बॉलिवूड सुपस्टारचा हम साथ साथ है हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानं जेवढं यश सलमानला दिलं आहे, तेवढाच मनस्तापही दिला आहे. कारण तेव्हापासूनच त्याला बिष्णोई समाजाची नाराजी सहन करावी लागत आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. दस-याच्या दिवशी झालेल्या या धक्कादायक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली. बाबा सिद्दीकी यांना भर चौकात गोळ्या मारण्यात आल्या. त्यांना सुरक्षा असतांनाही हल्लेखोरांनी आपला डाव साधला. या घटनेनंतर लगेच बिश्नोई गँगची चर्चा सुरु झाली. आणि काही तासातच लॉरेन्स बिश्नोई हे नाव सर्वदूर झालं. लॉरेन्स बिश्नोई हा गॅगस्टर सध्या गुजरात येथील साबरमती जेलमध्ये आहे. पण तिथून त्यानं हा हल्ला केल्याची चर्चा सुरु झाली. अर्थात बिश्नोई गॅंगनंही हा हल्ला आपणच केला असून जे जे सलमान खानच्या जवळ जातील, त्यांची अशीच गत होईल, अशी धमकी दिली आहे. (Lawrence Bishnoi Gang)
शिवाय आपल्या यादीत पहिला नंबर सलमाल खानचाच असल्याचा गर्भित इशारा या लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगनं दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर पुन्हा एकदा हम साथ साथ है, चित्रपटाचे राजस्थान येथे झालेले शुटींग आणि त्याच वेळी सलमानसह इतर अभिनेत्यांनी केलेली काळविटाची शिकार आणि उठलेला गदारोळ आठवला. राजस्थानमधील बिश्नोई समाज हा काळवीटाला देवाचा अवतार मानतो. त्यांची घराघरात पुजा केली जाते. अगदी बिश्नोई समाजातील महिला आई नसलेल्या काळविटाच्या पाडसाला स्वतःचे दूध पाजून जगवतात. अशाच प्राणापेक्षा प्रिय असलेल्या काळविटाची शिकार सलमान खाननं केल्यापासून लॉरेन्स बिश्नोई त्याच्या मागावर आहे. ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटादरम्यान सलमान खानने केलेली काळविटाची शिकार त्याची पाठ अद्यापही सोडत नाही. शिकारीच्या वेळी त्याच्यासोबत सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे हे चारेही उपस्थित होते. 1998 साली बिष्णोई समाजानेच सलमानवर काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी राजस्थान न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा झाली. बाकी सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर लगेच 1999 मध्ये ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सूपरहिटही झाला. (Social News)
पण 25 वर्षानंतरही हे काळवीट प्रकरण सुरूच आहे. भारतात 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार काळवीटाच्या शिकारीवर बंदी आहे. हा कायदा आणि सोबत बिश्नोई समाजाची काळविटाबाबतची धारणा यामुळे सलमानचा गुन्हा हा त्याला कितीही शिक्षा झाली तरी मोठा असल्याचे बिश्नोई समाजाचे मत आहे. या गुन्हयातून मुक्ती मिळवण्यासाठी बिश्नोई समाजाच्या राजस्थानमधील मंदिरात येऊन माफी मागण्याचा सल्लाही या समाजातर्फे सलमानला दिला आहे. तमाम बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून दबदबा असलेल्या सलमान खानलाही धडकी भरवणारा हा बिश्नोई समाज कसा आहे, हे जाणण्यासारखे आहे. (Lawrence Bishnoi Gang)
