सौदी अरेबियाचे नाव घेतले तरी समोर तेथील विशाल वाळवंट उभे रहातात. या देशाचे तापमान ४०°C ते ५०°C पर्यंत असते. मक्का आणि मदीना ही इस्लामची पवित्र शहरे या देशात असून जागतिक अर्थव्यवस्थेत येथील खनिज तेलाचे उत्पादन हे सर्वात मोठा भाग आहे. मात्र सध्या हाच उष्ण देश वेगळ्या बातमीनं चर्चेत आला आहे. ज्या सौदीच्या वाळवंटात उष्णता सहन करत उंट मोकळेपणे फिरत होते, तेच वाळवंट आता बर्फाच्या चादरीमुळे पांढरे शुभ्र झाले आहेत. आणि या बर्फाच्या मा-यामुळे सौदीच्या वाळवंटातील उंटानाही कापरे भरले आहे. सौदी अरेबिया तीव्र उष्णता आणि वाळवंटी प्रदेशांसाठी ओळखले जाते. मात्र येथील हवामानात झालेला हा तीव्र बदल तेथील नागरिकांना जेवढा आश्चर्यचकीत करुन गेला आहे, तेवढेच हवामान तज्ञही या बदलानं संभ्रमात पडले आहेत. सौदी अरेबियाच्या अनेक भागात अचानक बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि तापमानात तीव्र घट झाली आहे. ३० वर्षांनंतर या देशात अशी असामान्य थंडी पडली असल्यामुळे हा निसर्गाचा चमत्कार मानण्यात येत आहे. ज्या भातातील तपमान ५०°C पर्यंत जात असे, आता तेथील तापमान हे थंड वाऱ्यांमुळे गोठणबिंदूपेक्षा खाली गेले आहे. फारकाय मुसळधार पाऊस आणि हिमवर्षावामुळे राजधानी रियाधमधील शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. हवामान बदलाच्या या घटनेचा अभ्यास करण्यासाठी आता देश-विदेशातील तज्ञ रियाधमध्ये दाखल होत आहेत. ( Saudi Arabia Snowfall )

Saudi Arabia Desert Snowfall
सौदी अरेबिया देशाची ओळख ही त्याच्या वाळवंटात आहे. जोरदार उष्ण वारे आणि कधीही संपणार नाही असा वाळवंट ही सौदी अरेबियाची ओळख पुढच्या काही वर्षात पुसली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सौदी अरेबियामध्ये बर्फवृष्टी होत आहे. देशाच्या मोठ्या भागात हिमवर्षाव, मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सौदी अरेबियामधील उष्ण वातावरण कुठल्याकुठे पळाले असून तिथे आता कडक थंडी पडली आहे. सौदीच्या वाळवंटावर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने या भागातील नागरिक आणि हवामान तज्ञही आश्चर्यचकीत झाले आहेत. उत्तर सौदी अरेबियातील ताबुक प्रांताच्या पर्वतांवर हिमवर्षाव झाला असून हा संपूर्ण परिसर पांढ-या शुभ्र रंगाचा दिसत आहे. सुमारे २,६०० मीटर उंचीवर असलेल्या जेबेल अल-लॉज येथील एक उंचावरील पर्यटन स्थळ, ट्रोजाना, बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकले गेले आहे. तेथे पाऊसही पडत असल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. हे दृष्य येथील स्थानिकांनी पहिल्यांदाच बघितल्याचे सांगण्यात येत आहे. कारण याच ताबुक प्रांतातील पर्वत हे नेहमी उष्णतेने उन्मळून पडतात, त्यांच्यावर आता बर्फ पडला आहे. वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये बर्फाचे हे मिश्रण जादुई आणि अकल्पनीय दिसत आहे. अनेकांना हे दृष्य एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखेच वाटत आहे. सध्या येथील शून्यापेक्षा खाली गेले आहे. ( Saudi Arabia Snowfall )
याव्यतिरिक्त, मध्य पूर्वेतील देशात अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या हेल शहराभोवतीही बर्फवृष्टी झाली आहे. येथील काही भागात तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले असून त्यामुळे स्थानिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रियाधच्या उत्तरेकडील अल-मजमाह आणि अल-घाट प्रदेशातही हिमवर्षाव झाला आहे. यामुळे येथील शेतीबर्फाखाली गेली आहे. शिवाय टेकड्याही बर्फानं झाकल्या गेल्या आहेत. स्थानिकांना अशा परिस्थितीत काय करावे याची माहितीही नसल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. जी शेती बर्फाखाली झाकली गेली आहे, त्याच्या शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच येत्या काही दिवसांत, या भागात तापमान असेच रहाणार असून बर्फवृष्टी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. त्यामध्ये वाहने हळू चालवण्याची सूचना आहे.
=======
हे देखील वाचा : Saudi Arabia : सौदीचे वाळवंट जलमय !
=======
राजधानी रियाधसह अनेक प्रभावित शहरांमधील शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना दऱ्या आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. शिवाय बर्फवृष्टी चालू असतांना शक्यतो घराबाहेर पडू नये, आणि घराबाहेर असल्यास सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. असे असले तरी या अभूतपूर्व घटनेचे फोटो काढण्यासाठी आता सौदीचे नागरिक हे मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत. बर्फांनी झाकलेले पर्वत आणि वाळवंट यांचे फोटो काढण्यासाठी या कडाक्याच्या थंडीतही गर्दी झाली आहे. अल-मजमाह आणि अल-घाटमध्ये बर्फवृष्टी पाहण्यासाठी गर्दी होत आहे. ( Saudi Arabia Snowfall )
सई बने
