सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम चालू आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवानंतर देवीचा उत्सव साजरा होतो. नवरात्रौत्सवानिमित्त अवघ्या देशभर देवीची आराधना केली जाते. यातही देवीच्या शक्तीपिठांमध्ये भाविकांची गर्दी होते. देवीच्या 51 शक्तीपिठांपैकी एक असलेल्या चामुंडा देवी मंदिरातही आतापासून नवरात्रौत्सवाची तयारी सुरु झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगडा मधील बनगंगा नदिच्या काठावर असलेले माता चांमुडा मंदिर नवरात्रौत्सवासाठी सज्ज होत आहे. या सर्व परिसराला निसर्गाची मोठी देणगी मिळाली आहे. (Chamunda Devi Temple)
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात या भागात फुलांच्या अनेक जाती पाहायला मिळतात. त्यामुळे हा सर्व परिसर रंगीबेरंगी झालेला असतो. त्यातच मातेचा उत्सव येत असल्यामुळे पर्यटक आणि भाविकांची संख्या या भागात वाढते. माता चामुंडाचे मंदिर उंच टेकडीवर असून या मंदिर परिसरात अन्य देवतांचीही मंदिरे आहेत. याच मंदिर परिसरात भगवान शंकराची गुहा आहे. तसेच येथील शिवलिंग हे नैसर्गिक शिवलिंग आहे. चंड मुंड राक्षसांचा मातेनं इथेच वध केल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच देवीचे नाव चामुंडा माता झाले. मुख्य म्हणजे, नितांत सुंदर आणि शांत असलेल्या या परिसरात प्रत्यक्ष भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा निवास असतो, असे सांगितले जाते. स्थानिक या भागाचा प्रती कैलास म्हणूनही उल्लेख करतात. येथील गुहेलाही कैलास गुहा म्हटले जाते. या गुहेचा शेवट कुठे आहे, हे रहस्य अद्यापही कोणाला उघड करता आले नाही. (Chamunda Devi Temple)
भारतात अनेक ठिकाणी देवीची मंदिरे आहेत. त्यातील माता पार्वतीची शक्तीपिठे ही अत्यंत प्रभावी आहेत. या सर्व मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त देश विदेशातील भाविकांची गर्दी असते. अशाच एका मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे, चामुंडा देवी मंदिर, कांगडा. माता सतीला समर्पित 51 प्रमुख शक्तीपीठांपैकी हे एक मंदिर आहे. या शक्तीपीठाच्या मंदिरात देवी सतीचे जेवढे महत्त्व आहे, तसेच भगवान शंकराचाही येथे पूजा करण्यात येते. मंदिराच्या मागील भागात एक पवित्र प्राचीन गुहा आहे. या गुहेमध्ये भगवान शंकराचे नैसर्गिक शिवलिंग आहे. मातेच्या देशभरात असलेल्या मंदिरांपैकी याच मंदिरात भगवान शंकराचेही वास्तव्य असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे निसर्गाची देणगी लाभलेल्या परिसरात भगवान शंकरासह माता पार्वती यांचे निवासस्थान आहे, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची गर्दी असते. (Chamunda Devi Temple)
या मंदिराबाबत पौराणिक कथा आहेत. भगवती पुराणातही या मंदिराची आणि माता चामुंडा देवीची कथा सांगण्यात आली आहे. राजा दक्षच्या घरी अपमानीत झालेल्या देवी सतीनं त्याच होमकुंडात स्वतःला सामावून घेतले. या घटनेनं संतप्त झालेले भगवान शंकर मातेचे शरीर घेऊन विलाप करीत होते. त्यावेळी मातेच्या शरीराला भगवान विष्णुनं वेगळं केलं. माता सतीच्या पायाचा काही भाग कांडगागधील बनगंगा नदीच्या काठी पडला. त्यानंतर हे स्थान शक्तीपीठ म्हणून पूजले जाऊ लागले. काही भाविक या मंदिराला सिद्धपीठ मंदिर म्हणतात. (Chamunda Devi Temple)
डिसेंबर महिन्यानंतर येथे बर्फाची चादर असते. त्यामुळे या माता चामुंडा देवी मंदिराला (Chamunda Devi Temple) हिमानी देवी मंदिर असेही म्हटले जाते. याशिवाय चामुंडा नंदिकेश्वर धाम म्हणूनही या मंदिराचा उल्लेख पुराणामध्ये आहे. भगवान शंकराचे मुख्य गण असलेल्या नंदीच्या नावाने हे स्थळ ओळखले जाते. भगवान शंकराचे येथे वास्तव्य असते, त्यांच्यासोबत त्यांचे गण आणि वाहन असलेले नंदी महाराजही या चामुंडा माता मंदिर परिसरात असतात. कैलास पर्वतावरुन जेव्हा भगवान शंकर भ्रमणकरण्यासाठी निघतात, तेव्हा ते याच चामुंडा माता मंदिर परिसरात वास्तव्य करतात. स्थानिक म्हणूनच या भागाला प्रती कैलास म्हणतात. याशिवाय चंड आणि मुंड राक्षसांचा वध केल्यावर मातेच्या उग्र रूपाला येथील सर्व देवतांकडून ‘रुद्र चामुंडा‘ असे संबोधण्यात आले. त्यानंतर शांत झालेली माता या निसर्ग संपन्न परिसरात राहिली, तेव्हापासून माता सतीची येथे माता चामुंडा म्हणून आराधना केली जाते.
हा सर्व भाग हिमाचल प्रदेशमधील पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1000 मीटर उंचीवर असलेल्या या भागात धबधबे मोठ्या संख्येनं आहे. तसेच फुलांच्या अनेकविध जाती आहेत. म्हणूनच या सर्व भाग आता पर्यटनासाठीही प्रसिद्ध झाला आहे. येथे अनेक आश्रम आणि योगकेंद्रांचीही स्थापना करण्यात आली आहे. तसेच धर्मशाळाही आहेत. या सर्वांत अनेक पर्यटक रहाण्यासाठी येतात. त्यात परदेशी पर्यटकांची संख्याही अधिक आहे. तसेच चामुंडा देवी मंदिराच्या मागे आयुर्वेदिक रुग्णालय, ग्रंथालय आणि संस्कृत महाविद्यालय आहे. मंदिरात येणार्या भाविकांना रूग्णालयातील कर्मचार्यांकडून वैद्यकीय संबंधित साहित्य पुरविले जाते.
==========
हे देखील वाचा : चामुंडा माता मंदिराच्या यात्रेसाठी तयारी सुरु
==========
येथील ग्रंथालयात पौराणिक पुस्तकांव्यतिरिक्त ज्योतिषाचार्य, वेद, पुराणे आणि संस्कृतीशी संबंधित पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असून त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथाचांही समावेश आहे. तसेच येथे वेद आणि पुराणांचे मोफत वर्ग चालवले जातात. यामुळेच माता चामुंडा देवीचा (Chamunda Devi Temple) परिसर हा कायम पर्यटक, अभ्यासक आणि भक्तांनी गजबजलेला असतो. आता येणा-या नवरातौत्सवानिमित्त मंदिरात अनेक कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. मंदिरात सप्तचंडीचे पठण सुरु आहे. एकूणच निसर्ग संपन्न असलेल्या या मंदिरातील आध्यात्मिक शांती अनुभवण्यासाठी हजारो भाविक माता चामुंडा मंदिराला भेट देतात.
सई बने