प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज नगरी सज्ज झाली आहे. अवघ्या प्रयागराजमध्ये पावलापावलावर मंदिरे आहेत. या सर्वच मंदिरांची नव्यानं सजावट करण्यात आली आहे आणि त्यांचा परिसर भाविकांसाठी अधिक आरामदायक होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वात प्रयागराजमधील नागवासुकी मंदिर भाविकांसाठी विशेष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो प्रयागराजचा दौरा करुन महाकुंभमेळ्यासाठी विशेष पुजा केली, त्यातही या नागवासुकी मंदिराचा उल्लेख त्यांनी केला होता. प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यासाठी 45 करोड भाविक येण्याची शक्यता आहे. हे सर्व भाविक या नागवासुकी मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. कारण प्रयागराजचे तिर्थ या नागवासुकी मंदिरात गेल्याशिवाय पूर्ण समजण्यात येत नाही. अत्यंत जागृत असलेल्या या मंदिरात नागराज वासुकी यांनी समुद्रमंथनानंतर विसावा घेतला आहे. या मंदिराला पाडण्यासाठी औरंगजेबानं आपले सैनिक पाठवले होते. पण या औरंगजेबाने जेव्हा या मंदिरावर भाला फेकला तेव्हा वासुकी नागराजानं चांगलाच धडा शिकवल्याची कथा या भागात सांगितली जाते. औरंगजेबाचा नक्षा उतरवणा-या नागवासुकी मंदिराला अधिक भव्य स्वरुप देण्यात आले आहे. सध्या प्रयागराजमध्ये सर्वाधिक भाविक जात असलेले मंदिर म्हणून याच नागवासुकी मंदिराची नोंद झाली आहे. (Nagavasuki Temple)
महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजमधील सर्वच तिर्थस्थळे लाखो भाविकांचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. या मंदिरांमध्ये प्रयागराजमधील नागराजाचे अनोखे नागवासुकी मंदिर प्रमुख आहे. प्रयागराज संगम नगरीची यात्रा या मंदिरातील नागराजाच्या दर्शनाशिवाय पूर्ण मानली जात नाही. समुद्रमंथनानंतर जखमी झालेले नागराज या संगमस्थानावर विश्राम करीत आहेत. त्यांच्या या मंदिराची अनेक वैशिष्ट आहेत. समुद्रमंथनकाळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येणारे नागवासुकी मंदिर दारागंजच्या उत्तरेला आहे. पौराणिक कथांमध्ये या नागराजाच्या मंदिराची महती सांगण्यात आली आहे. समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी नागराज वासुकी यांना सुमेरू पर्वताभोवती गुंडाळले आणि त्यांचा दोरी म्हणून वापर केला होता. या सर्वात देव आणि दानव यांनी अमृतप्राप्तीसाठी नागराजाला दोन्हीकडून खेचले होते. त्यामुळे नागराज वासुकी यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्या. त्यातून खूप रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा त्यांची ही अवस्था पाहून भगवान विष्णू यांनी त्यांना प्रयागराजमधील संगमस्थळावर जाऊन विसावा घेण्यास सांगितले. तेव्हापासून नागराज वासुकी या संगमस्थळावर आले. (Social News)
पवित्र संगमस्थळातील पाण्यानं त्यांच्या जखमा ब-या झाल्या. नागराज वासुकी बरे झाले आणि याच स्थानावर कायम राहिले आणि हे स्थळ नागराज वासुकीचे स्थान म्हणून प्रसिद्ध झाले. या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरात येऊन नागराजाचे दर्शन घेतल्यास कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळते, अशीही भाविकांची भावना आहे. गंगा नदिच्या काठावर असलेल्या या मंदिरात नागराज वासुकीची पुजा केल्यानं भगवान शंकरही प्रसन्न होतात, असे भाविक सांगतात. नागराज वासुकी यांचे स्थान भगवान शंकराच्या गळ्यात आहे. त्यामुळे या मंदिरात श्रावण महिन्यात अधिक संख्येने भाविक येतात. याच मंदिरस्थळी समुद्रमंथनानंतर भगवान ब्रह्माजींनी शंकराच्या स्थापनेसाठी यज्ञ केला. भगवान वासुकीही या यज्ञाला उपस्थित होते. त्यावेळी या स्थानी भगवान विष्णुही आले. त्यांनी नागराज वासुकी यांना याच स्थळी राहून भगवान शंकराची सेवा करण्याची आज्ञा दिल्याची कथा सांगितली जाते. त्यानंतर हे मंदिर ब्रह्माजीच्या मानसपुत्राने बांधल्याचाही उल्लेख आहे. त्यामुळेच येथील भगवान शंकराचे स्थानही जागृत मानले जाते. याच सर्व कारणासाठी नागराज वासुकी यांच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात. महाकुंभमेळ्यात आलेले भाविक अमृतस्नानानंतर या नागवासुकी मंदिरात दर्शनासाठी येतात, तेव्हा हे कुंभतीर्थ पूर्णयशस्वी झाले असे मानले जाते. (Nagavasuki Temple)
========
हे देखील वाचा : महाकुंभमेळ्यातील कडक सुरक्षा व्यवस्था
======
या नागवासुकी मंदिराबाबत आणखी एक कथा सांगितली जाते, त्या गंगा नदिचा उल्लेख आहे. देव नदी असलेली गंगा पृथ्वीवर अवतरली, तेव्हा भगवान शिवाच्या केसांतून खाली आल्यावरही माता गंगेचा वेग खूप असल्याने ती थेट पाताळात जात होती. तेव्हा नागवसुकीनी स्वतः भोगावती तीर्थ बांधले. तिथे माता गंगा विसावली. आजही नागवासुकी मंदिराच्या पश्चिमेला भोगवती तीर्थ आहे. या तिर्थाचे नुसते दर्शन घेतले तरी सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते. नागवासुकी मंदिर आणि औरंगजेबाचा किस्साही या भागात सांगितला जातो. औरंगजेबानं हिंदूंची अनेक पवित्र मंदिरे पाडली आणि त्यातील मुर्तींची नासधूस केली. त्याची नागवासुकी मंदिरावरही नजर होती. हे मंदिर पाडण्यासाठी त्यानं मंदिरावर भाला फेकलाही. मात्र तेथून दुधाची धार प्रकट झाली आणि हा चमत्कार पाहून औरंगजेब बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यानं पुन्हा या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न केला नाही. औरंगजेबाला पराभूत करणा-या राजाचे मंदिर म्हणूनही येथे नागवासुकी मंदिर ओळखले जाते. आता प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी या मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. (Social News)
सई बने