मक्का हे इस्लाममधील सर्वात पवित्र शहर आहे. पश्चिम सौदी अरेबियातील हेजाझ प्रदेशात असलेल्या मक्कामध्ये काबा आणि मस्जिद अल-हरम आहेत. हा सर्व प्रदेश वाळवंटी आहे. येथे फार थोड्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे येथील पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरते. मात्र गेल्या काही वर्षापासून होत असलेल्या हवामान बदलाचा फटका या वाळवंटी भागालाही बसत आहे. नुकताच मक्का येथे मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस एवढा प्रचंड होता की, यामुळे भीषण पूर आला, येथील सर्व रस्त्यांचे तलावांमध्ये रुपांतर झाले. बराचवेळ हा सर्व भाग काळ्या ढगांच्या आच्छादनाखाली होता. पावसामुळे सर्वच भाग जलमय झाल्यामुळे सर्वत्र भीती निर्माण झाली. (Saudi Arabia)

सौदी अरेबिया, मक्का हे भाग वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखले जातात. या वाळवंटामध्ये गेल्या काही वर्षापासून पाऊस पडू लागला आहे. काही दिवसांपूर्वी येथे असाच मुसळधार पाऊस झाला. यामुळे सर्वच मक्का शहराला नदिचे स्वरुप आले होते. पावसामुळे आलेल्या पुरामुळे रस्ते गायब झाले आणि त्याजागी तलाव तयार झाले. पावसाचे हे रौद्र रुप पाहून येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मुसळधार पावसामुळे सौदी अरेबियाच्या जेद्दाह, मक्का आणि आसपासच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे परिस्थिती एवढी भयानक झाली की, स्थानिक शाळा बंद करण्यात आल्या. (International News)
येथे चालू असलेले सार्वजनिक कार्यक्रमही रद्द करावे लागले. या भागात असा मुसळधार पाऊस फारसा होत नाही, त्यामुळे पावसाचे साठलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कुठलिही तरतूद केलेली नाही. त्याचा परिणाम म्हणून पाऊस होऊन गेल्यावरही मक्का मधील रस्त्यांवर पाणीच पाणी आहे. यात येथील हवामान खात्यानं आगामी दिवसामध्येही असाच मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानं दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट दिल्यामुळे येथील नागरिक धास्तावले आहेत. सुरुवातीला हलक्या स्वरुपाचा पाऊस होता. त्यामुळे स्थानिक नागरिक सुखावले होते. नागरिकांनी या पावसाचा आनंद घेण्यासाठी सार्वजनिकस्थळी गर्दी केली. शहरातील बगिचांमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक जमले. पण काही क्षणातच या पावसानं रौद्र रुप घेतलं आणि नागरिकांची पळापळ झाली. रस्त्यावर पाणी साचू लागले आणि गाड्या त्यात अडकू लागल्या. (Saudi Arabia)
काही ठिकाणी गाड्यांमध्ये पाणी गेल्यामुळे गाड्या बंद पडल्या आणि ट्रॅफीक जमू लागले. त्यातच पावसाचा जोर वाढल्यामुळे या रस्त्यांवरही पाणी साठले. परिस्थिती एवढी गंभीर झाली की, संपूर्ण शहरात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते बंद करावे लागले. पावसाचा जोर अधिक वाढणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना सखल भागात आणि दऱ्यांमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने मक्का, जेद्दाह, रबीघ, खुलाईस, बहरा आणि इतर अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. फक्त पाऊसच नाही तर त्यासोबत गारपीट, जोरदार वारे वाहण्याचा धोकाही आहे. सौदी आणि परिसरात अशा प्रकारचा पाऊस काही वर्षांनी पडत आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये अनेक चर्चाही सुरु झाल्या आहेत. (International News)

मक्का आणि परिसरात पावसानं जलमय झालेला परिसर बघून काही नागरिकांनी हा कोप असल्याचे सांगितले. मात्र हवामान तज्ञ या पावसासाठी बदलत्या हवामानाचे कारण देत आहेत. भविष्यात सौदी आणि परिसरात असा पाऊस पडण्याच्या घटना वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काही हवामान तज्ञांच्या नुसार सौदीमधील वाळवंटी भागही काही वर्षानंतर हिरवाईमध्ये बदलणार आहे. मात्र या सर्वांसाठी काही वर्षांचा अवधी लागणार आहे. (Saudi Arabia)
========
हे देखील वाचा : Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !
========
सौदीच्या मक्का आणि जेद्दामध्ये २००९ आणि २०११ मध्ये अशाच प्रकारचा पाऊस झाला होता. त्यामुळे येथे भयावह पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मदिना, ताबुक, अल जवफ, उत्तर सीमावर्ती भाग आणि पूर्व प्रांतातही पाऊसासोबत गारपीट आणि धुळीची वादळे येतात. मात्र यावेळी झालेला पाऊस हा त्यापेक्षाही अधिक असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पाऊस पडणे ही नैसर्गिक घटना असून कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, अशाही सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
