पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या थायलंड दौ-यावर होते. त्यांच्या या दौ-याची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा थायलंडच्या 38 वर्षीय पंतप्रधान पिटोंगटार्न शिनावात्रा यांच्याबद्दल झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्वात तरुण व्यक्तिमत्व म्हणून पिटोंगटार्न शिनावात्रा यांचे नाव घेण्यात येते. शिनावात्रा यांच्या सौदर्यांबाबत नेहमी बातम्या येतात, शिवाय त्यांच्यावर कठपुतली असा शिक्काही बसला आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांच्यासोबत वावरतांना शिनावात्रा यांनी दाखवलेली समज आणि 6 व्या बिम्सटेक परिषदेचे केलेले यशस्वी आयोजन यावरुन त्यांनी आपण राजकारणात नवखे नसल्याचे सिद्ध केले आहे. (Pitongtarn Shinawatra)
शिनावात्रा यांचे कुटुंब देशातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या त्या कन्या आहेत. थाक्सिन शिनावात्रा हे जेवढे राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत, तेवढेच ते व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राजकारणाचा प्रभाव त्यांच्या मुलीवरही आहे. 2004 मध्ये झालेल्या एक घटनेनं थाक्सिन यांनी आपल्या देशाविरोधात झालेले उठाव किती कठोर पद्धतीनं मोडून टाकले आहेत, हे अवघ्या जगानं पाहिलं आहे. वेळप्रसंगी जगभरातील कट्टरवाद्यांची टिका त्यांनी सहन केली आहे. मात्र देशाच्या विरुद्ध असलेल्या कुठल्याही कारवाया सहन करणार नाही, असा सज्जड दम देणा-या थाक्सिन यांची कन्या पिटोंगटार्न शिनावात्रा यांचीही प्रशासनावर तेवढीच पकड आहे.
थायलंडच्या 38 वर्षीय पिटोंगटार्न शिनावात्रा सध्या चर्चेत आहेत. वडिलांची सत्ता थायलंडवर कायम रहावी म्हणून पिटोंगटार्न यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांच्यावर कठपुतली असा शिक्का मारण्यात येतो. अर्थात यासाठी पिटोंगटार्न यांच्या वडिलांची, थाक्सिन शिनावात्रा आणि काकू यिंगलक शिनावात्रा यांची ओळख करुन घ्यायला हवी. या दोघांनीही थायलंडचे पंतप्रधानपद भूषविले आहे. (Pitongtarn Shinawatra)
विशेष म्हणजे, पिटोंगटार्न यांचे वडील थाक्सिन शिनावात्रा यांचे नाव थायलंड़च्या जडणघडणीत प्रमुख आहे. थाक्सिन हे कठोर प्रशासक म्हणून ओळखले गेले. त्यासाठी 2004 मधील एका घटनेचे उदाहरण देण्यात येते. थायलंडच्या दक्षिण भागात पट्टानी या वेगळ्या मुस्लिम देशासाठी मागणी करण्यात येत होती. थायलंडमधून हा भाग वेगळा करावा आणि त्याला देशाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होती. त्यासाठी देशभर निदर्शने काढण्यात आली. मोठ्याप्रमाणात झालेल्या या आंदोलनामुळे थायलंड पेटले होते. थाक्सिन यांनी ही आंदोलने कठोरपणे मोडून काढली. त्यांनी पोलीसांना आंदोलकांना अटक कऱण्याचे आदेश दिले. हे आदेश मिळाल्यावर आंदोलकांना अटक करण्यात आली.
त्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. हजारो मुस्लिम आंदोलकांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत अटक केलेल्यांना सोडण्याची मागणी केली. त्यानंतर हजारो पोलीस दाखल झाले. त्यांनी अनेक आंदोलकांना अटक केली. फक्त अटकच नाही, तर या सर्वांना नग्न करुन त्यांचे हात बांधण्यात आले. 26 ट्रकमध्ये या हजारो आंदोलकांना अक्षरशः कोंबण्यात आले. 150 किमी असलेल्या लष्करी छावणीत त्यांची रवानगी करण्यात आली. 7 तासांच्या या प्रवासात 78 आंदोलकांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. यामुळे जगभर खळबळ उडाली. थायलंड सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. (Pitongtarn Shinawatra)
मात्र देशाच्या विरोधी वर्तन सहन करणार नाही, ही ठाम भूमिका थाक्सिन यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेचे थायलंडच्या बौद्ध बहुसंख्य नागरिकांनी स्वागत केले. थायलंडला फुटिरवाद्यंपासून वाचवण्यासाठी थाक्सिनसारखाच पंतप्रधान हवा, यावर जनतेचाही विश्वास बसला. त्याच थाक्सिन यांच्या पिटोंगटार्न शिनावात्रा या ज्येष्ठ कन्या आहेत. थाक्सिन यांनी त्यांच्या कुटुंबातील परंपरागत रेशीम व्यवसायाला नवे स्वरुप दिले. त्यांनी ‘शिनावात्रा सिल्क’ची स्थापना केली. हा थायलंडमधला मोठा उद्योग समूह आहे. थाक्सिन हे थायी पोलीस दलातही होते. अमेरिकेतून त्यांनी क्रिमिनल जस्टिसमध्ये मास्टर्स आणि डॉक्टरेट मिळवली.
===============
हे देखील वाचा : Famous Bridge : भारतातील ‘हा’ खांबविरहित ब्रिज, रात्री १२ वाजता खास कारणामुळे होतो बंद
===============
त्यानंतर ते थायलंडला आले आणि पोलिस विभागात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचले. काही वर्षानंतर ते राजकारणात आले आणि थायलंडचे 23 वे पंतप्रधान बनले. त्यांनी ड्रग्जमाफीयांविरोधात केलेल्या मोहिमा गाजल्या आहेत. 3 महिन्यात त्यांनी 2500 हून अधिक ड्रग्ज माफियांना ठार मारले. त्यामुळे सर्वसामान्य थायी जनतेत त्यांची लोकप्रियता मोठी झाली. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी न्यू यॉर्कला गेलेल्या थाक्सिन यांच्याविरोधात 2006 साली लष्करी उठाव झाला आणि त्यांची सत्ता गेली. या उठावाला मलेशियाचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. (Pitongtarn Shinawatra)
15 वर्ष थाक्सिन दुबईमध्ये राहिले, पण थायलंडच्या राजकारणावर असलेला त्यांचा प्रभाव कोणालालाही कमी करता आला नाही. त्यांच्या अनुपस्थितीत, त्यांची धाकटी बहीण यिंगलक शिनावात्रा 2011 मध्ये राजकारणात आली. त्या थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मात्र 2014 मध्ये लष्करानं त्यांनाही पदच्युत केले. त्यानंतर 2023 मध्ये थाक्सिन यांच्या निकटवर्तीय श्रेथा थाविसिन पंतप्रधान झाल्या. पण त्यांची न्यायालयानं उचलबांगडी केल्यावर थाक्सिन यांनी आपल्या मुलीला, पिटोंगटार्न शिनावात्रा यांना थायलंडच्या पंतप्रधान पदावर विराजमान केले आहे. दोन मुलांच्या आई असलेल्या पिटोंगटार्न या व्यवसायिका आहेत. आपल्या वडिलांचे कठोर प्रशासन आणि त्यांना मिळणारा जनतेचा पाठिंबा त्यांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळेच थायलंडमध्ये काही कालावधीतच लोकप्रिय पंतप्रधान अशा बहुमान त्यांना मिळाला आहे.
सई बने