ नावाच्या एका फसव्यास्वप्नात या नव्या शतकातही आपण मनमुराद जगत आहोत. साहित्यिक, टीकाकार मनमुराद टीका करतच आहेत. जसजशी वर्षं पुढे पुढे जात आहेत तसतशी या सगळ्या मंडळींना आपल्या टीकेकरता भरपूर नवनवी उदाहरणंही मिळत आहेत. असो.

गंमत अशी की, स्वातंत्र्यापूर्वीही आपल्या लेखणीतून सआदत हसन मंटोने आपल्या लेखांतून तत्कालीन समाजाच्या पुरोगामित्वावर टीका केलेली दिसते, तेव्हा मंटोच्यालेखणीचं कौतुक करावं की, 80 वर्षांनंतरही परिस्थिती तशीच असल्याबद्दल अश्रू गाळावेत हेच कळत नाही. 

‘तरक्क़ी याफ्ता कबरस्तान’ या आपल्या लेखात मंटोने 1942 सालच्या मुंबईतीलएका कबरस्तानाचा स्वानुभव आणि त्या अनुषंगाने मांडलेली परिस्थिती, स्वतःचेभावनिक चढउतार यांचं केलेलं कथन म्हणजे जणू एक शाॅर्ट फिल्म आहे. या शाॅर्ट फिल्मचा निवेदक आहे स्वतः मंटो… आणि या शाॅर्ट फिल्मच्या उत्तरार्धातमरणाच्या या सोहळ्याबद्दल मंटोनं केलेलं उपहासात्मक मनोगत हे, वाचकाला आजही हसवता हसवता विचारप्रवृत्त करणारं मृत्यूबद्दलचं आधुनिक तत्त्वज्ञान आहे.
1942 हे साल म्हणजे दुस-या महायुद्धाचा मध्यबिंदू. ब्रिटीश-इंडिया या नावाने भारतीय हिन्दी सैनिक ब्रिटिशांच्या म्हणजेच दोस्त राष्ट्रांच्या बाजूने महायुद्धात लढतहोते. या काळात मंटो मुंबईमध्ये राहात होता. गांधीजींच्या चले जाव चळवळीने जोरधरला होता आणि त्याच सुमारास तत्कालीन ‘बाँबे’ किंवा ‘बंबई’ ही माॅडर्न बनण्याच्या मार्गावर होती.

मंटो लिहितो,’ ब्रिटिश आमदानीत आपण जी प्रगती केली आहे ती आपण यापूर्वीच्या कोणत्याचयुगात केली नाही. त्यांनी फक्त आपली उपाहारगृहे, क्लब्, चित्रपटगृहेच आधुनिक बनवली नाहीत; तर आपली कबरस्तानंदेखील आधुनिक बनवली.’
मंटोच्या आईचा मृत्यू आणि तिच्या मृतदेहाला कबरस्तानात दफन करताना त्याला आलेला अनुभव याबद्दलचं त्याचं आत्मकथन वाचताना मंटोच्या लेखणीतून एकासाध्यासुध्या भारतीय माणसाचं आयुष्याबद्दलचं साधंच चिंतन उलगडत जातं. हे चिंतन जरी साधं वाटत असलं तरी माणसांनीच माणसांकरता  बनवलेल्या व्यवस्थांमधील बनेलपणा ते उघड करत जातं. 
‘पुरोगामीपणा म्हणजे नक्की काय रे भाऊ?’ असा प्रश्न पडावा, अशा प्रकारचे दाखलेया 80 वर्षांपूर्वीच्या लेखातून मिळतात. तपशील थोडे बदलले तर या लेखातले सीन आजच घडल्यासारखे कुठल्याही सिनेमात आजही खपतील.

उदाहरणार्थ, आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिला दफन करण्याकरता दफनभूमीतनेण्यापूर्वी तिच्या मृत्यूची नोंद महानगरपालिकेच्या कार्यालयात करावी लागेल, मग तिथून कर्मचारी येऊन शहानिशा करेल, मग त्याला डाॅक्टरांचं  प्रमाणपत्र द्यावं लागेलइत्यादी गोष्टी लहान शहरातून मुंबईत राहायला आलेल्या मंटोला माहीत नसतात. म्हणून तो इथल्याच एका माहीतगार मित्राची मदत घेतो. महानगरपालिकेतूनआलेला कर्मचारी डाॅक्टरी सर्टिफिकेट नसल्याने आढेवेढे घेऊ लागल्याचे कळल्यावरमंटोचा मित्र, मंटोच्या खिशातून दोन रुपये काढून त्या कर्मचा-याला देतो. तेमिळाल्यावर लगेच त्या कर्मचा-याचा बोलण्याचा नूर बदलतो. मंटोच्या आईच्या औषधाच्या जुन्या बाटल्या, जुनी प्रिस्क्रिप्शन तो मागतो, जेणेकरून ती आजारी असल्याचे पुरावे देऊन डाॅक्टरी सर्टिफिकेट आणता येईल. 

