काश्मीर (Kashmir) खोऱ्यात 40 दिवसांचा सर्वात तीव्र हिवाळा म्हणजे, चिल्लई कलान सुरू झाला आहे. हवामान खात्यानं श्रीनगरमध्ये डिसेंबरची गेल्या पाच दशकांतील सर्वात थंड तापमान पडणार असल्याचे सूचित केले आहे. काश्मीरमध्ये रात्री तापमान उणे 8.5 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले जात आहेत. या थंडीच्या कडाक्यात श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवर गोठले आहे. या चिल्लई-कलानच्या 40 दिवसांमध्ये, हिमवर्षाव होतो, त्यामुळे तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. (Kashmir)
हे ‘चिल्लई कलान’ पुढील वर्षी 31 जानेवारी 2025 रोजी संपेल. परंतु खोऱ्यात थंडीची लाट कायम राहील असाच अंदाज आहे. कारण त्यानंतर 20 दिवसांचा कालावधी हा ‘चिल्लई-खुर्द’ म्हणजेच लहान हिवाळा मानला जातो. त्यानंतर लगेच 10 दिवसांचा कालावधी हा चिल्लई-बच्छा म्हणून ओळखला जातो. या सर्वात काश्मीर खो-यात हाडं गोठवणारी थंडी असणार आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी काश्मीरी घरात शेगडी धगधगत असते. गेल्या काही वर्षात ही शेगडी जाऊन त्याजागी हिटरने जागा घेतली आहे. मात्र हा हिटर बाहेर उपयोगी पडत नाही. अशावेळी काश्मीरी आपल्या पारंपारिक उपायाकडे वळत आहेत. या कडाक्याच्या थंडीत काश्मीरींसाठी कांगरीच उपयोगी पडत आहे. हे एक मातीचे भांडे असून त्याच्याभोवती दो-याची विण घातली जाते. या कांगरीमध्ये निखारे ठेवले जातात. काश्मीरी नागरिक हिवाळ्यात आपल्या पारंपारिक पोशाखामध्ये ही कांगरी ठेवतात. त्यामुळे तापमान कितीही कमी झाले असले तरी या कांगरीमुळे त्याचा त्रास होत नाही. (Marathi News)
काश्मीर खोरे बर्फाच्या पांढ-या चादरीआड लपून गेले आहे. हा बर्फ बघण्यासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी झाली आहे. पण येथील स्थानिकांसाठी हा हिवाळा त्रासदायक ठरतो. सध्या येथे चिल्लई कलानचा कालावधी चालू आहे. म्हणजेच पुढच्या चाळीस दिवसात काश्मीरचा पारा रात्री शून्याच्या खाली उतरणार आहे. हे दिवस काश्मीरी जनतेच्या परीक्षेच्या असतात. या हाडं गोठवणा-या थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक घरात शेगड्या पेटवलेल्या असतात. मात्र अलिकडच्या काळात या शेगड्या जाऊन त्याजागी विजेवर चालणारे हिटर आले होते. पण यावर्षी काश्मीरमधील थंडीचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. गेल्या 30 वर्षातील सर्वाधिक कमी तापमान आत्ता नोंद कऱण्यात येत आहे. पुढचे 40 दिवस असेच तापमान राहणार आहे. त्यामुळे काश्मीरी जनतेने इलेक्ट्रीक हिटरला बाजूला करुन थंडीपासून बचाव करण्यासाठी पारंपारिक उपाय सुरु केले आहेत. (Kashmir)
खो-यातील तापमान शून्याच्या खाली गेल्यामुळे पाणीपुरवठा करणा-या पाइपलाईनमधील पाणीही गोठले आहे. त्यात काश्मीर खो-यात वीज पुरवठाही अनियमीत होत आहे. काही भागात तर 12-12 तास वीज गायब आहे. अशा परिस्थितीत घराला ठेवण्यासाठी अहोरात्र मोठी शेगडी पेटवलेली असते. याच शेगडीतले निखारे कांगरीमध्ये घालून त्याची शरीराला उब देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या खो-यात मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत. पर्यटन हाच येथील मूळ व्यवसाय असल्यानं कुठलिही समस्या आली तरी येथील लोकांना बाहेर पडावेच लागते. अशावेळी काश्मीरी जनता कांगरीचा उपयोग मोठ्या प्रमाणात करत आहे. (Marathi News)
कांगरीमध्ये एकप्रकारचे मातीचे भांडे असते. या भांड्याभोवती कारागीर जाडदो-याचे विणकाम करतात. त्यामुळे हे भांडे आतून कितीही गरम झाले तरी त्याचा चटका शरीराला लागत नाही. या भांड्यामध्ये मग पेटते निखारे असतात. ही कांगरी आपल्या पोटावर बांधून त्यावर काश्मीरी पोशाख घालण्यात येतो. असा पेहराव केल्यावर बर्फ पडत असलेल्या भागात जरी गेले तरी अंगात गर्मी राहते. सध्या अशीच कांगरी घेतलेले काश्मीरी सर्वत्र दिसत आहेत. कितीही इलेक्ट्रॉनिक हिटर आले, तरीही अशाप्रकारच्या कांगरीमुळेच काश्मीरी जनचेते रक्षण झाल्याचे येथील नागरिक सांगतात. (Kashmir)
==============
हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !
===============
काश्मीरमध्ये ही कांगरी पद्धत इटालियन लोकांकडून आल्याचे सांगितले जाते. इटालीयन नागरिक त्याला स्कॅल्डिनो म्हणत असत. याशिवाय स्पेनमध्येही अशाच प्रकारच्या कांगरी वापरल्या जातात. ही कांगरी काश्मीरच्या घराघरात दिसत आहेत. काश्मीर व्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि नेपाळच्या काही भागातही या कांगरीचा वापर होतो. काश्मीरवासीयांचे कांगरी प्रेम इतके अधिक आहे, की त्याच्यावर काहींनी आपल्या कविताही कांगरीवर लिहिल्या आहेत. काश्मीरमधील हाडं गोठवणा-या थंडीमध्ये या कांगरीचा मोठा आधार जनतेला वाटत आहेत. (Marathi News)
सई बने