Home » एक ऑडी आणि आयएएस अधिकारी

एक ऑडी आणि आयएएस अधिकारी

by Team Gajawaja
0 comment
Pooja Khedkar
Share

महाराष्ट्रात सध्या एका प्रशिक्षणार्थी आयएएस अधिका-यांचे नाव चर्चेत आले आहे. चर्चेत म्हणण्यापेक्षा हे नाव गेल्या आठवड्याभरात सर्वाधिक वादात सापडले आहे. या आहेत, पूजा खेडकर. २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्याबाबत होणा-या नवनव्या खुलाशांनी या चर्चांना जोर आला आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असतांनाही गेल्या दोन महिन्यांपासून विविध सुविधांची मागणी केल्याचा आरोप पूजा यांच्यावर ठेवण्यात आला. कार्यालयात येतांना त्या विशेष वाहन म्हणून ऑडी घेऊन येत असत. त्या ऑडीवरच लाल दिवा लावून घेतला होता. शिवाय लेटर पॅड, नेम प्लेट, स्वतंत्र कार्यालय कक्ष आणि कर्मचारी यांचीही पूजा खेडकर यांनी मागणी केली होती.

सध्या प्रशिक्षण कालवधी असल्यामुळे पूजा यांना विशेषाधिकार अजून मिळालेले नव्हते. तशी त्यांना कल्पना देण्यात आली होती. पण या आपल्या मागण्यांवर त्या ठाम राहिल्या. एवढेच नाही, तर अन्य एका अधिका-याची केबिन त्यांच्या अनुपस्थित वडिलांच्या मदतीनं हिसकावून घेतल्याचा आरोपही पूजा यांच्यावर आहे. याशिवाय धक्कादायक म्हणजे, त्यांनी आपल्या आजारपणाचे जे दाखले दिले आहेत, तेही बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर झालाय. ओबीसी प्रवर्गातून आयएएस परीक्षेला बसलेल्या पूजा यांच्या वडिलांचे उत्पन्नही कोटीच्या घरात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आलंय. त्यामुळे पूजा खेडकर यांची आणि त्यांच्या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी आता कऱण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या प्रशासकीय अधिका-याच खळबळ उडाली आहे. (Pooja Khedkar)

 

गेल्या काही दिवसापासून पुण्यात पुजा खेडकर या महिला आयएएस अधिका-यांचे नाव अधिक गाजले. २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची मसुरी येथील प्रशिक्षणानंतर पुण्यात सहायक जिल्हाधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली. त्याकाळात त्या ऑडी गाडीनं कार्यालयात येत असत. शिवाय प्रशिक्षणादरम्यान व्हीआयपी नंबर प्लेट आणि ऑडीला लावलेला लाल दिवा वादात आला. त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन, कर्मचारी आणि निवासस्थानाची मागणी केली. यासाठी त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवला होता. (Pooja Khedkar)

शिवाय पुण्याच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूजा या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या, पण त्या कोणत्याही अधिका-यांबरोबर योग्यप्रकारे बोलल्या नसल्याचा आरोप आहे. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी त्यांना मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या केबिनमध्ये बसायची विनंती केली होती. पण पूजा यांनी त्याला नकार देत स्वतंत्र केबिनची मागणी केली.

यावर न थांबता पूजा खेडकर यांनी आपले वडील दिलीप खेडकर यांच्यासोबत पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या केबिनवर दावा केला. त्यावेळी अजय मोरे हा प्रशासकीय कामासाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे मोरे यांच्या केबिनमधील फर्निचर हलवून पूजा यांनी त्यांना पसंत असलेले फर्निचर केबिनमध्ये ठेवले. या संपूर्ण प्रकारानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली होती. (Pooja Khedkar)

आता त्याच पूजा खेडकर यांनी प्रमाणपत्र देतांनाही फसवणूक केल्याचा आरोप काही समाजसेवी संस्थांनी केला आहे. पूजा यांनी अपंगत्व प्रमाणपत्र दिले असून ते बनावट असल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर यांनी अपंग प्रमाणपत्रासह यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र त्या कुठल्याही वैद्यकीय तपासणीला गेल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे. अशावेळी त्यांची नियुक्ती झालीच कशी हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. पूजा या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील नोंदणीकृत अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.

====================

हे देखील वाचा : मुंबई महापालिकेतील राजकीय कार्यालयांना टाळं, कोणत्या आधारावर घेतला हा निर्णय?

====================

दिलीप खेडकर हे राज्य प्रदूषण विभागाचे आयुक्त होते. पूजा यांची आई मनोरमा खेडकर सरपंच आहेत. पूजा यांच्या वडिलांचे उत्पन्न ४० कोटी रुपये आहे. असे असतांनाही त्या ओबीसी वर्गवारीमधून परीक्षेला बसल्या होत्या. UPSC परीक्षेत त्यांना ८२१ रँक मिळाल्याचे सांगितले जाते. पुण्यात झालेल्या वादानंतर त्यांची बदली वाशिम येथे झाली आहे. पण त्यांच्या एकूणच नियुक्तीवर वाद सुरु झाला आहे. (Pooja Khedkar)

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी बळकावलेली केबिन, त्यांच्या वडिलांचा सरकारी कार्यालयात होणारा वादग्रस्त वावर आणि परीक्षांमध्ये दिलेले आजारपणाचे कागदपत्र यावरुन पूजा खेडकर यांची नव्यानं चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे. एका आयएएस अधिका-याच्या या वर्तनाची पुण्यात आणि प्रशासकीय अधिका-यांमध्ये अधिक चर्चा सुरु आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.