पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौ-यावर जातात, तेव्हा भारताच्या विविध प्रांतामधील वैशिष्टपूर्ण वस्तू तेथील मान्यवरांसाठी भेट म्हणून घेऊन जातात. पंतप्रधान मोदी यांना आदर्श मानणारे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या भेटवस्तूंच्या निवडीमध्येही पंतप्रधानांचे अनुकरण करत आहेत. यावेळी योगी यांनी या भेटींच्या निवडीमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच काशी, बनारस येथे दौरा झाला. यावेळी झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री योगी यांनी लाकडाच्या साहय्यानं तयार केलेले कमळ फूल पंतप्रधान मोदी यांच्या हातात दिले. या कमळ फुलाला असलेल्या एका बटनाच्या साहाय्यानं त्याचा आकार मोठा कऱण्यात आला. कमळाचे फुलणारे हे लाकडी फूल पाहून पंतप्रधान मोदी आश्चर्यचकीत झाले होते, आणि त्यांनी मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले. त्यानंतर या लाकडी फुलाची चर्चा सुरु झाली. (Wood Carving)
हे लाकडी फूल म्हणजे, काशी येथील परंपरागत काष्टशिल्पाचा, म्हणजे, लाकडीकामाचा अप्रतिम नमुना आहे. काशी ही फक्त भारताची धार्मिक राजधानी नाही, तर काशी नगरी ही भारतीय कलेचीही राजधानी आहे. या नगरीमध्ये गेली अनेक वर्ष लाकडाच्या सुबक वस्तू बनवण्यात येत आहेत. काशीची ही काष्टकला आता परदेशातही नावजली जात आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनीही अनेक परदेश दौ-यामध्ये काशी येथे तयार झालेल्या कलाकुसरीच्या वस्तू भेट स्वरुपात नेल्या आहेत. उत्तरप्रदेशच्या काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा विशेष ठरला. 39 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले. या दौ-यात पंतप्रधान मोदी यांना मुख्यमंत्री योगी यांनी दिलेले काष्टशिल्पही चर्चेत राहिले आहे. (News Update)
लाकडापासून तयार झालेले हे कमळाचे फूल काशीच्या काष्टशिल्पाचा उत्कृष्ठ नमुना आहे. काशी, बनारस ही बाबा विश्वनाथ यांची नगरी आहे. याच काशी नगरीच्या गल्ली बोळांमध्ये लाकडाची खेळणी, सजावटीच्या वस्तू आणि धार्मिक कलाकृती मोठ्या प्रमाणात तयार होतात. काशीच्या या काष्टकलेला हजारो वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. अगदी त्याचा भगवान राम यांच्यासोबत संबंध जोडला जातो. लहानपणी भगवान राम आणि त्यांची भावंडे लाकडी खेळण्यासोबत खेळत असल्याचा उल्लेख महाकाव्यात आहे. ही लाकडी खेळणी काशी येथेच तयार झाल्याचे सांगण्यात येते. काही वर्षापर्यंत लाकडी खेळणी आणि सिंदूरचे बॉक्स यांच्यापर्यंत ही काष्टकला मर्यादित होती. मात्र अलिकडे या लाकडी खेळण्यांमध्ये वैविधता आली आहे. शिवाय सजावटीच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागल्या. या सर्वांवर कलाकुसर होऊ लागली. लाल, हिरवा, काळा, निळा रंगाचा वापर करत या लाकडाच्या खेळण्यांवर आणि वस्तूंवर कलाकुसर करण्यात महिला कलाकर पुढे आहेत. त्यांना यामुळे रोजगारही उपलब्ध झाला आहे. (Wood Carving)
या कलेची व्याप्ती एवढी वाढली आहे की, काशीची काष्टकला सातासमुद्रापार गेली. लाकडाच्या या वस्तू तयार करण्यासठी प्रामुख्यानं गौरेया नावाच्या जंगली लाकडाचा वापर करण्यात येतो. हे लाकूड बिहार आणि उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून आणले जाते. हे लाकूड वजनानं हलकं असते, पण हे लाकूड खूप टिकावू असल्यामुळे याचा काष्टशिल्प करतांना जास्त वापर होतो. मुळ काष्टकला ही हातानं होत असे. मात्र आता या वस्तू मशिनच्या सहाय्यानं तयार केल्या जातात. या लाकडी वस्तूंची मागणी वाढल्यामुळेही मशिनचा वापर करण्यात येत आहे. मशिनचा वापर सुरु झाल्यामुळे आता काशीमध्ये सर्वप्रकारची लाकडी फळे तयार होतात. तसेच देव-देवतांच्या मुर्ती, कलाकुसरीच्या वस्तू आणि गाडीपासून घोड्यापर्यंत लहानमुलांची खेळणी आता येथे तयार होऊ लागली आहेत. (News Update)
=========
हे देखील वाचा : Yamuna : चला यमुना पर्यटनाला !
Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !
==========
याशिवाय या काष्टशिल्पामध्ये अत्यंत नाजूक सजावटीच्या वस्तूही तयार होतात. पंतप्रधान मोदी यांना दिलेले कमळाचे फूलही त्यातलेच आहे. या कमळाच्या फुलाला 32 पाकळ्या असून त्या उघडण्यासाठी फुलामध्ये असलेले बटन दाबावे लागते. असाच काशीच्या काष्टशिल्पामधील दिवाही प्रसिद्ध आहे. 1988 मध्ये राम खेलवन सिंह यांनी हा दिवा तयार केला असून त्यासाठी त्यांचा राज्यसरकारनं सत्कारही केला आहे. असेच अनेक कलाकार काशीमध्ये असून या काष्टशिल्पाला मागणी वाढल्यामुळे या सर्वांना सोन्याचे दिवस आले आहेत. (Wood Carving)
सई बने