स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक हृदयाचा थरकाप उडवणारं पण म्हणजे “ऑपरेशन ब्लू स्टार.” ३१ मे १९८४ ची संध्याकाळ. मेजर जनरल के पि एस ब्रार आपल्या मेरठ मधील कार्यालयात आवराआवरी करत होते. त्यांची एक जून पासून एक महिन्याची रजा मंजूर झाली होती आणि ते एक तारखेलाच सपत्नीक फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे जाण्यासाठी दिल्लीहून प्रयाण करणार होते.
संध्याकाळी घरी जायला निघणार एवढ्यात त्यांना निरोप मिळाला की, दुसऱ्या दिवशी सकाळी चंदीगडला एका महत्वाच्या बैठकीला हजर राहायचे आहे. त्याच संध्याकाळी श्री ब्रार मोटारीने मेरठहून दिल्लीला जायला निघाले. त्यांनी विचार केला की, सकाळी विमानाने चंदीगडला जाऊन बैठक आटोपून संध्याकाळी दिल्लीला परत यावे व रात्रीच्या विमानाने ठरल्याप्रमाणे मनिलाला रवाना व्हावे, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
सकाळी श्री ब्रार चंदीगडला बैठकीच्या ठिकाणी पोहोचले आणि तेथील वातावरण बघून त्यांनी खूणगाठ बांधली की, कोणत्यातरी अतिशय गंभीर विषयावर चर्चा होणार आहे. या बैठकीतच लेफ्टनंट जनरल सुंदरजी यांनी ब्रार याना कल्पना दिली की, अमृतसरच्या सुवर्णमंदिर परिसरात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय झाला असून त्या कारवाईचे नेतृत्व श्री ब्रार याना करायचे आहे. ही बातमी अतिशय गुप्त ठेवण्याची सूचनाही दिली गेली. सुंदरजी यांनी ब्रार याना आदेश दिले की, त्यांनी कारवाईची योजना तीन दिवसात सादर करावी.
यानंतर सर्व घटना एवढ्या वेगाने घडल्या की, त्या समजून घेण्यासाठी श्री ब्रार यांचे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हे पुस्तक मुळातून वाचणे गरजेचे आहे. सदर लेखाद्वारे या ऐतिहासिक कारवाईचा अल्प मतीने धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न केला आहे.
असे काय घडले होते की ज्यामुळे सुवर्ण मंदिर परिसरात लष्कर घुसवण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला?
१९७८ पासूनच पंजाबमध्ये जर्नेलसिंह भिंद्रनवाले नावाचे वादळ घोंगावू लागले होते. मोगा जिल्ह्यातील रोडे गावचा हा तरुण ग्रंथी प्रभावी वक्ता होता ज्यामुळे विविध वयोगटातील,सामाजिक स्तरातील, विविध जातींमधील शीख युवक त्याच्याकडे आकर्षिले गेले होते. पंजाबमधील अकाली दल व काँग्रेस यांच्यातील राजकीय साठमारीत काँग्रेसने भिंद्रानवालेला अकालींविरुद्ध प्यादे म्हणून वापरायला सुरुवात केली.
या राजकीय पाठबळामुळे भिंद्रनवालेंच्या महत्वकांक्षेला पंख फुटले व तो स्वतंत्र खलिस्तानची स्वप्ने पाहू लागला. दरम्यान शीख धर्मातीलच एक असलेल्या निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा गुरुबाचंसिंग यांची हत्या झाली. या हत्येत भिंद्रानवालेंचा हात असल्याचे अनेक पुरावे मिळूनही त्याला अटक करण्यास खूप वेळ घेतला गेला.
शेवटी अटक झाल्यावर कायद्यानुसार खटला चालवण्याऐवजी त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री झैलसिंग यांनी संसदेत त्याच्या सुटकेची घोषणा केली. या पाठिंब्यामुळे भिंद्रनवाले अधिकाधिक दहशत माजवू लागला. पंजाबात हिंदू -शीख अशी धार्मिक तेढ निर्माण झाली. असंख्य हिंदू व सामान्य शिखांच्या हत्या होऊ लागल्या.
