भारतातील सर्वात सुंदर खा-या पाण्याचे तलाव आपल्याला माहित आहे का ? मुळात खा-या पाण्याचे तलाव आणि तेही सुंदर या दोन्ही गोष्टी अचंबित करणा-या वाटतात. पण राजस्थानच्या जयपूरजवळील सांभर या खा-या तलावाला बघताना पर्यटक स्वतःला विसरुन जातात, एवढं सौदर्य या तलावाचे आहे. राजस्थान हे राज्य पर्यटकांचे आवडते आहे. येथील किल्ले आणि वाळवंट बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मात्र याच राजस्थानमध्ये असे एक खा-या पाण्याचे तलाव आहे, की त्यातील रंगछटा बघणा-याला मोहवून टाकतात. (Sambhar Salt Lake)
अलिकडे याच सांभर तलावाचा फोटो नासानं एका उपग्रहामार्फत घेतला. रंगाची उधळण करणारा हा फोटो एका खा-या तलावाचा आहे, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र राजस्थानचे सांभर तलाव हे असेच खास आहे. जयपूरजवळील याच सांभर तलावाची किर्ती आता वाढत असून त्याला भारतातील आणि परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे, या तलावाबाबत असलेल्या पौराणिक कथा. राक्षसांचे गुरू असलेल्या शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिचा विवाह राजा ययातीबरोबर याच तलावाशेजारी झाल्याचे सांगण्यात येते. अशाच अन्य कथाही या सांभर तलावाबाबत सांगण्यात येतात. (Sambhar Salt Lake)
राजस्थानच्या जयपूर शहराजवळ असेलेले सांभर तलाव खा-यापाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या तलावाचे क्षेत्रफळ 90 चौरस मैल ऐवढे विस्तृत आहे. या तलावात रूपनगड, मेंठा, खारी, खंडेला या नद्याही समाविष्ठ होतात. याच तलावातून सर्वाधिक प्रमाणात मीठ तयार होते. हा सर्व भाग मध्ययुगीन काळापासून व्यापाराचे केंद्र होता. महाभारत काळामध्येही या तलावाचा उल्लेख आहे. महाभारतात या तलावाचा उल्लेख असून हा सर्व भाग राक्षस राजा वृषपर्वाच्या साम्राज्यात होता. राक्षसांचे गुरू शुक्राचार्य येथे रहात होते. याच ठिकाणी शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिचा विवाह राजा ययातीबरोबर झाला. या विवाहाची आठवण सांगणारे देवयानी मंदिरही येथे पहाता येते. तसेच चौहान राजपूतांची संरक्षक देवी शाकंभरी देवीनं येथेच दृष्टांत दिल्याचे सांगण्यात येते. देवीने येथे असलेल्या जंगलाचे मौल्यवान धातूंच्या शेतात रूपांतर केले. (Sambhar Salt Lake)
मात्र त्यावेळी चांदीचे महत्त्व समजले नाही. हा देवीचा शाप असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली. येथील जनतेनं देवीला वरदान परत घेण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा देवीने सर्व चांदीचे मिठात रुपांतर केल्याची कथा या भागात सांगितली जाते. याच शाकंभरी देवीचे मंदिरही येथे आहे. आता हा सर्व पट्टा मिठाचे उत्पादन करणार सर्वात मोठा पट्ट् म्हणून ओळखला जातो. या सांभर तलावाचे सौदर्य बघून पर्यटन मंत्रालयाने 2014-15 मध्ये तलावाच्या विकासासाठी योजना सुरू केली. एकेकाळी मुघल राजवटीत संपूर्ण मिठाचा पुरवठा याच तलावातील मिठातून केला जायचा. या सांभर तलावाची अनेक वैशिष्टे आहेत. त्यातील एक म्हणजे, सांभर तलावाची खोली ऋतूनुसार बदलते. खा-या पाण्याचे तलाव असले तरी तलावाच्या पाण्यावर फ्लेमिंगो, पेलिकन आणि स्थलांतरीत पक्षी कायम असतात. (Sambhar Salt Lake)
सांभर लेक हे पर्यटकांचे जसे आवडते स्थान झाले आहे, तसेच ते बॉलिवूडचेही आहे. चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके‘ या चित्रपटातील अनेक दृष्ये येथे शूट झाली आहेत. ‘पीके‘ चित्रपटातील आमिर खानचा न्यूड पोस्टर सीन याच तलावाजवळील रेल्वे ट्रॅकवर शूट करण्यात आला. याशिवाय राकेश ओमप्रकाशचा ‘दिल्ली 6′, संजय लीला भन्साळीचा ‘रामलीला‘ आणि संजय दत्तच्या ‘शेर‘ या चित्रपटाचे शूटिंगही याच ठिकाणी झाले आहे. तलावाजवळील शाकंभरी माता मंदिराजवळील मोकळ्या मैदानात ‘जोधा अकबर‘, ‘द्रोण‘ आणि ‘वीर‘ सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांचे सीन शूट झाले आहेत.
=============
हे देखील वाचा : हिवाळ्यात शरीराचे तापमान गरम राहण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
=============
सांभर तलावातील मिठाची शेती बघायची असेल तर तिथे भेट देण्याचा ही सर्वोत्तम वेळ आहे. पावसाळ्याची तीन महिने वगळता, सांभर तालावाला केव्हाही भेट देता येते. अलिकडे या सांभार तलावाचे फोटो सोशल मिडिवार ट्रेंड झाल्यावर या तलावाशेजारी फोटो शूट करणा-यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच सांभर तलावातून जे मिठ तयार होते, ते औषधी असल्याचीही माहिती आहे. मुळात सांभर तलावात जे पाण्याचे वेगवेगळे रंग आहे, तसेच मिठ येथे तयार होते. त्यामुळे सांभर तलावाचे हे रंगीबेरंगी रुप आणि त्यातील मिठाची शेती बघण्यासाठी गर्दी होत आहे.
सई बने