भारतात किंवा हिंदू संस्कृतीमध्ये पाहिले तर शिक्षकांना मोठा दर्जा दिला गेला आहे. आईच्या खालोखाल दुसरा नंबर शिक्षकांचा, गुरूंचा असतो. शिक्षक नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःजवळील ज्ञान देतात आणि त्यांना या जगात टिकण्यासाठी स्वावलंबी, निर्भीड होण्याचे संस्कार देतात. प्रत्येक शिक्षण त्याच्या विद्यार्थ्यांवर कळत – नकळत अनेक संस्कार करत असतो. ज्ञान देण्यासोबतच इतरही अनेक प्रवाहापलिकडील गोष्टी शिक्षण मुलांना शिकवताना दिसतात.
विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत त्यांना आयुष्यच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करायचे काम शिक्षक करतात. म्हणूनच अशा या शिक्षकांना, गुरूंना देवाचा दर्जा दिला आहे. आपण नेहमीच
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` म्हणत शिक्षकांचा गौरव करतो. आपल्या सगळ्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या याच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान समजून घेण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.
आज ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शिक्षकांना मोठे आणि मानाचे स्थान आहे. त्यांच्या प्रति आपल्या मनात असलेला आदर, प्रेम, सन्मान आजच्या दिवशी व्यक्त केला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का की शिक्षक दिनाची सुरुवात नक्की कशी झाली? कधी झाली? चला जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज ५ सप्टेंबर रोजी अर्थात आज जन्मदिवस. हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. शिक्षण क्षेत्रात मोठे काम करत त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस म्हणून शिक्षक दिन हा साजरा केला जातो. त्यांचा जन्म एका गरीब तामीळ ब्राह्मण कुटुंबात ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते सुरुवातीपासूनच खूपच हुशार विद्यार्थी होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण विविध शिष्यवृत्ती मिळवत पूर्ण केले. राधाकृष्णन यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घेऊन पूर्ण केले. पुढे त्यांनी १९१८ साली ‘फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित केले. शालेय जीवनात राधाकृष्णन खूपच हुशार विद्यार्थी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून देखील बरेच काम केले.
पुढे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे १९३१ ते १९३६ पर्यंत ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३१ ते १९३९ या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व देखील केले. भारत सरकारने रशियातील भारताचा राजदूत म्हणून १९४९ ते १९५२ या काळात त्यांची नियुक्ती केली. कार्यकाळ संपल्यानंतर ते १९५२ मध्ये भारतात परत आले. त्यानंतर १९५२ ते १९६२ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये ते भारताचे उपराष्ट्रपती देखील होते. त्यानंतर १४ मे १९६२ रोजी राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले. त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल करण्यात आला होता.
======
हे देखील वाचा : हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा
======
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून कसा सुरु झाला, यामागची गोष्ट देखील रंजक आहे. जेव्हा डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेले होते. या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस एक खास दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशी इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली. डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहता त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याची विनंती केली. तेव्हापासून दरवर्षी भारतात ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो.
भारतासोबतच जगातील इतर अनेक देशांमध्ये विविध दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला आहे. रशियामध्ये १९९४ सालापासून ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. चीनमध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो.