Home » शहीद भगतसिंह यांच्या आठवणींना उजाळा

शहीद भगतसिंह यांच्या आठवणींना उजाळा

by Correspondent
0 comment
Share

‘इंकलाब जिंदाबाद… इंकलाब जिंदाबाद… इंकलाब जिंदाबाद’ या नुसत्या नाऱ्याच्या जयघोषानं आजही रक्त सळसळतं. अंगाचा थरकाप होतो. काळीज पिळवटून निघतं. हा नारा देणारे भारत मातेचे वीरपूत्र शहीद भगत सिंह. स्वातंत्र्यासाठी ऐन तारुण्यात २३ व्या वर्षी निधड्या छातीनं ब्रिटीशांना सामोरं जात भगत सिंह यांनी बलिदान दिलं. शहीद भगतसिंह यांची आज जयंती.

भगत सिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ साली पंजाबमधील बंगा गावात झाला. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील सरदार किशनसिंह आणि काका सरदार अजितसिंह यांची तुरुंगातून सुटका झाली. म्हणून हा मुलगा भाग्यवान असल्यानं त्यांच्या आजीने त्यांचं नाव भगतसिंह ठेवले. जालियनवाला बाग हत्यांकाड घटनेचा त्यांच्या बालमनावर खोल परिणाम झाला. तरुण वयातच आपल्या कार्याची दिशा त्यांना ठाऊक होती.  ते लहानपणापासूनच क्रांतीकारी स्वभावाचे होते. बालपणी नेहमी ते म्हणत की, ‘आपण सर्वांनी बंदूकीची शेती करायला हवी. यामुळे आपण इंग्रजांना भारताबाहेर पळवून लावू शकतो.’

शहीद भगत सिंह यांनी दयानंद अँग्लो वेदीक शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर लाहोरच्या नॅशनलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तरुणपणीच त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुध्द आवाज उठवण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्य लढ्यासाठी भगत सिंह यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून १९२६ मध्ये नवजवान भारत सभा स्थापन केली. अमृतसरमध्ये पंजाबी आणि उर्दू भाषेतील वृत्तपत्रांसाठी मार्क्सवादी सिध्दांतासाठी लेखक आणि संपादक म्हणून काम केले.

भगतसिंह यांच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला असता त्यांनी तो फेटाळून लावला. ‘’आपण स्वातंत्र्याची शपथ घेतली आहे. माझं सर्वस्व मी भारत मातेसाठी दिलं आहे. त्यामुळे कोणत्याही  भौतिक सुखावर माझा अधिकारी नसल्याचं भगत सिंह यांनी आपल्या वडिलांना सांगितलं.’’ आणि ते घर सोडून कानपूरला येऊन पोहचले.

भगत सिंह यांना वाचनाची प्रचंड आवड होती. लहान वयातच त्यांनी अनेक क्रांतीलढ्याची पुस्तकं वाचून काढली. तुरूंगात असताना भगत सिंह यांनी ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोशॅलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’, ’ॲट द डोअर ऑफ डेथ’ ही ४ पुस्तकं लिहिली.  वीर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव शहीद भगत सिंह यांच्यावर होता. वीर सावरकरांचा प्रसिध्द ग्रंथ ‘दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स – १८५७’ भगतसिंहाना तोंडपाठ होता. 

पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉटने हिंदूस्थानातील राष्ट्रवादी नेते, लेखक लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देऊन त्यांना जखमी केले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूचा सूड म्हणून भगतसिंह यांनी स्कॉटला मारण्याची योजना आखली. पण स्कॉटच्या ऐवजी गोळी ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्स यांना लागली. मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी भगतसिंह यांनी तेथून पळ काढला. १९२९ मध्ये भगतसिंह आणि त्यांच्या एका साथीदारानं दिल्लीतील  केंद्रीय विधानसभेत डिफेन्स ऑफ इंडिया कायद्याच्या  निषेधार्थ बॉम्ब हल्ला केला. आणि त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना फासावर लटकवण्यात आले.

२३ मार्च १९३१ साली हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा राजगुरू यांनी अगदी आनंदानं लाहोरमध्ये भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूला कवटाळलं.

क फॅक्टस कडून भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या महान क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन !!!


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.