Home » पक्ष सोडणाऱ्यांना गद्दार म्हटले नाहीत !

पक्ष सोडणाऱ्यांना गद्दार म्हटले नाहीत !

by Team Gajawaja
0 comment
Sharad Pawar
Share

विधानसभेला फक्त ४१ दिवसच राहिल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे आणि त्यानुसार कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारही निवडणुकीसाठी पूर्ण तयारी करत असून, लाडक्या बहिणी पाठोपाठ आता लाडक्या भावासाठीही योजना आणल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवारांनीही त्यांचं रिब्रॅंडिंग सुरु केलं असून अजित पवारांच्या सभांबरोबरच त्यांच्या कपड्यांमध्येही पिंक कलर दिसू लागला आहे. भाजपचे महत्वपूर्ण असं महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनही पुण्यात पार पडलं. (Sharad Pawar)

मात्र थेट निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आखत मैदानात उतरलेत तर ते शरद पवार. जवळपास रोजच अजित दादांचा कोणता ना कोणता आमदार किंवा मोठा पदाधिकारी शरद पवारांची भेट घेत आहे. मात्र याची तयारी शरद पवारांनी काही महिने आधीच केल्याचं चित्र आहे. सध्या शरद पवारांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग चालू केल्याचं चित्र आहे. खरंतर पक्ष, विचारधारा न बघता बेरजेचं राजकारण करत राहणे हेच शरद पवारांच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे. छगन भुजबळ, गणेश नाईक, भास्कर जाधव अशा अनेक नेत्यांना पक्षात ओढत शरद पवारांनी एककेकाळी शिवसेनाही रिकामी केली होती. मात्र सध्या शरद पवार हे बेरजेचं राजकारण वापरत आहेत ते त्यांचा पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी. यासाठी अजित पवारांबरोबर गेलेल्या अनेक नेत्यांच्या घरवापसीचा प्लॅन शरद पवार यांनी आखला आहे. (Sharad Pawar)

शनिवारी दिवसभर अजित दादांचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या होत्या. त्याआधी पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी माजी नगरसेवकांसह आजी माजी अशा ३० पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचा राईट हँड समजले जाणारे कामराज निकम हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. असंच अजित दादा गटाच्या दुसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांना शरद पवारांनी टार्गेट केल्याचं कळतं.

===================

हे देखील वाचा : आज नकद, उद्या मतदान… महायुतीची खेळी फळणार?

====================

मात्र या सर्वात एक इंटरेस्टिंग पॅटर्नही आहे. जेव्हा शिवसेनेत फूट पडली, तेव्हा एकनाथ शिदेंबरोबर जाणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी गद्दार म्हटले. ५० खोके सारखं नरेटिव्ह चालवलं. शिंदेंबरोबरच्या नेत्यांना आणि आमदारांना कायमची दारं बंद केली. मात्र शरद पवार नेमकं याच्या उलटं वागले. त्यांनी अजित दादांबरोबर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटले नाही. सोबतच पक्षात फूट पाडण्याबाबतही कायम साशंकता ठेवली. एवढी की बराच वेळ अजित दादा आणि शरद पवार मिळून तर हा फुटीचा गेम खेळत नाहीयेत ना? असं नरेटिव्ह तयार झालं होतं. यामुळे अजित दादांबरोबर गेलेल्या सर्वच आमदारांनी उघडपणे शरद पवारांविरोधात स्टॅन्ड घेतला नाही. काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी अजित दादांची साथ दिली, मात्र शरद पवारांनाही नाराज केले नाही. आता हेच आमदार आणि पदाधिकारी, महायुतीत न्याय मिळत नाहीये असं सांगत शरद पवारांकडे परत येत आहेत. शरद पवारही खुल्या मनाने त्यांचं स्वागत करत आहेत. (Sharad Pawar)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.