श्रीकांत नारायण
“कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर सोमवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेले काही महिने त्यांच्याविरुद्ध भाजप आमदारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचे फलित म्हणून येडियुरप्पा यांना पायउतार व्हावे लागले. पक्षांतर्गत धुसफुशीमुळेच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली असल्यामुळे ‘शिस्तबद्ध पक्ष’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपचेही खरे रूप सर्वांना दिसून आले आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमातच येडियुरप्पा यांना आपल्या राजीनाम्याची घोषणा करावी लागली यासारखे त्यांचे दुर्देव नसेल. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत (Thawar Chand Gehlot) यांनी त्यांचा राजीनामा लगेच स्वीकारला असून त्यांच्याजागी लवकरच भाजपचा नवा नेता निवडला जाईल. त्यादृष्टीने आता दिल्ली आणि बंगलोरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजपचे अध्यक्ष श्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी रविवारीच गोव्यात पत्रकारांशी बोलताना, ” कर्नाटकात नेतृत्वाच्या प्रश्नावरून भाजपमध्ये कसलाही असंतोष नाही त्यामुळे येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट शब्दात सांगितले होते त्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आतच येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला यावरून नेतृत्वबदलावरून निर्माण झालेल्या असंतोषाची धग किती तीव्र होती याची कल्पना येते.
येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यापासूनच भाजपचे काही आमदार नाराज होते. येडियुरप्पा यांनी आपल्या मंत्रिमंडळात काँग्रेस आणि जनता दलातून आलेल्या आमदारांना मानाचे स्थान दिल्यामुळे त्यांच्या असंतोषात भरच पडत गेली. मुख्यमंत्र्यांची मुले सरकारी कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत असाही त्यांचा गंभीर आरोप होता. पक्षश्रेष्ठींनी या असंतुष्ट आमदारांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला होता मात्र त्यांनी तो जुमानला नाही. त्यामुळे शेवटी येडियुरप्पा यांना पायउतार व्हावेच लागले.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर असलेल्या लिंगायत समाजाचा नेता म्हणून राज्याच्या राजकारणात येडियुरप्पा यांचे स्थान फार मोठे आणि महत्वाचे आहे. त्याच्या बळावरच गेली अनेक वर्षे त्यांनी ‘राजकारण’ केले. आतापर्यंत त्यांनी चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. परंतु दुर्देवाने त्यांना एकदाही मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षाची टर्म पूर्ण करता आली नाही.
यापूर्वीही भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कर्नाटकात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नव्हते त्यामुळे सुरुवातीला राज्यात काँग्रेस आणि जनता दल युतीचे सरकार सत्तेवर आले होते. परंतु दोन वर्षांपूर्वी भाजपने आपल्या ‘साम-दाम-दंड-भेद’ नीतीचा वापर करून विरोधी पक्षांच्या आमदारांना फोडून आपले सरकार सत्तेवर आणले आणि त्याची धुरा येडियुरप्पा यांच्याकडे दिली होती.
”मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा स्वखुशीने राजीनामा दिला आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींसह कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही” असे येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यावर सांगितले असले तरी पक्षांतर्गत असंतोषामुळेच येडियुरप्पा यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागले हे उघड आहे. आता त्यांच्या जागी पक्षश्रेष्ठींकडून नव्या नेतृत्वाचा शोध घेणे सुरू झाले आहे. त्यासंदर्भात केंद्रीय सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे संघटन मंत्री बी. एल. संतोष, विद्यमान उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आदींची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत मात्र भाजप श्रेष्ठी (म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा) ठरवितील त्याच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल हे निश्चित आहे.
अर्थातच येडियुरप्पा यांच्या जागी नवा मुख्यमंत्री नियुक्त करणे ही गोष्ट भाजप श्रेष्ठींच्या दृष्टीने वाटते तेवढी सोपी नाही. कारण येडियुरप्पा ज्या समाजातील आहेत त्या लिंगायत समाजाला नाराज करून चालणार नाही. कारण अजून दोन वर्षांनी म्हणजे २०२३ साली कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ते लक्षात घेऊनच नव्या मुख्यमंत्रीपदाची निवड केली जाईल कारण या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपाला विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या लागतील.
नवीन मुख्यमंत्री निवडताना येडियुरप्पा यांचेही मत विचारार्थ घ्यावे लागेल कारण ७८ वर्षाचे येडियुरप्पा यांनी, यापुढेही आपण राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे जाहीर केले आहे. आणि कर्नाटकातील एक शक्तिशाली नेता म्हणून अजूनही त्यांचे स्थान अबाधित आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकूणच कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री निवडणे भाजपच्या दृष्टीने एक सत्वपरीक्षाच असणार आहे.
भाजपमधील कलहामुळे घडणाऱ्या या घडामोडीचा कर्नाटकात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला मात्र तूर्तास तरी काही लाभ होईल असे वाटत नाही. असे असले तरी ”सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारा मुख्यमंत्री पायउतार झाला. हे एका अर्थाने चांगले झाले” या शब्दात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी आनंद व्यक्त केला आहे. एकेकाळी ज्या येडियुरप्पामुळे भाजपला कर्नाटकात पहिल्यांदा सत्ता मिळाली त्याच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकल्यानंतर भाजप राज्यात किती काळ सत्तेवर राहील हे आता पाहावे लागेल.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.