मोरूची मावशी नाटकात ‘श्री’ ची भूमिका करणाऱ्या विजय चव्हाण यांना संपूर्ण महाराष्ट्र ‘मावशी’ म्हणूनच ओळखतो. महाराष्ट्राने या नाटकाला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. विजय चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने रंगमंचावरील कारकीर्द सुरु केली ती ‘टुरटूर’ या नाटकापासून. पुढे चित्रपटसृष्टीमधील त्यांची कारकीर्द सुरु झाली ती ‘वाहिनीची माया’ या चित्रपटापासून. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी अनेक लोकप्रिय व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले होते. त्यामुळे अभिनयाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे होता. तरीही त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता लाभली ती मोरूची मावशी नाटकामुळेच! त्यांनी एका नाटकामध्ये तब्बल १४ प्रकारच्या भूमिका बजावल्या होत्या.
विजय चव्हाण यांनी चार दशके नाटकाच्या रंगभूमीची निर्विवाद सेवा केली. रंगमंच गाजवल्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात करिअर केले. त्या क्षेत्रात पण त्यांनी चतुरंगी भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अष्टपैलू असणाऱ्या विजय यांचा जन्म मुंबईतील लालबाग येथे झाला.
विजय यांचा जन्म २ मे १९५५ रोजी लालबाग येथील सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या हाजी सम चाळीत लहानाचे मोठे झाले. त्यांचं बालपण तिथेच गेलं.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली. त्यांना मिळालेल्या पहिल्या एककांकिकेमधील सहभागाचा किस्सा खूपच रोमांचक आहे.
त्यांना जेव्हा पहिल्या एकांकिकेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली त्या एकांकिकेमध्ये त्यांचा मित्र विजय कदम यांची भूमिका होती. त्याच वेळी नशिबाने त्यांच्याकडे एक संधी चालून आली. एका दिवशी एकांकिकेमध्ये सहभागी होणारा स्पर्धक काही कारणास्तव सहभागी होऊ शकला नाही, तेव्हा विजय कदम यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. ते प्रत्येक तालमीच्या वेळी हजर असल्यामुळे त्यांना सर्व संवाद पाठ होते. त्यामुळे विजय चव्हाण यांनी ही भूमिका साकारली आणि त्यांचा रंगमंचावर प्रवेश झाला.
====
हे देखील वाचा: रंगभूमी गाजवलेलं सदाबहार नाटक ‘मोरूची मावशी’ ह्याचे काही रंगतदार किस्से तुमच्यासाठी
====
उंच बांधा, रांगडं व्यक्तिमत्व आणि विनोदाची अचूक जाण हे त्यांचे वैशिष्ट्य. मोरूच्या मावशीच्या रूपात त्यांनी मावशीचा केलेला अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला. त्यानंतर या नाटकाबाहेर कित्येक दिवस हाऊसफूलचे बोर्ड लागले होते. या नाटकातील मावशीची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांना मिळणार होती. पण त्यांनी या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे सांगितल्यामुळे ही भूमिका विजयजींच्या वाट्याला अली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं.
विजय यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यात अगदी लक्ष्मीकांत बेर्डेपासून, अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे तसंच, केदार शिंदे, पुरुषोत्तम बर्डे, विजय पाटकर आदी नामांकित चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.
====
हे देखील वाचा: आनंदघन – लता मंगेशकर यांची अविस्मरणीय आठवण
====
विजय यांनी अभिनय करताना प्रत्येक भूमिका जिवंत केली. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षक पण कलाकृती पाहत असताना खुर्चीला खिळून राहत असत. चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वबळावर काम मिळवले. ते नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले. कोणत्याही पुरस्कारांची कधीही अपेक्षा बाळगली नाही.
माजेर्ना कुआज यांच्याशी सुखाने संसार केला. त्यांचा मुलगा वरद चव्हाण सध्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांना २०१८ या वर्षी चित्रपट सृष्टीतील नामांकित व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. २४ ऑगस्ट २०१८रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.