सरकारी नोकरीत दहशतवाद्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला. यातच शुहबेग सिंग नावाचा निवृत्त मेजर जनरल भिंद्रानवालेला येऊन मिळाला. पाकिस्तानने या परिस्थितीचा पूर्ण फायदा उठवून खलिस्तानवाद्यांना शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला. अमृतसरचे सुवर्णमंदिर म्हणजे अतिरेक्यांचा बालेकिल्ला बनला. सुवर्ण मंदिरात शस्त्रास्त्रांचे कोठार बनले.
पंजाबचे पोलीस प्रमुख श्री अटवाल यांची सुवर्ण मंदिरात हत्या करण्यात आली. अकाली दलाचे नेते भिंद्रनवालेच्या दहशतीमुळे बोटचेपी भूमिका घेऊ लागले.पंजाबचे पोलीस दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याची इच्छाशक्ती घालवून बसले होते, इतके त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अमृतसरचे पोलीस अधीक्षकच दहशतवाद्यांचे सहानुभूतीदार होते. सुवर्ण मंदिरातून केव्हाही स्वतंत्र खलिस्तानची घोषणा होऊ शकेल, असे गुप्तचर खात्याचे अहवाल सांगत होते. या सर्व अराजकतेच्या पार्श्वभूमीवर लष्कराला सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांना हुसकावून लावण्याचे निर्देश देण्यात आले होते.
एकीकडे लष्कराचे नियोजन चालू असताना इंदिरा गांधी काहीतरी तोडगा निघण्याच्या आशेने अकाली नेत्यांशी शेवटपर्यंत वाटाघाटी करत होत्या, पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी ४ जूनच्या रात्री त्यांनी देशाला उद्देशून भाषण करताना सुवर्ण मंदिरावरील कठोर कारवाईचे संकेत दिले, मात्र ती लष्करी कारवाई असेल याचा थांगपत्ता त्यांनी लागू दिला नाही.
राजकीय नेतृत्वाकडून आदेश मिळाल्यावर लष्कराने ५ जून रात्री दहा वाजता कारवाई सुरु करण्याचे ठरवले. कारवाई सुरु करण्यापूर्वी सुवर्ण मंदिर परिसरातील वीज व दूरध्वनी यंत्रणा पूर्णपणे बंद करण्यात आल्या. सर्व देशी/विदेशी पत्रकारांना अमृतसर सोडण्याचे आदेश देण्यात आले. ब्रह्मा चेलानी हा पत्रकार मात्र सुवर्ण मंदिराबाहेरील एका घरात लपून बसला. याच ब्रम्हाने पुढे खोट्या नाट्या बातम्या पसरवल्या असा आरोप श्री ब्रार यांनी केला आहे.
अमृतसरच्या सीमा सुद्धा लष्कराने बंद केल्या. सैनिकांना सक्त सूचना देण्यात आल्या की, कुठल्याही स्थितीत गुरु ग्रंथसाहिब जेथे ठेवला आहे त्या हरमंदिर साहिब इमारतीवर गोळ्या झाडायच्या नाहीत, तसेच कमीत कमी बळाचा वापर करायचा. लष्कराला अतिरेक्यांच्या तयारीविषयी जुजबी माहिती होती. त्यानुसार सर्व कारवाई दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी समाप्त करण्याचे नियोजन ठरले होते. पण जसे लष्कर सुवर्ण मंदिराचा दरवाजा तोडून आत घुसले तसे त्यांच्या अपेक्षेपेक्षा तुफान प्रतिकाराचा सामना त्यांना करावा लागला.
लष्करावर चारी बाजूनी गोळ्यांचा व हातगोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. लष्कराने मंदिराच्या आवारातील इमारती ताब्यात घेणे सुरु केले. एकेक इमारत ताब्यात घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, या इमारतीतील खोल्या भुयारे खणून एकमेकांशी जोडण्यात आल्या होत्या. तसेच या इमारतींच्या भिंतींना भोकं पाडून त्यात बंदुका रोखल्या होत्या. अतिरेकी अंधारात अचानक भुयारातून प्रकट होत व सैनिकांवर गोळीबार करून परत जात.
