Home » महाराष्ट्रातील ‘वाईन’ प्रकरण: आमी (बि) घडलो तुमी (बि) घडाना

महाराष्ट्रातील ‘वाईन’ प्रकरण: आमी (बि) घडलो तुमी (बि) घडाना

by Team Gajawaja
0 comment
Share

महाराष्ट्रातील ‘वाईन’ प्रकरण वरचेवर ‘कडवट’ होताना दिसत आहे. राज्यातील सुपर मार्केट दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सर्व बाजूने गदारोळ उठलेला असताना त्यामध्ये आता वारकरी संप्रदायही सामील झालेला दिसतो. वारकरी संप्रदायाचे एक नेते बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या धोरणावर टीका करताना अतिशय ‘बेताल’ वक्तव्य केले. 

वाईन विक्रीच्या धोरणावरून सत्तारूढ आघाडी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये ‘कोण किती पितो, कोठे कोठे घेतो’ अशी परस्परांविरुद्ध आव्हानात्मक भाषा सुरू झाल्यावर बंडातात्यांचाही ‘तोल’ सुटला असेल. त्यामुळे त्यांनी थेट सुप्रियाताई आणि पंकजाताईं यांचेच ‘दारूकाम’ काढले. एवढेच नव्हे, तर ते सिद्ध करण्याचे ‘आव्हान’ही स्वीकारले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘वाईन’ विक्री वरून गहजब झाला. 

वास्तविक बंडातात्या हे स्वतःला वारकरी संप्रदायाचे म्हणवितात. खरं मात्र यासंदर्भात बोलताना त्यांचीही जीभ घसरली आणि ते नको ते ‘बरळले’. असे बोलताना आपण ‘वारकरी’ आहोत, हेही ते विसरले. कोणाच्या विशेषतः महिलांबाबत बोलताना त्यांच्या खासगी जीवनातील काही गोष्टी अशा चव्हाट्यावर आणायच्या नसतात याचेही त्यांना भान राहिले नाही. त्यामुळे बंडातात्यांच्या त्या वक्तव्याचे लगेच तीव्र पडसाद उमटले. त्यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी काय ‘घेतले’ होते याचा शोध घेण्याची गरज आहे (नेमके कोण दारू पिऊन बोलले?) अशा स्वरूपाची प्रतिक्रिया लगेच सत्तारूढ पक्षाची आली. बंडातात्यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून आपण नावाप्रमाणेच ‘बंडखोर’ असल्याचे सिद्ध केले आहे.   

 

बंडातात्या कराडकर यांचे सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

बंडातात्यांनी वाईनच्या प्रश्नावर टीका करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही सोडले नाही. ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरेच चांगले आहेत, परंतु ते अजितदादामुळे बिघडले”, असे सांगताना त्यांनी “ढवळ्या शेजारी पवळा बांधला …..” या म्हणीचा पुनरुच्चार केला. याचा अर्थ बंडातात्यांचे पवार कुटुंबियांवर ‘विशेष प्रेम’ दिसते. त्यामुळे बंडातात्यांच्या ‘त्या’ वक्तव्याची राष्ट्रवादीने लगेच गंभीर दखल घेतली. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यापासून ते त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यापर्यंत मागणी करण्यात आली. 

महिला आयोगामार्फतही त्यांच्याविरूद्ध मोहीम उघडण्यात आली. त्यामुळे सातारा पोलिसांनी बंडातात्यांना बोलावून घेऊन त्यांची चौकशी केली आणि त्यांना चांगलीच ‘समज’ देऊन सोडले. त्यानंतर मात्र बारा तासाच्या आतच बंडातात्यांना ‘उपरती’ झाली असावी. त्यांनी लगेच आपल्या वक्तव्याबद्दल  सर्व संबंधितांची माफी मागितली. त्यामुळे बंडातात्यांची अटक तरी टळली नाही, तर त्यांच्या अटकेवरून सरकार विरोधकांना पुन्हा हातात कोलीत मिळाले असते आणि त्यावरून पुन्हा कोणतेतरी ‘महाभारत’ घडले असते. 

बंडातात्यांनी माफी मागितली असली तरी त्याला खूप उशीर झाला होता. त्यामुळे  ”बुंद जो गयी वो हौदसे नही आती …. ” असेच त्यांच्याबाबतीत म्हणावे लागेल. बंडातात्या हे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, परंतु त्यांनी कीर्तनाच्या नावाखाली हा जो ‘तमाशा’ केला तो नक्कीच निषेधार्ह तर आहेच, मात्र त्यांच्या हेतूंबद्दलही शंका निर्माण करणारा आहे. त्यांच्या वक्तव्यामागचा ‘बोलविता धनी’ वेगळाच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील ‘वाईन प्रकरण’ आता कोणत्या स्तराला जाणार आहे हे सांगणे अवघड होत चालले आहे. वाईन विक्री प्रकरणावरून महाविकास आघाडीचे नेते इतर भाजपशासित राज्यांची उदाहरणे देत आहेत. त्या राज्यात कशी सर्रास दारू विक्री होत आहे, हे सांगताना नबाब मलिक यांनी ‘सर्वात जास्त दारू भाजप नेतेच पितात’ असेही विधान केले. वाईन विक्रीचा फक्त निर्णय झाला आहे. त्याची अजून अंमलबजावणी होण्यास अवधी असतानाच अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करून सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांचे वस्त्रहरण करीत आहेत. त्यामुळे या निर्णयाची जर अम्मलबजावणी झाली, तर मग काय होईल? याची कल्पनाच न केलेली बरी.  

थोडक्यात सांगायचे तर, वाईन विक्री प्रकरणावरून राज्यात “आमी (बि)’ घडलो तुमी (बि) घडाना” असे ‘तमाशा’प्रधान वगनाट्य चालू झाले आहे. दुर्देवाने त्यामध्ये स्वतःला कीर्तनकार म्हणवले जाणारे बंडातात्या कराडकरही सामील झाले. बंडातात्यांना ही ‘नसती’ उठाठेव करायला कोणी सांगितले होते, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार आहे.

— श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.