बिश्नोई किंवा विश्नोई हा पश्चिम थार वाळवंट आणि भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आढळणारा एक समुदाय आहे. या समाजाचे संस्थापक जांभोजी महाराज आहेत. त्यानीच 1485 मध्ये बिश्नोई हिंदू धर्माची स्थापना केली. बिष्णोई हे जांभोजी महाराजांनी दिलेल्या 29 नियमांचे पालन करतात. “बिश्नोई” हा शब्द 20 अधिक 9 या आकड्यांवरुन आलेला आहे, असेही सांगितले जाते. तर काहींच्या मते बिश्नोई हे विष्णुचे उपासक असल्यानं तिथून बिश्नोई हा शब्द रुढ झाला. मान्यतेनुसार समाजाचे संस्थापक श्रीगुरू जांभेश्वर हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. या समाजात जाट आणि राजपूतांची संख्या अधिक आहे. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील नोखा येथे मुक्तिधाम मुकाम हे बिश्नोई समाजाचे मुख्य मंदिर आहे. या मंदिरात विष्णुची पुजा करण्यात येते. मुळ राजस्थान असले तरी बिश्नोई समाज हा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यातही मोठ्याप्रमाणात आहे. हा बिश्नोई समाज काळ्या हरणांना म्हणजेच काळविटांना आपले देव मानतो. या काळविटांचे रक्षण करण्यासाठी ते आपल्या जिवाचीही पर्वा करत नाहीत. (Social News)
काळविटांचा कळप शेतात आला तरी बिश्नोई त्यांना पीक खाण्यापासून रोखत नाही. तो देवाचा आशीर्वाद असल्याचे त्यांचे मत आहे. बिश्नोई समाज हा पर्यावरणाचा पूजकही आहे. या समाजातील बहुतांश लोक राजस्थानातील जंगले आणि वाळवंटांच्या जवळ राहतात. या समाजाचे संस्थापक भगवान जांभेश्वर यांना निसर्गाची खूप आवड होती. झाडे, वनस्पती, प्राणी यांचे रक्षण करण्याचा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला. हा समाज गुरू जांभेश्वरांनी बनवलेल्या 29 नियमांचे पालन करत झाडे, वनस्पती आणि प्राणी यांना आपले कुटुंब मानतो आणि त्यांचे संरक्षण करतो. काळ्या हरणाला हा समाज शुभ मानतो. त्यामागे एक कथा सांगितली जाते, एकेकाळी हा भाग दुष्काळामुळे होरपळला होता. त्यावेळी येथे दोन काळविटे आली. त्यानंतर दुष्काळाची छाया दूर झाली. तेव्हापासून बिश्नोई काळविटांची पूजा करु लागले. बिश्नोई हे शुद्ध शाकाहारी आहेत. (Lawrence Bishnoi Gang)
======
हे देखील वाचा : बाबा सिद्दिकींच्या हत्येला राज्यातूनच मदत
======
आपल्या परिसरात ते कोणालाही शिकार करु देत नाहीत. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांची संघटना असून, त्यातून बिश्नोई समाजाचे तरुण वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांवर चोवीस लक्ष ठेऊन असतात. शिकारी दिसल्यावर त्यांना पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले जाते. या समाजात अमृता देवी बिश्नोई यांचीही पूजा केली जाते. त्यांनी 12 सप्टेंबर 1730 रोजी जोधपूरजवळील खेजडली गावात हिरवीगार खेजडी झाडे वाचवण्यासाठी त्यांनी झाडांना चिटकून बलिदान दिले. त्यांचेही स्मरण बिश्नोई समाजातर्फे करण्यात येते. बिश्नोई समाज त्यांचे 29 नियम काटेकोरपणे पाळतात. त्यात भगवान विष्णुचे गुणगान करणे, क्षमाशील आणि सहनशील असणे, प्राणी आणि झाडांना जपणे, शाकाहारी भोजन करणे, या नियमांचा समावेश आहे. प्राणी रक्षक असलेला हा बिश्नोई समाज काळविटांची शिकार करणा-यांना कधीही माफ करीत नाही. मग तो कितीही मोठा व्यक्ती असला तरी बिश्नोई समाज त्याच्यावर बहिष्कार टाकतो. सध्या याच बिश्नोई समाजाच्या यादीत सलमान खानचे नाव सर्वात पुढे आहे. (Social News)