=====
हे देखील वाचा : …. आणि अनेक काँग्रेस नेत्यांच्या पराभवाने जनतेने पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिन साजरा केला
=====
अकाल तख्तच्या इमारतीच्या गच्चीवर लष्करी मोर्चे बांधून मशीनगन ठेवल्या होत्या. हर मंदिर साहिब मधून सुद्धा सैन्यावर आग ओकली जात होती. सैनिक दोन्ही बाजूनी गोळीबारात मधेच सापडत होते. एक चिलखती वाहन मंदिर परिसरात आल्यावर त्यावर दहशतवाद्यांकडून रणगाडा भेंदी क्षेपणास्त्र डागण्यात आले. कारवाई सूर्योदयापर्यंत संपण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. अशा वेळी रणगाड्याचा वापर करून अकाल तख्तवर गोळे डागण्याची परवानगी दिल्लीहून मागण्यात आली.
परवानगी मिळाल्यावर अकाल तख्तवर गोळे डागून मोर्चे उध्वस्त करण्यात आले. सैन्याची ही कारवाई अतिरेक्यांना अनपेक्षित होती. त्यामुळे त्यांच्यात हलकल्लोळ माजला. कित्येक अतिरेकी बाहेर आले व पवित्र सरोवरात उडी मारून पोहत हरमंदिर साहिब इमारतीत जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यातले बरेचसे जण सैन्याने मारले, तर काही जणांना पकडण्यात आले. पकडलेल्यानी बातमी दिली की, भिंद्रनवाले ठार झाला.
सैनिक जेव्हा तख्ताच्या इमारतीत गेले तेव्हा त्यांना भिंद्रानवालेंचा मृतदेह दिसला. तळघरात शुहबेग सिंहाचा मृतदेह होता. मरताना सुद्धा त्याचा हात बंदुकीच्या ट्रिगरवर होता. भिंद्रनवालेंच्या मृत्यूनंतर सेनेनं उरलेल्या अतिरेक्यांना पकडून सुवर्णमंदिर त्यांच्या तावडीतून मुक्त केले. लगेच मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.
कारवाई संपल्यावर दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती झैलसिंग दर्शनासाठी आले. त्यांना आसपास मरून पडलेल्या सैनिकांपेक्षा हरमंदिर साहिबवर दिसलेल्या गोळ्यांच्या खुणांची अधिक काळजी होती. तेथील ग्रंथी त्यांना सांगत होता की, त्या खुणा लष्कराने केलेल्या गोळीबाराच्या होत्या, हे सरासर खोटे होते. झैलसिंग मंदिराच्या आवारात असतानाच मंदिराबाहेरच्या इमारतीवर उभ्या असलेल्या एका अतिरेक्याने राष्ट्रपतींवर गोळी झाडली पण ती झेलली कर्नल चौधरी यांनी!
=====
हे देखील वाचा : …आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले
=====
जी मोहीम १० तासात संपणे अपेक्षित होते त्याला तीन दिवस लागले. या कारवाईनंतर लष्करात थोडे बंड झाले. पुण्याहून काही शीख सैनिक पंजाबकडे निघाले, पण त्यांना वाटेत मुंब्र्याला अडवले गेले. या मोहिमेत लष्कराचे ४ अधिकारी व ८३ जवान बळी पडले, तर शेकडो सैनिक जखमी झाले. ४०० च्या आसपास अतिरेकी मारले गेले. अशा तर्हेने मनिलाला जाण्यासाठी घर सोडलेले ब्रार नंतर आठवड्याने परतले ते सुवर्ण मंदिरातील मोहीम संपवूनच!
ऑपरेशन ब्लू स्टार या कारवाईत आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना म्हणावेसे वाटते ‘अनाम वीरा कुठे जाहला तुझा जीवनान्त’!
– रघुनंदन भागवत
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.