१९८५ च्या आसपास सुप्रसिद्ध चित्रपट/नाट्य दिग्दर्शक आणि लेखिका सई परांजपे यांचे ‘सक्खे शेजारी’ हे नाटक मराठी रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यात शेजारधर्म आणि शेजाऱ्यातील परस्परसंबंध यांचे हलक्याफुलक्या प्रसंगातून फार यथार्थ वर्णन केले होते. आज या नाटकाची आठवण होण्याचे कारण म्हणजे टी२० विश्वचषक (ICC Men’s T20 World Cup) स्पर्धेत झालेला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या सख्खे शेजाऱ्यातील अंतिम सामना.
ऑस्ट्रेलियाने (Australian Men’s Cricket Team) नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले तेथेच त्यांनी निम्मी बाजी मारली कारण या वेळच्या स्पर्धेत एक अफगाणिस्तानचा अपवाद वगळता सर्वच संघानी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि धावांचा पाठलाग करून सामने जिंकले. संथ सुरवातीनंतर न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यम्सनने जी अप्रतिम व डोळ्याचे पारणे फेडणारी फलंदाजी केली ती नवोदितांपुढे आदर्श वस्तुपाठ ठरावी.

विल्यम्सनने एकही फटका आडव्या बॅटने मारला नाही. सर्व षटकार व चौकार फक्त अचूक टाइमिंगच्या जोरावर खेचले. नाहीतर आपण बघतो की बरेच फलंदाज दात ओठ खाऊन प्रचंड ताकदीच्या जोरावर वेडेवाकडे फटके मारत बसतात आणि बाद होतात. त्याने धावफलक असा हलता ठेवला की न्यूझीलंड (New Zealand national cricket team) १७२ धावांवर केव्हा पोहोचले ते कळले सुद्धा नाही. मार्टिन गुप्टिल जर त्याच्या नेहमीच्या पद्धतीने खेळला असता तर न्यूझीलंडने २०० धावांपर्यंत सुद्धा मजल मारली असती.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांमध्ये मला जोश हेझलवूडचा (Josh Hazlewood) विशेष उल्लेख करावासा वाटतो. पाकिस्तानविरुद्ध भरपूर मार खाल्यानंतर त्याने गोलंदाजीत जी सुधारणा केली ती आदर्शवत होती. त्याने ४ षटकात केवळ १६ धावा देऊन ३ बळी मिळवले हे कौतुकास्पदच. पण त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती अभ्यासनीय होती. त्याने आपला टप्पा सातत्याने ८ मीटर (फलंदाजापासून) अंतरावर ठेवला आणि चेंडूचा रोख यष्ट्यांवर ठेवला त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांना आक्रमक फटके मारता आले नाहीत.
त्याने विल्यम्सनचा झेल सोडला नसता तर तोच सामनावीर ठरला असता. कमिन्स व ऍडम झाम्पा यांनी पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. मात्र स्टार्कने ४ षटकात ६० धावा उधळून जणू आपल्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्याने सतत यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तर केलाच पण त्याचे चेंडू फलंदाजांच्या मारण्याच्या पट्ट्यातच पडत होते.

ऑस्ट्रेलियन डावात कर्णधार फिंच लवकर बाद झाल्यावर वॉर्नर व मार्श यांनी न्यूझीलंडचे गोलंदाज डोक्यावर बसणार नाहीत याची काळजी घेताना फटकेबाजी चालूच ठेवली. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना बचावात्मक गोलंदाजी करावी लागली. या स्पर्धेत प्रथमच न्यूझीलंडचे सर्वच गोलंदाज प्रभावहीन ठरले. सामना जरी १९ व्या षटकापर्यंत लांबला असला तरी त्यात उपांत्य सामन्यांसारखा थरार नव्हता. ऑस्ट्रेलियाने पंधराव्या षटकाच्या आतच सामना खिशात टाकला होता.
हा झाला मैदानावरचा खेळ. पण हा सामना इतका सभ्यतेने व खिलाडूपणे खेळला गेला त्याचे सर्व श्रेय न्यूझीलंडच्या खेळाडूंना जाते. विश्वचषकाचा अंतिम सामना असूनही बाचाबाची नाही की एकमेकांविषयी असलेल्या खुन्नशीचे प्रदर्शन नाही. विल्यम्सनचा मैदानातील वावर सुद्धा अत्यंत परिपक्व व संयमित होता.
सामन्याचा निकाल स्पष्ट झाल्यावर सुद्धा त्याने खांदे टाकले नाहीत की गोलंदाजांवर राग काढला नाही. ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्धी असताना इतक्या निकोप वातावरणात सामना खेळला जाऊ शकतो ही गोष्टच विरळी कारण ऑस्ट्रेलियाची ख्याती आहे ती अखिलाडू, असंस्कृत वृत्ती आणि उद्दाम देहबोलीची.

न्यूझीलंडने जणू उत्कृष्ट शेजारधर्माचे पालन केले आणि ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक आणि वर्चस्ववादी वृत्तीला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. ‘तुम्ही आम्ही सकल बंधू बंधू अवघे धरू सुपंथ’ हीच शिकवण या सामन्यातून न्यूझीलंडने दिली. यामुळेच मला ‘सख्खे शेजारी’ या नाटकाच्या ‘शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी’ या शीर्षक गीताची आठवण झाली…
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.