Home » राधा अष्टमीसाठी ब्रजभूमी सजली

राधा अष्टमीसाठी ब्रजभूमी सजली

by Team Gajawaja
0 comment
Radha Ashtami
Share

कृष्णजन्माचा उत्सव नुकताच साजरा झाला आहे. मथुरा, वृंदावन येथे मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो, तसेच देशभरही कृष्णजन्म साजरा होतो. पण त्यानंतर बरोबर पंधरा दिवसांनी असा एक दिवस येतो, की जो मथुरा आणि वृंदावनमध्येच मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हा उत्सव म्हणजेस राधा अष्टमी. राधाजींचा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या १५ दिवसांनी झाला. राधा राणींच्या पूजेशिवाय कृष्णपूजा अपूर्ण आहे. त्यामुळे येत्या ११ सप्टेंबर रोजी राधाष्टमी साजरी करण्यात येणार आहे. यासाठी मथुरेच्या बरसाना येथील प्रसिद्ध राधाराणी मंदिरात मोठी सजावट करण्यात येत आहे. बरसानाच्या मध्यभागी असलेल्या एका टेकडीवर हे सुंदर मंदिर आहे. या मंदिराला ‘बरसाने की लाडली जी का मंदिर’ आणि ‘राधारानी महल’ असेही म्हटले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या अष्टमी तिथीला येथे राधा राणींची विशेष पूजा केली जाते. हा दिवस राधा राणींचा वाढदिवस म्हणून साजरा होतो. स्कंद पुराण आणि गर्गा संहितेत यादिवशी श्री राधाराणींचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता संपूर्ण बरसाणा आणि वृंदावनही राधाराणींच्या जन्मदिवसासाठी सजवण्यात आले आहे. (Radha Ashtami)

कृष्ण जन्माष्टमीनंतर राधाअष्टमीचा उत्सव बरसाणा येथे मोठ्याप्रमाणात साजरा होतो. राधाअष्टमीच्या शुभ मुहूर्तावर राधा राणींची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे बरसाणा येथील राधाराणी मंदिरात यादिवशी विवाहितांची गर्दी असते. याशिवाय विवाहउत्सुक असलेल्या तरुण तरुणीही यादिवशी राधाराणींच्या चरणी नतमस्तक होतात. योग्य जीवनसाथी मिळावा, यासाठी हे तरुण राधाराणींची आराधना करतात. जन्माष्टमीच्या १५ दिवसांनी राधाजींचा वाढदिवस साजरा येतो. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी ही राधाअष्टमी साजरी होईल. यासाठी मथुरा, वृंदावन, बरसाना आणि नांदगावमध्ये आकर्षक सजावट करण्यात येत आहे. १० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी हा उत्सव सुरु होईल. ११ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून २६ मिनीटांनी उत्सवाची समाप्ती होईल. मात्र मंदिरातील हा उत्सव संपला तरी बरसाणा शहरभर हा उत्सव आठवडाभर साजरा होतो. यासाठी वृंदावनमधील नागरिक रंगीबेरंगी कपडे घालून राधाराणीला भेटण्यासाठी बरसाणा येथे येतात. (Radha Ashtami)

नृत्य करत, गाणी म्हणत येणा-या या वृंदावनवासीयांचे बरसाणामध्ये फुलं उधळून स्वागत करण्यात येते. श्रीकृष्ण भक्त या विशेष उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. अलिकडच्या काही वर्षात या उत्सवाला मोठ्या प्रमाणात भारतभरातील नागरिक आणि परदेशी नागरिकही उपस्थित रहात आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं या पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यामुळे या भागातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळत आहेत. बरसाणा मध्ये श्री राधाजी यांना प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानण्यात येते. देवी लक्ष्मीचा अवतार म्हणूनही श्री राधाजींची पूजा करण्यात येते. बरसाणा हे राधा राणींचे गाव मानले जाते. येथील अनेक प्रसिद्ध मंदिरात राधाराणी भगवान कृष्णाच्या कथा सांगितल्या जातात. मात्र बरसाणा येथील राधाराणींचे मंदिर त्यातील प्रमुख आहे. पांढ-या संगमरवरी दगडात उभारलेल्या या मंदिराचे सौंदर्य अनोखे आहे. या मंदिरात राधा राणीच्या जीवनाशी संबंधित अनेक चित्रेही पाहायला मिळतात. पौराणिक कथांनुसार राजा वृषभानुने केलेल्या यज्ञभूमीतून श्री राधाजी प्रकट झाल्या होत्या. (Radha Ashtami)

==============

हे देखील वाचा :  हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा

===============

अनेक पौराणिक ग्रंथात श्री राधा हे कृष्णाच्या शक्तीचे शाश्वत रूप आणि जीवनाची प्रमुख देवता म्हणून वर्णन केले आहे. म्हणून राधाजींच्या पूजेशिवाय श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते. यासाठी संपूर्ण बरसाणा आणि वृंदावनमध्ये घरोघरी मालपुआ आणि रबडी हा पारंपारिक पदार्थ केला जातो. पुराणातील उल्लेखानुसार राधाराणींचे हे दोन पदार्थ आवडते होते. त्यामुळे त्यांना राधाष्टमीला याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. बरसाणाच्या राधामंदिरत भव्य असे कमळपुष्पाच्या आकाराचा मंडप करण्यात येतो. तसेच राधाराणींना कमलफुलांनी सजवण्यात येते. संपूर्ण मंदिरभर चंदनाच्या अत्तराचा शिडकावा करण्यात येतो. तसेच सुगंधी फुलांच्या माळांनी मंदिराची सजावट केली जाते. या सर्व वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी हजारो राधाभक्त बरसाणा आणि वृंदावनमध्ये हजर झाले आहेत. (Radha Ashtami)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.