भारतात यावर्षी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मुसळधार झालेल्या पावसानं अनेक भागात शेतीचे आणि घरांचेही नुकसान केले आहे. मात्र आता काही दिवसातच पावसाळा संपणार आहे, आणि थंडीचे आगमन होणार आहे. भारतात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या चार महिन्यात थंडी असते. पण यावर्षी ही थंडी कडाक्याची पडण्याची शक्यता आहे. खुद्द भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतात यावर्षी पडणा-या थंडीच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. विशेषतः पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि दिल्ली-एनसीआर या राज्यात थंडीचे प्रमाण यावर्षी सर्व विक्रमतोडणारे असेल. शिवाय अन्य राज्यातही कडाक्याची असेल, असे भारतीय हवामान खात्यानं सांगितले आहे. भारतीय हवामान खात्यानं यावर्षीच्या थंडीच्या प्रमाणाबद्दल माहिती जाहीर केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार यावर्षी ला निना आहे. (La Nina)
त्याचा परिणाम थंडीवर होणार आहे. दरवर्षीपेक्षा थंडीचा कडाका यावर्षी अधिक जाणवणार आहे. यावर्षी उष्णतेचे प्रमाणही जास्त होते. त्यापाठोपाठ देशात मान्सून सामान्यपेक्षा 8% जास्त झाला. देशाच्या अनेक भागात जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. मात्र ला निनाच्या प्रभावामुळे थंडीचा कडाकाही वाढणार आहे. लानिना ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सर्वत्रच पावसाळा संपत आला आहे. मान्सून 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून पणे गायब होईल, असे हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यापाठोपाठ थंडी येणार आहे. यावेळी उत्तर भारतात, विशेषत: दिल्ली-एन.सी.आर. आणि आसपासच्या भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. 17 ऑक्टोबर पर्यंत दक्षिण-पूर्व द्वीपकल्पातहिवाळी मान्सून सुरू होणार आहे. भारतीय हवामानवर ज्या ला निनाचा प्रभाव पडतो, ते ला निना म्हणजे काय, हे आधी समजून घेऊयात. (National News)
लानिना हा एल निनो सदर्न ऑसिलेशन नावाच्या नैसर्गिक हवामानाच्या घटनेचा भाग आहे. ला निना हा एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामुळे विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा थंड होते. यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून पावसाची अपेक्षा वाढली आहे. हा पॅटर्न साधारणपणे एप्रिल ते जून दरम्यान सुरू होतो. ही परिस्थिती जोरदार पूर्वेकडील वाऱ्यांमुळे निर्माण होते. यामुळे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकले जाते. ज्यामुळे समुद्राची पृष्ठभाग थंड होते. या पॅटर्नचा परिणाम जगभरातील हवामानावर होऊ शकतो. लानिना दरम्यान, पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्वेकडील भागात समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा थंड असते. त्यामुळे वातावरणाचा दाब आणि वाऱ्यांमध्ये बदल होतो. या बदलामुळे हवामानाची पद्धत बदलते. ला निना मुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात दुष्काळ,अतिवृष्टी आणि पूर, तापमानात अचानक बदल, वादळे आणि चक्रीवादळे. (La Nina)
या सर्वांमुळे शेतीवर मोठा परिणाम होतो आणि शेतीचे उत्पादनही घटते. त्यामुळेच यावर्षी ला निनाचा अंदाज जाहीर केल्यावर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ला निनाचा अचूक अंदाज भारतीय हवामान खात्यातर्फे नोव्हेंबर महिन्यात सांगण्यात येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ला निना परिस्थिती विकसित होण्याची 71% शक्यता आहे. ज्या वर्षांमध्ये लानिना असते, तेव्हा देशाच्या उत्तर भागात, विशेषतः वायव्य भारत आणि लगतच्या मध्य प्रदेशात तापमान सामान्यपेक्षा कमी थंड असते. त्यामुळेच या वर्षी देशाच्या अनेक भागातील हिवाळ्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असते. यावर्षी थंडीचे प्रमाण हे या ला निनावर अवलंबून आहे. सध्या ला नीनाची स्थिती अद्यापही कमकुवत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य नोव्हेंबर महिन्यात समजणार आहे. (National News)
======
हे देखील वाचा : कंकणाकृती सूर्यग्रहण
======
तशा सूचना हवामान खात्या तर्फे देण्यात आल्या आहेत. याबाबत देशातील शेतक-यांनाही याची माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याच्या मते ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ला निना परिस्थिती निर्माण होण्याची 71% शक्यता आहे. त्यामुळे किती कडाक्याची थंडी असेल याचा नेमका अंदाज नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे. अर्थात याआधी भारत आणि आशियामध्ये यावर्षी थंडीचे प्रमाण जास्त असेल, याची माहिती जागतिक हवामान संघटनेनं दिली आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत, ला निनाची ताकद 60 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यताआहे. हवामान खात्याच्या या माहितीनुसार देशातील शेतक-यांनी हिवाळी पिकाचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. (La Nina)
सई बने.