संसदेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली मध्ये सुरु आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज अनेक मुद्द्यावरुन चांगलीच वादावादी सुरु आहे. आता या सर्वात अजून एका वादाची भर पडणार आहे. हा वाद आहे, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पत्रासंबंधातला. नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालयात ठेवलेली जवाहरलाल नेहरु यांची पत्रे गायब झाली आहेत. ही पत्रे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 2008 मध्ये एक आदेश देऊन आपल्याकडे मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही पत्रे त्यांनी पंतप्रधान संग्रहालयाला अद्याप परत केली नाही. संबंधित पत्रे तत्कालीन पंतप्रधान नेहरु यांनी एडविना माउंटबॅटन आणि अन्य भारतीय नेत्यांना लिहिली आहेत. या पत्रांकडे देशाचा वारसा म्हणून बघितले जाते. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ही पत्र त्वरित परत करावीत अशी विनंती आता राहुल गांधी यांना पत्र लिहून कऱण्यात आली आहे. तसेच या पत्रांची मुळ प्रत देऊ शकत नसतील तर डिजिटल किंवा फोटोकॉपी द्यावी, अशी विनंतिही पंतप्रधान संग्रहालयातर्फे करण्यात आली आहे. संग्रहालयातर्फे राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांच्याकडे जवाहरलाल नेहरु यांच्या पत्राचे 51 बॉक्स दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. संसदेचे अधिवेशन चालू असतांना या पत्राचा विषय आल्यामुळे आगामी दिवसात या पत्रांचे पडसाद संसदेतील चर्चेतही उठणार आहेत. (Pandit Jawaharlal Nehru)
दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालयातर्फे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रावर वाद होण्याची शक्यता आहे. या पत्रात जवाहरलाल नेहरु यांच्या पत्रांचा उल्लेख आहे. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी ही 51 बॉक्स मधील पत्रे आपल्या ताब्यात ठेवल्याचे या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे सदस्य रिझवान कादरी या मुद्द्यावर बराच काळ आवाज उठवत आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तीन मूर्ती भवनात राहत होते. त्यांच्या मृत्यूनंतर, तीन मूर्ती भवनचे रूपांतर नेहरू स्मारकात करण्यात आले. त्यालाच आता पंतप्रधान संग्रहालय म्हणून ओळखण्यात येते. पंडित नेहरूंची ही पत्रे अतिशय ऐतिहासिक मानली जातात. ही पत्रे जवाहरलाल नेहरू स्मारकाकडे होती. त्यानंतर 1971 मध्ये नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाकडे ही पत्रे हस्तांतरीत करण्यात आली. याच पंतप्रधान संग्रहालयाचे सदस्य रिझवान कादरी यांनी राहुल गांधी यांना 10 डिसेंबर रोजी पाठवलेल्या पत्रामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे. या पत्रात कादरी यांनी जवाहरलाल नेहरु यांच्या पत्राचा उल्लेख केला आहे. रिझवान कादरी यांनी पत्रात लिहिल्या नुसार जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलेली पत्रे यूपीए सरकारच्या कार्यकाळात 2008 मध्ये सोनिया गांधी यांनी मागवून घेतली होती. मात्र ती पत्रे अद्यापही त्यांनी परत केली नाही. यासंदर्भात संग्रहालयातर्फे सप्टेंबर महिन्यात सोनिया गांधी यांनाही पत्र पाठवून पत्रांची आठवण करुन देण्यात आली होती. (Social News)
मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता कादरी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून सदर पत्रे परत करावीत अशी मागणी केली आहे. सोनिया गांधी यांनी ही पत्रे ताब्यात घेतल्याला आता 16 वर्ष झाली आहेत. एवढ्या वर्षानंतर त्यांना पत्रांची मुळ प्रत परत करायची नसेल तर या पत्रांची फोटो कॉपी किंवा डिजिटल कॉपी परत करावी अशी मागणीही या पत्रातून केली आहे. जवाहरलाल नेहरु यांची ही पत्रे देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या ऐतिहासिक पत्रांना पंतप्रधान संग्रहालयात ठेवणे गरजेचे असल्याचेही पत्रात सांगण्यात आले आहे. या मागवलेल्या कागदपत्रांमध्ये पंडित नेहरू आणि एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजय लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत आदी महान व्यक्तींमधील संभाषण आणि पत्रव्यवहाराचा समावेश आहे. (Pandit Jawaharlal Nehru)
========
हे देखील वाचा : लवकर परत या ! अन्यथा
======
सध्या पंतप्रधान संग्रहालयात अनेक दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आहे. यात अनेक नेत्यांनी लिहिलेली पत्रही आहेत. यात पंडित नेहरुंनी लिहिलेल्या पत्राचा समावेश आहे. यातीलच 51 बॉक्स पत्रे सोनिया गांधी यांनी मागवली होती. कादरी यांच्या मते, ‘पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील पंडित मोतीलाल नेहरू यांचे लेखन साहित्य संग्रहालयात जतन केले होते. राष्ट्र उभारणीत त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी सखोल वैज्ञानिक अभ्यास आवश्यक आहे, ज्यासाठी या संपूर्ण नोंदी उपलब्ध असणे आवश्यक आहे.’ त्यामुळेच या पत्रांची आवश्यकता असल्याचे कादरी यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालयात देशातील सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली आहे. 10000 चौरस मीटर जागेवर बांधण्यात आलेल्या या संग्रहालयात माजी पंतप्रधानांशी संबंधित प्रदर्शने आहेत. या संग्रहालयात एकूण 43 दालनं आहेत. पंतप्रधान संग्रहालयात पंतप्रधान यांचे दुर्मिळ फोटो, त्यांची भाषणं, मूळ लेखन यासारख्या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत. अनेक विद्यार्थी या साहित्याचा अभ्यासासाठी वापर करतात. (Social News)
सई बने