राजस्थान हे तेथील राजघराण्यांसाठी ओळखलं जातं. राजस्थानमधील जनता आजही या राजघराण्यांना मान देते आणि आपल्या राजाला देव मानते. अशाच राजघराण्यांपैकी एक मेवाडचे राजघराणे आहे. या घराण्यानं आपल्या नव्या राजाचा राज्यभिषेक सोहळा साजरा केला आहे. भारतात जरी लोकशाही असली, तरी राजघराण्यांनी आपल्या रुढी आणि परंपरा जपल्या आहेत. यानुसार मेवाडच्या राजघराण्यानं आपल्या नव्या राजाचे स्वागत केले आहे. चित्तौडगड किल्ल्यावर तब्बल 493 वर्षानी विश्वराज सिंह मेवाड यांचा राजतिलक सोहळा पार पडला. या सोहळ्यावर अनेकांनी टिका केली होती. भारतात लोकशाही असून असे राज्यभिषेक सोहळे करणे हा भारतीय लोकशाहीचा अपमान असल्याची टिका करण्यात येत होती. (Rajasthan)
मात्र या सर्व टिकेकडे दुर्लक्ष करीत राजघराण्यानं आपल्या परंपराचे पालन करत राजतिलक सोहळा साजरा केला. यावेळी महाराणा विश्वराज सिंह मेवाड यांना 21 तोफांची सलामीही देण्यात आली. चित्तोडगड किल्ल्यावर पार पडलेला हा सोहळा अनेक अर्थांनी चर्चेत राहिला. कारण या किल्ल्यावर महाराणा संगाचे पुत्र महाराणा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. त्यानंतर विश्वराज सिंह मेवाड यांचा राजतिलक सोहळा झाल्याची माहिती आहे. चित्तोडगडावर झालेल्या या सोहळ्यासाठी राजस्थानमधील मान्यवर राजघराण्यातील मान्यवर उपस्थित होते. शिवाय चित्तोडगड परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विश्वराज सिंह मेवाड यांना सिंहासनावर बसवण्याची परंपरा चितोड किल्ल्याच्या फतेह प्रकाश महालात झाली. यावेळी विश्वराज यांचा रक्ताभिषेक झाला. राजे महेंद्रसिंह मेवाड यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नाथद्वाराचे आमदार विश्वराज सिंह मेवाड यांचा हा राज्याभिषेक सोहळा गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानमधील राजकारणाचा केंद्रबिंदू झाला होता. आजच्या युगात असे खर्चिक समारंभ करण्याची काय गरज असल्याची ओरडही करण्यात आली होती. पण या सर्वात राजभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरु होती. (Social News)
या गादीवर बसणारे विश्वराज सिंह मेवाड हे एकलिंगनाथजींचे 77 वे दिवाण आहेत. महाराणा प्रताप यांच्या वंशजांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उदयपूरच्या माजी राजघराण्याचे सदस्य विश्वराज सिंह मेवाड यांना हा समारंभ कसा होईल, याचीही कुजबूज काही दिवसापासून चालू होती. मात्र मेवाडचे राव, उमराव आणि मान्यवर राजघराण्याचे सदस्य पारंपारिक पोशाखात हजर होते. त्यासोबत देशातील शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आदी क्षेत्रांशी संबंधित अनेक नामवंत आणि साधू-संतही यावेळी उपस्थित होते. विश्वराज सिंह मेवाड यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्गावर फुलांची उधळण करण्यात आली होती. विविध राजघराण्यातील लोकांनी त्यांचे स्वागत केले. ज्यांनी या सोहळ्याला विरोध केला होता, त्यांना राजघराण्यांतर्फे उत्तरही देण्यात आले आहे. असा सोहळा झाल्यावर चित्तोडगड किल्ल्याची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये भर पडणार असून, त्याचा फायदा शेजारच्या गावातील सामान्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणकारांच्या मते, महाराणा संगाचा मुलगा महाराणा विक्रमादित्य याचा राज्याभिषेक सोळाव्या शतकात चित्तौडगडच्या सिंहासनावर झाला. (Rajasthan)
=====
हे देखील वाचा : वाराणसीमध्ये कालभैरव जयंतीच जय्यत तयारी
========
आता विश्वराज सिंग यांच्यामुळे मेवाडची प्राचीन राजधानी असल्याचा चित्तोडचा अभिमान जिवंत होणार आहे. पर्यायानं पर्यटकांसाठी आणखी एक उत्सुकतेचे स्थान निर्माण होणार आहे. या सर्व सोहळ्यानंतर विश्वराज सिंह यांनी उदयपूर सिटी पॅलेसमध्ये धुनीचे दर्शन घेतले. तसेच एकलिंगनाथजी मंदिरातही दर्शन घेतले. राजघराण्याचे माजी सदस्य आणि माजी खासदार महेंद्र सिंह मेवाड यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा विश्वराज सिंह मेवाड यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून पगडी प्रथा देण्यात आली आहे. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि नाथद्वारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. विश्वराज सिंह हे मेवाडचे शेवटचे महाराणा भागवत सिंग यांचे नातू आहेत आणि सिसोदिया कुटुंबात जन्मलेले महान राजपूत योद्धा महाराणा प्रताप यांचे वंशज आहेत. या राजघराण्यातही अनेक वाद असून या सर्वांचा परिणाम या राजतिलक सोहळ्यावर झाला होता. विश्वराज सिंह मेवाड यांचे बंधू आणि काका यांच्यासोबत संपत्तीबाबतवाद असून हे सर्व वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. या सर्व वादांना बाजूला ठेवत झालेला हा राजतिलक सोहळा पुढच्या काही दिवसांसाठी गाजत रहाणार आहे. (Social News)
सई बने