देवभूमी म्हणून गौरव होत असलेल्या उत्तराखंडमधील एक मंदिरात चातुर्मास सुरु होताच भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. हे मंदिर म्हणजे, उत्तराखंडच्या डेहराडून जिल्हातील लखामंडल मंदिर. भगवान शंकराच्या या मंदिराला पौराणिक वारसा आहे. या मंदिरात वर्षभर शिवभक्तांची गर्दी असते. मात्र चातुर्मासात ही गर्दी अधिक होते. यातच श्रावण महिन्यातील सर्वच दिवस या लखामंडल मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतो. या मंदिरात दर्शन घेतल्यास मोक्ष मिळतो, अशी भक्तांची भावना आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना हा देवांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात भगवान शंकाराची पूजा केली जाते. त्यात या लखामंडल मंदिरात भगवान शंकराचे आणि शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरुन शिवभक्त येतात.
उत्तराखंड राज्यातील डेहराडून जिल्ह्यात चकराता नगरपासून तासाभरच्या अंतरावर लखामंडल नावाचे गाव आहे. येथे शंकराचे पौराणिक मंदिर आहे. हे मंदिर लखामंडल शिव मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिराभोवती अनेक गुढ कथा आहेत. मुळात या मंदिराची स्थापना आणि त्यातील गुहा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या मंदिराच्या परिसरात अनेक गुहा आहेत, या गुहांची निर्मिती कोणी आणि कशासाठी केली याची या भागात चर्चा असते. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव यमुना नदीच्या काठावर आहे. भगवान शंकराचे मंदिर आणि त्याच्या भोवतालच्या गुहा यामुळे या मंदिराबाबतचे गुढ अधिक वाढते. अशी मान्यता आहे की, या मंदिरात प्रार्थना केल्याने मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते. (Lakhamandal Temple)
या मंदिर परिसरात गेल्या काही वर्षापूर्वी नविन विकासकामांसाठी खोदकाम करण्यात आले, तेव्हा येथे अनेक शिवलिंग मिळाली. यामुळे या लखामंदिराचा संबंध थेट महाभारत काळाबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाभारतात, पांडव आणि कौरव यामधील वैर सर्वश्रृत आहे. दुर्योधनानं पांडवांना कपटानं मारण्याचा बेत केला होता. अशावेळी दुर्योधनानं पांडवांसाठी एक लाखेपासून महाल तयार केला होता. या महालाला आग लावून पांडवांना मारण्याचा दुर्योधनाचा डाव होता. पण विदुरांनी वेळीच दिलेल्या सुचनेमुळे पांडवांनी आपला आणि आपल्या मातेचा जीव वाचवला. यासाठी त्यांनी या महालाच्या खाली गुहा खोदली आणि तिथून ते बाहेर निघाले अशी कथा आहे. त्याचा आणि या लखामंदिराचा संबंध असल्याचे स्थानिक सांगतात. लख म्हणजे लाख आणि मंडल म्हणजे गोल म्हणजे लिंग. (Lakhamandal Temple)
लखामंडल म्हणजे लाखो शिवलिंगांचा समूह. या मंदिर परिसरात अनेक प्राचीन शिवलिंगे येथे आहेत. या ठिकाणी पांडवांनी लाखो शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली होती असे मानले जाते. त्यामुळे या गावाचे नाव लखामंडल पडले.लखामंडल मंदिराचे सर्वात आश्चर्यकारक रहस्य म्हणजे येथे मृतव्यक्तींना आणण्यात येते. पुजारी या व्यक्तिच्या तोंडात गंगाजल टाकतात. यामुळे या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, असे सांगितले जाते. लखामंडल मंदिरात अनेक शिवलिंगे आहेत, पण एक शिवलिंग अतिशय खास आहे. हे शिवलिंग मंदिराबाहेर आहे. हे ग्रेनाइटचे शिवलिंग आहे. त्यावर जल अर्पण केल्यावर हे शिवलिंग चकाकते. यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आली आहे. या शिवलिंगात भाविकांना स्वतःचा चेहरा पाहता येतो. या शिवलिंगात आपले मुख पाहणे खूप शुभ मानले जाते. (Lakhamandal Temple)
=================
हे देखील वाचा: उत्तराखंडमध्ये देवीच्या मंदिरावरुन वाद !
==================
या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात. द्वापार आणि त्रेतायुगापासून हे शिवलिंग येथे असल्याचे स्थानिक सांगतात. लखामंदिराच्या संकुलात एक गुप्त दरवाजा आहे. हा दरवाजा थेट कैलास पर्वताला जोडला असल्याचे काही सांगतात. त्यामुळे या मंदिरात येणा-या भाविकांसाठी हा दरवाजाही आश्चर्याचे केंद्र झाला आहे. लखामंदिर हे कधी बांधले आहे, याबाबत अद्यापही निश्चिती करण्यात आलेली नाही. कारण मंदिराच्या परिसरात ५व्या ते ८व्या शतकातीलही दगड सापडले आहेत. शिवाय मंदिर १२ व्या शतकातील नागर शैलीतील आहे. त्यामुळे प्रत्येक शासकानं या मंदिराच्या बांधणीला अधिक व्यापक स्वरुप दिल्याचे सांगितले जाते.
पिरॅमिडसारखी रचना असलेल्या या मंदिराला आध्यात्मिक कल्याणासाठी सिंहपुराची राजकुमारी ईश्वराने नोंद शिलालेखात आहे. या मंदिराच्या शेजारीच दानव आणि मानवाचे मंदिर आहे. येथे अनेक गुहाही असून एका गुहेला स्थानिक जौनसरी भाषेत धुंदी ओदरी म्हणतात. दुर्योधनापासून वाचण्यासाठी पांडवांनी या गुहेत आश्रय घेतल्याचे स्थानिक लोकांचे मत आहे. अशाच अनेक गुहांनी या मंदिराला वेढले आहे. या गुहांची स्वच्छता करुन त्यांची छाननी करण्याची स्थानिकांची मागणी आहे. (Lakhamandal Temple)
सई बने