आजही हा प्रसंग वाचताना आपल्यापैकी अनेकांना आपणही अशा प्रकारच्या किंवासाम्य असलेल्या प्रसंगांतून गेलो असल्याचं नक्कीच जाणवेल. (आता यावरून कुणी आपल्या प्रशासकीय स्वच्छ कारभाराविरुद्ध, ऐतिहासिक परंपरेविरुद्ध लिहिल्याबद्दल कृपया मंटोवर अब्रुनुकसानीचा दावा जरूर ठोकावा.)

तर… आपल्या आईचा मृतदेह समोर असताना हा जो काही लेन-देन व्यवहार होतो, त्याचा मानसिक क्लेश सहन केलेला मंटो लिहितो,’मी माझ्या आईचा खून केलाय असे मला वाटले, आणि या इसमाला माझा अपराध माहीत होता, नि केवळ दयेपोटी खून लपवण्याचे मार्ग दाखवून मला मदत करत होता. मला वाटले याक्षणी त्याला धक्के मारून बाहेर काढावे आणि रिकाम्या बाटल्या एकेक करून त्याच्या टाळक्यात हाणाव्यात. हे करून शिवाय शांत राहिलो याबद्दल संस्कृती आणि सभ्यता यांचे आभार मानायला हवेत.’ ( ‘तरक्क़ी याफ्ता कबरस्तान’ – 1942 )यातील शेवटचं वाक्य किती मार्मिक आहे, हे सूज्ञांस सांगणे न लगे.
पुढे कबरस्तान आणि तिथला व्यवहार याविषयी लिहिताना मंटोची औपरोधिक लेखणी अधिकच तीव्र होते. आतमध्ये शिरण्याकरता तिकीट घेणं, श्रीमंतांकरता उत्तम दर्जाची दफनभूमी, अनंत काळाच्या विश्रांतीची तजवीज करण्याची 300 रुपये ही किंमत,या बदल्यात चांगली जागा, सुबक थडगं, आजूबाजूला गुलाब-चमेलीची झाडं या सोयी तुम्हाला म्हणजे तुमच्या मृतदेहाला मिळतील, या खास जागेच्या देखभालीकरतावार्षिक सहा रुपये शुल्क हे नियम श्रीमंतांकरता असल्याचं त्याला कळलं.

तर सर्वसामान्यांकरता असलेली जागा साधी, तिथे कुठलीही फुलझाडं नाहीत, थडगी कच्ची, दर तीन-चार वर्षांनी ती उकरून इतरांना पुरण्याची सोय,  मृतदेह मातीत लवकर विरघळावा म्हणून डबरात विशेष मसाला घालण्याची व्यवस्था इत्यादी. सर्वसामान्यांच्या थडग्यांच्या रांगाच रांगा. त्यातून आपल्या माणसाचं थडगं ओळखण्याकरता विशेष क्रमांकाची धातूची पट्टी हवी असेल तर पैसे मोजून ती घ्यायची सोय. याव्यतिरिक्त थडग्याचं खोदकाम, लहान मुलांचे वेगळे, झाड आणि त्यांची निगा याकरता वेगळे पैसे, रात्री शव आणलं तर दिवाबत्तीचे वेगळे इत्यादी अनेक प्रकार.

कबरस्तानाबद्दलचं हे वर्णन वर्गभेदाचं एक उदाहरण आहे. आता इथे तो धर्म, त्या धर्माचे म्हणून स्वतःचे कायदे, त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य, त्यात आपण कशी ढवळाढवळ करायचीइत्यादी धर्मनिरपेक्षतेचे मुद्दे तूर्तास बाजूला ठेवू. 
‘क्रमांक’ या विषयाबद्दल मंटो लिहितो,’ क्रमांक दिल्याने गोष्टी सोप्या होतात. तुमच्या डायरीत तुमचे सर्वच तपशील तुम्ही क्रमांकात लिहू शकता. .. आणि जगाची खरेच प्रगती झाली तर तुम्ही जन्माला आल्याआल्याच तुम्हांला तुमच्या थडग्याचाही क्रमांक दिला जाईल.’ मंटोच्या या वाक्यांमध्ये भविष्याचं प्रतिबिंब आहे. लोकसंख्यावाढीमुळे आज नावापेक्षा क्रमांकाला महत्त्व आल्याचं आपण बघतो. 

