Home » महाकुंभमध्ये मातृशक्तीला प्रथम वंदन

महाकुंभमध्ये मातृशक्तीला प्रथम वंदन

by Team Gajawaja
0 comment
Mahakhumbha Mela
Share

प्रयागराज येथे होणा-या महाकुंभसाठी धर्मध्वज उभारण्यात आला आहे. 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2025 रोजी होणा-या जगातील या सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यासाठी उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये मोठ्याप्रमाणात तयारी सुरु झाली आहे. एकीकडे प्रशासन या महाकुंभसाठी येणा-या साधु, संत आणि भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक संसाधनांचा वापर करत आहेत. तर दुसरीकडे प्रयागराज येथे आत्तापासूनच मोठ्याप्रमाणात साधुसंतांचे आगमन सुरु झाले आहे. यात आखाड्यांचाही समावेश आहे. या आखाड्यांमध्ये धर्मध्वजा उभारणी हा मोठा सोहळा मानला जातो. धर्मध्वज उभारला म्हणजे, महाकुंभची तयारी सुरु झाली, असे मानण्यात येते. ही धर्मध्वजा यावेळी उभारण्यात आली असून त्यासाठी साधूसंतांनी एकमतानं नवा पायंडा पाडला आहे. प्रयागराज महाकुंभ परिसरात ही धर्मध्वजा यावेळी महिला संतांच्या हस्ते उभारण्यात आली आहे. एकूण तीन आखाडे यावेळी उपस्थित होते, त्यातील मातृशक्तीला धर्मध्वजा उभारणीचा मान देण्यात आला. 12 वर्षांनंतर प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभासाठी भव्य अशी नगरी उभारण्यात येत आहे. या कुंभमेळ्यात 40 करोड भाविक सहभागी होतील अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. कुंभमेळ्यात सर्वांच्या श्रद्धेचे स्थान हे तेथील साधू, आणि आखाडे असतात. या आखाड्यांच्या माध्यमातून हजारो साधू-संत कुंभमेळ्यात येतात. आता पुढच्या वर्षी होणा-या या महाकुंभसाठी जुना, अग्नि आणि आहवाहन आखाड्याचे शेकडो साधू प्रयाग संगम स्थानावर पोहचले आहेत. (Mahakhumbha Mela)

त्यांनी तिथे आपला धार्मिक ध्वज स्थापन करुन अन्य अनुष्ठांनाना सुरुवात केली आहे. श्री पंच दशनम जुना आखाड्याचे प्रथम संगम भूमीवर आगमन झाले. श्री पंच दशनम आव्हान आखाडा आणि अग्नि आखाडा यातील साधूनी आपापल्या आखाड्यातील देवतांना पूर्ण विधीपूर्वक आवाहन करुन महाकुंभसाठी आपल्या आखाड्याची निश्चित केलेली जागा ताब्यात घेऊन आपली तयारी सुरु केली आहे. श्री पंच दशनम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महंत हरी गिरी यांच्या मते, तिन्ही संन्यासी आखाडे त्यांच्या परंपरेत सारखेच आहेत. फक्त त्यांच्या प्रमुख देवता भिन्न आहेत. त्यामुळेच या तिन्ही आखाड्यांच्या धार्मिक ध्वजांची स्थापना एकाच तारखेला करण्यात आली आहे. महिला संतांच्या श्री पंच दशनम जुना संन्यासीनी आखाड्याचा धार्मिक ध्वजही आखाडा परिसरात लावण्यात आला. महाकुंभ परिसरातील तीन संन्यासी आखाड्यांव्यतिरिक्त श्री पंच दशनम जुना आखाड्याचे अनुयायी असलेल्या किन्नरांच्या धार्मिक ध्वजाचीही स्थापना करण्यात आली. किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर कौशल्यानंद गिरी आणि शेकडो सदस्य यावेळी उपस्थित होते. (Social News)

जुना आखाडा हा सनातन धर्मातील सर्वात जुन्या आखाड्यांपैकी एक आहे. 1145 मध्ये कर्णप्रयाग, उत्तराखंड येथे पहिला मठ स्थापन करून त्याची स्थापना करण्यात आली. त्याचे प्रमुख देवता शिव आणि रुद्रावतार गुरु दत्तात्रेय आहेत. याला भैरव आखाडा असेही म्हणतात. हरिद्वारमधील माया मंदिराजवळ त्याचा स्वतःचा आश्रम आहे. वाराणसीतील हनुमान घाट हे त्याचे केंद्र मानले जाते. अंदाजानुसार, जुना आखाड्यात सुमारे 5 लाख नागा साधू आणि महामंडलेश्वर संन्यासी आहेत. जुना आखाड्याचे संत हे कुस्ती आणि युद्धकलेचे तज्ञ मानले जातात. या आखाड्याचे अध्यक्ष प्रेम गिरी महाराज आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज आहेत. 2025 मध्ये होणारा हा महाकुंभमेळा अभूतपूर्व होणार असल्याची झलक मिळत आहे. कारण महाकुंभाच्या इतिहासात प्रथमच इस्रायल, अमेरिका आणि फ्रान्सचे सैनिकही या मेळ्यात येणार असल्याची माहिती आहे. (Mahakhumbha Mela)

=====

हे देखील वाचा :  विवाहित महिला भांगेत कुंकू का लावतात?

========

महाकुंभ दरम्यान प्रथमच इस्रायल, अमेरिका आणि फ्रान्ससह अनेक देशांतील दिग्गज गंगा आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत. याशिवाय सरकारच्या माध्यमातूनही या महाकुंभमेळ्यासाठी लागणा-या प्रत्येक सुविधांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. यावर्षी होणारा हा कुंभमेळा डिचिटल कुंभमेळा असणार आहे. यासाठी AI च्या मदतीने असे कॅमेरे बसवले जात आहेत. हे कॅमेरे 24 तास तैनात रहाणार आहेत. कुंभमेळ्यात लहानमुले, वृद्ध आणि महिलांच्या हरवण्याचे प्रमाण जास्त असते. या कॅमे-याची नजर प्रत्येक भाविकावर असल्यामुळे कुटुंबापासून वेगळ्या झालेल्या भाविकांना सहजपणे शोधता येणार आहे. हरितक्रांतीसाठीही या मेळ्यात प्रयत्न होणार आहेत. कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधूसंत प्रयागराजमध्ये वृक्षारोपणाची मोहीम सुरु करणार आहेत. यातून प्रयागराजमध्ये यानंतर होणा-या महाकुंभमध्ये ही नगरी झाडाझुडपांनी बहरलेली असेल अशी भावना आहे. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.