देवीची शक्ती काय असते, याचा प्रत्यय बघायचा असेल तर हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथील ज्वाला देवी शक्तीपिठाला नक्की भेट द्यायला हवी. या शक्तिपिठामध्ये नऊ दिवे गेली हजारो वर्ष सतत तेवत आहेत. या दिव्यांचा उगम कसा झाला, कोणी हे दिवे लावले, याचा शोध घेण्याचा लाखोवेळा प्रयत्न झाला आहे, पण त्यात यश आले नाही. फारकाय हे दिवे विझवण्याचाही प्रयत्न झाला. मुघल सम्राट अकबरानं हे नऊ दिवे विझवण्याचा प्रयत्न केला. पण हे दिवे विझले नाहीत. अकबरानं देवीचा महिमा जाणून देवीची माफी मागितली आणि देवीला सोन्याची छत्री अर्पण केली. मात्र देवीनं त्याच्या मनातील किंतू ओळखून या सोन्याच्या छ्त्रीला अन्य धातूमध्ये परावर्तीत केले आहे. हा धातू कोणता हे ओळखण्यासाठीही अनेक प्रयत्न केले. त्यासाठी अनेक शास्त्रज्ञ या ज्वालादेवी मंदिराला भेट देतात. पण त्यांचे विज्ञानही देवीपुढे अपुरे पडले आहे. (Mata Mandir)
हिमाचलमधील कांगडा येथील ज्वाला देवी शक्तीपीठामध्ये शतकानुशतके नऊ दिवे सतत तेवत आहेत. या दिव्यांचा उगम नेमका कधी झाला हे आजपर्यंत समजलेलं नाही. ज्वाला देवी मंदिराच्या तेवत असलेल्या या 9 दिव्यांना वेगवेगळी नावे आहेत. पहिली ज्योत महाकालीची आहे. दुसरी ज्योत महामायेची आहे. त्याला अन्नपूर्णा असेही म्हणतात. तिसरी ज्योत माता चंडीची, चौथी देवी हिंगलाज भवानीची आणि पाचवी ज्योत माता विंध्यवासिनीची आहे. सहावी ज्योत माता महालक्ष्मीची आहे. सातवी ज्योत विद्येची देवी सरस्वतीची आहे. आठवी ज्योत देवी अंबिकेची आणि नववी ज्योत अंजनीमातेची आहे. या नऊ ज्योती कितीही पाऊस, वारा, बर्फवृष्ठी असो, सतत तेवत असतात. (Mata Mandir)
माता ज्वालादेवी मंदिराबद्दल (Mata Mandir) पौराणिक आख्यायिका आहे. यानुसार या भागात देवी सतीची जीभ पडली होती. त्यानंतर कांगडा टेकडीवर माता प्रकाशाच्या रूपात प्रकट झाली. मातेचे पहिले दर्शन येथे जनावरे चरणाऱ्या गोपाळांनी केले. तेव्हापासून आजतागायत हा दिवा जळत असल्याचे स्थानिक सांगतात. माता ज्वालादेवीचे मंदिर प्रथम राजा संसारचंद आणि महाराजा रणजित सिंह यांनी 1835 मध्ये उभारले. मात्र त्याआधीही हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. सत्ययुगापासून माता ज्वालादेवीचे हे पिठ आहे. या मातेला शक्तीदेवता म्हणून पुजले जाते. सत्ययुगात माता ज्वाला देवीचे मंदिर राजा भूमिचंद यांनी बांधले. त्यानंतर 1835 मध्ये राजा संसारचंद आणि महाराजा रणजीत सिंह यांनी मंदिराची पुर्नबांधणी केल्याची माहिती आहे.
आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या अष्टदश महाशक्तीपीठ स्तोत्रामध्ये ज्वाला देवीला वैष्णवी रुपात गौरवण्यात आले आहे. मातेचा जन्म राक्षसांचा संहार करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात येते. हिमालय पर्वतावर राक्षसांनी ताबा मिळवला. तेव्हा भगवान विष्णूच्या नेतृत्वाखाली देवतांनी युद्ध सुरु केले. त्याचवेळी जमिनीवरून प्रचंड ज्वाला उठल्या. त्या आगीतून एका लहान मुलीचा जन्म झाला. तिला आदिशक्ती असे नाव देण्यात आले. तिच माता ज्वाला असल्याचे सांगितले जाते.
माता ज्वालादेवी मंदिरात (Mata Mandir) नवरात्रौत्सव नवरात्रीची सुरुवात ध्वजारोहण आणि कन्यापूजनाने होते. मंदिरात पहिली आरती पहाटे पाच वाजता होते. रात्री दहा वाजता शयन आरतीनंतर दरवाजे बंद केले जातात. नवरात्रीच्या सहाव्या, सातव्या आणि आठव्या दिवशी मंदिर 24 तास खुले असतात. नवव्या दिवशी मंदिरात हवन केले जाते. त्यावेळी भक्तांची मोठी गर्दी या मंदिरात होते. ज्वालादेवी मंदिरात जेवढ्या वेळा आरती होते, तसाच देवीला वेगवेगळा नैवेद्य अर्पण केला जातो. पहाटेच्या पहिल्या मोठ्या आरतीत मालपुआ, दुसऱ्या आरतीत पिवळा भात आणि दुपारी डाळी-भात अर्पण केला जातो. रात्री होणार्या मोठ्या आरतीमध्ये देवीला साखरेची मिठाई आणि दूध अर्पण केले जाते. काही वर्षापूर्वी ज्वालादेवी मंदिरामध्ये पंचबलीची परंपरा होती. यामध्ये मेंढ्या, म्हशी, बकरी, मासे, कबुतर यांचा बळी दिला जात होता. मात्र आता ही प्रथा पूर्णपणे बंद झाली असून त्या जागी देवीला पिवळा तांदूळ आणि उडीद वडी दिली जाते.
============
हे देखील वाचा : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झाली शारदा मातेची पूजा
============
या ज्वालादेवी मंदिराचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे, तेथे अखंड तेवत असणारे नऊ दिवे आहेत. हे दिवे कोणत्या वायुमुळे तेवत आहेत, हे जाणण्यासाठी जपानमधूनही तंत्रज्ञान मागवण्यात आले होते. मात्र हे मशिनही मातेच्या समोर तेवणा-या दिव्यांचे रहस्य शोधू शकले नाहीत. सम्राट अकबरानंतर हे दिवे विझवण्यासाठी कालवा बांधला होता. त्यातील पाणी या दिव्यांवर सोडले. पण दिवे विझले नाहीत. हा चमत्कार बघण्यासाठी अकबर थेट मंदिरात अनवाणी पायानं चालत मंदिरात आला. त्यांनी देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले. पण अकबरावर रागवलेल्या देवीनं या सोन्याच्या छ्त्राचा धातूच बदलला आहे. हा धातू कोणता, हे ओळखता आले नाही. ज्वालामाता मंदिर (Mata Mandir) हे लाखो भक्तांसाठी आस्थेचे स्थान आहे. या मंदिरात रोज लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
सई बने