आजच्या आपल्या जाहिरातीच्या युगात, दोनावर एक फ्री, दोनावर चार फ्री तत्सम जाहिरातींचे फंडे आपल्या अंगवळणी पडले आहेत.  दफनभूमीसारख्या विषयातया फ्री प्रकाराबद्दल मंटोने औपराधिकपणे आपल्या लेखणीतून ज्या प्रकारे लिहिलं आहे त्याला तोड नाही. मंटो लिहितो, ‘कदाचित दफनभूमीच्या ग्राहकांना अशा प्रकारची सूट देणा-या सूचना असू शकतील: ‘जे ग्राहक वर्षाला दोन मोठ्या कबरींसाठी खर्च करतील त्यावर त्यांना एका मुलाचीकबर मोफत मिळेल.’ किंवा ‘ जे एकाच वेळेस दोन कबरी खोदून घेतील त्यांना दोन गुलाबाची झाडे मोफत मिळतील…. आपण आणखी प्रगती केली तर मला वाटते थडग्यांचे आगाऊ बुकिंग करणेही   शक्य होईल का? शिवाय दफन करण्याची स्टाईलही एकदम आधुनिक असेल असे वाटते. त्याचीहीजाहिरात केली जाईल…’इथे तुमच्या प्रिय व्यक्तींना घरगुती वातावरण आणि शांतता लाभेल.’

आधुनिकपणाची ऐशीतैशी करत मृत्यू आणि त्या घटनेबद्दल सामान्य माणसाच्या मनात असलेल्या दुःख, करुणा ह्या भावनांना मंटो विनोदाची झालर लावतो, तेव्हा माणसाच्या एकंदरीतच जगण्याची कीव करावीशी वाटते.  हल्ली आउटसोर्सिंगचा जमाना आहे हे आपण अनुभवतोच आहोत, पणमृत्यू आणि त्यानंतरचे संस्कार यांचं भविष्यात आउटसोर्सिंग कसं केलं जाईल,कमर्शियल कसं केलं जाईल याचं सोदाहरण वर्णन मंटो करतो. त्याची लेखणी उपहासात्मक आणि विनोदी पद्धतीने लिहीत असली तरी, त्याने मांडलेले गेलेले विचार अतिशय गंभीर, अंतर्मुख करणारे आहेत. 

ज्या काळात मंटोने मुंबईतील दफनभूमीचा अनुभव घेतला तो काळ महायुद्धाच्यासावटाखालील होता. साहजिकच त्याचे पडसाद त्याच्या लेखात उमटलेले दिसतात.नैसर्गिक आपत्ती, बाॅम्बहल्ला अशा घटनांसाठी तुमच्या थडग्यावर बांधण्यात येणा-यासुरक्षा बांधकामाचे वेगळे पैसे, वातानुकूलित थडग्याकरता वेगळे पैसे असे या महायुद्धाच्या काळात आकारले जातील असे तो म्हणतो. स्वतःच्याच कल्पनाशक्तीचा प्रत्यय वास्तवात आल्याचा पुरावाही तो देतो.आईच्या दफनविधीनंतर जून, 1942 मध्ये पुन्हा इतर कुणाकरता दफनभूमीत गेल्यावर त्याला कळतं  कबर खोदाईचे पैसे वाढवले गेले आहेत.यावर मंटो टिप्पणी करतो,’युद्धाने दफनभूमीतही चलनवाढ लागू केली आहे.’ 

 जन्म-मृत्यू या माणसाच्या नैसर्गिक क्रियांना माणसानेच धर्माच्या संकल्पनेत सजवून आधी ग्लोरिफाय आणि नंतर कमर्शियल कसे केले याचं सोदाहरण विवेचनमंटोची लेखणी करते. ते करताना कोणतंही तत्त्वज्ञान सांगण्याचा किंवा संदेश देण्याचा आविर्भाव त्याच्या लेखनात दिसत नाही. वाचताना नकळतपणे वाचकसामाजिक, धार्मिक पातळीवर तुलनात्मक विचारही करू लागतो. तेव्हा लक्षात येतं, धर्म, जात या संकल्पना माणसांमध्ये घट्टं रुतलेल्या आहेत यात वादच नाही, पणधर्माच्याही पलीकडे माणसाच्या आदिम वृत्ती जितक्या समान असतात तितक्याचआधुनिक जीवनातल्या प्रवृत्तीही समानच असतात. उदा. संधीसाधूपणा. (मेलेल्याच्या टाळूवरचे…) 

लेखक स्वतः जितका संवेदनशील असेल तितकाच तो तटस्थही असेल तर तो जे भोवतालाचं निरीक्षण त्याच्या लेखनातून मांडतो ते अधिक करकरीतपणेसमोर येतं. सआदत हसन मंटो याचं लेखन हे त्या करकरीतपणाचं एक उत्तमउदाहरण आहे.
आईच्या मृत्यूपासून सुरू झालेला मंटोचा हा लघुलेख महायुद्धाच्या वैश्विक आपत्तीपर्यंत येऊन भविष्याबद्दल जे सूतोवाच करतो, त्यातून मंटो या लेखकाचं द्रष्टेपण सिद्ध होतं.(क्रमशः-)

(संदर्भ –‘मी का लिहितो?’, संपादन – श्री. आकार पटेल, अनुवाद – वंदना भागवत, परवानगीसह साभार , सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, 2016)
– © डाॅ निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.